तीन वर्षांपासून गोविंद सोमानी व त्यांच्या पत्नी सुमन सोमानी यांनी यमगरवाडी प्रकल्पात सेवाव्रती म्हणून सेवा दिली. वंचित समाज घटकांतील विद्यार्थ्यांना पालकांच्या ममत्वाने संस्कार देणारे हे दाम्पत्य. त्यांनी यमगरवाडी प्रकल्पातील विद्यार्थ्यांच्या विकासासाठी केलेले नियोजन आणि कार्य शब्दातीत आहे. त्यांच्या या कार्यविचारांचा मागोवा घेणारा हा लेख...
गोविंद सोमानी व सुमन सोमानी मूळचे नांदेडचे. गोविंद सोमानी यांचे नांदेड शहरामध्ये होलसेल प्लायवूडचे दुकान व होलसेल ग्लास विक्रीचा मोठा व्यवसाय आहे. गोविंद सोमानी यांना सहा नातवंडे आहेत. नांदेड येथील सामाजिक कार्यात त्यांनी सहभाग घेतला. गोविंद सोमानी यांचे वडील कन्हैयालाल सोमानी हे काही काळ नेपाळमध्ये वास्तव्यास होते. नेपाळमध्ये राहून राईस मिल भाड्याने घेऊन काही काळ ते त्या ठिकाणी तांदूळनिर्मिती करत होते. हा तांदूळ ते महाराष्ट्र, केरळम्, कर्नाटकसह इतर राज्यांत पाठवत होते. परंतु, कालांतराने त्यांना परत भारतात यावेसे वाटले व ते परत नांदेड येथे स्थायिक झाले. कन्हैयालाल है राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक त्यामुळे संघाच्या कार्यकर्त्यांचा, स्वयंसेवकांचा सतत संपर्क होता. काही कार्यकर्ते संघकामाच्या निमित्ताने घरीही येत असत. त्यामुळे गोविंद सोमानी यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ओळख होती. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघामार्फत चालणार्या सेवाभावी संस्थांची, सामाजिक कार्याची त्यांना थोडी माहिती होती. त्यांना नांदेड येथील संघाचे कार्यकर्ते राजेश्वर कमतलवार यांकडून संघकामाची प्रेरणा मिळाली.
दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते रावसाहेब कुलकर्णी आणि त्यांची भेट झाली. रावसाहेब कुलकर्णी यांच्याकडून गोविंद सोमानी यांना यमगरवाडी प्रकल्पाची माहिती मिळाली. यमगरवाडीमध्ये सुरेश पाटील, तसेच संभाजीनगर येथील ओक परिवार हे सेवाव्रती म्हणून यमगरवाडीत सेवा देऊन गेल्याचे त्यांना समजले. गोविंद सोमानी यांनाही यमगरवाडीची ओढ लागली. व काही काळ संघाच्या सेवाप्रकल्पामध्ये आपणही पूर्ण वेळ सेवाव्रती म्हणून वेळ द्यावा, असे त्यांनी मनामध्ये ठरवले. परंतु, त्यांचा असलेला व्यवसायाचा मोठा व्याप, तसेच परिवार सोडून धाराशिव जिल्ह्यातील यमगरवाडी येथील प्रकल्पावर पूर्ण वेळ राहण्यासाठी त्यांना खूप विचार करावा लागला. परिवारातील सदस्यांसोबत त्यांनी चर्चा केली. त्यांच्या मुलांनी त्यांना पूर्ण वेळ जाण्यासाठी जड अंतकरणाने परवानगी दिली.
पुढे ‘भटके-विमुक्त विकास प्रतिष्ठान’चे कार्यवाह विवेक अयाचित यांनीही नांदेड येथील सोमानी यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली व सोमानी यांनी यमगरवाडीत यावे, यासाठी प्रयत्न केले. तीन वर्षांपासून गोविंद सोमानी व त्यांच्या पत्नी सुमन सोमानी हे यमगरवाडी प्रकल्पात सेवाव्रती म्हणून सेवा देत आहेत. शहरात राहिलेल्या गोविंद सोमानी यांना भटके-विमुक्त समाजाची माहिती नव्हती. यमगरवाडी आल्यानंतर पालामध्ये राहणार्या भटया-विमुक्त समाजातील मुलांशी त्यांची ओळख झाली. त्यांनी काही भटयांच्या वस्तीला भेटी दिल्या व हे भटयांचे एक वेगळे जग आहे आणि आपण योग्य ठिकाणी सेवा देण्यासाठी आलो आहोत, याचा त्यांना अभिमान वाटू लागला. या तीन वर्षांमध्ये यमगरवाडीमध्ये शिकणार्या विद्यार्थ्यांसोबत त्यांचा खूप लळा लागला.
मुलांच्या समस्या सोडवणे, मुलांना शिस्त व चांगल्या सवयी लावणे, यासाठी ते सतत प्रयत्न करतात. शिक्षणात मागे असणार्या विद्यार्थ्यांकडे विशेषतः त्यांचे खूप लक्ष असते. त्यांच्या अभ्यासाकडे ते स्वतःहून लक्ष देतात. मुलं शिकावीत, म्हणून ते प्रयत्न करतात. यमगरवाडीतील विद्यार्थ्यांना बचतीची सवय लागावी, यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांकरिता शाळेमध्ये ’बचत बँक’ सुरू केली. ’ग्राहक भांडार’ सुरू केले. ’बचत बँक’ व ’ग्राहक भांडार’ यांचे सर्व व्यवस्थापन मुलेच करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना बचतीची सवय लागली आहे. सर्व विद्यार्थ्यांना बचतीचे पासबुक देण्यात आले आहेत. मुले-मुली या पासबुकद्वारे बँकेसारखे व्यवहार करतात. पूर्ण वेळ मुलांसोबत राहात असल्यामुळे त्यांना मुलांच्या सुख-दुःखाचे, तसेच त्यांच्या आवश्यकतांची जाणीव झाली. मुलांना लागणारे शैक्षणिक साहित्य असेल किंवा मुलांना पाणी पिण्यासाठी लागणार्या बॉटल असतील, अशा छोट्या छोट्या आवश्यकतांची सोमानी यांनी पूर्तता केली. यमगरवाडीतील सर्व विद्यार्थी, तसेच कर्मचारी यांना ‘सोमानी काका’ म्हणून परिचित आहेत. सर्व कर्मचारी व विद्यार्थ्यांशी अतिशय चांगला संपर्क सोमानी काकांचा आहे. सुमन सोमानी या पूर्ण वेळ मुलीसोबत असतात. त्यामुळे त्यांना मुलींसोबत लळा लागला आहे. मुलींना शिस्त व संस्काराच्या गोष्टी शिकवण्यासाठी सोमानी काकू या सतत प्रयत्नशील असतात. या तीन वर्षांमध्ये सोमानी परिवाराने यमगरवाडीकरिता भरीव योगदान दिले आहे. शहरातील चांगले जीवन सोडून यमगरवाडीसारख्या माळावरती येऊन राहणे हे सोपे काम नाही. परंतु, सोमानी पती-पत्नींनी तीन वर्षे आपल्या परिवाराचा त्याग करून यमगरवाडीमध्ये वेळ दिला आहे. ही दुर्मीळ बाब आहे.
गोविंद सोमानी हे "यमगरवाडीमध्ये येऊन आम्हाला खूप काही शिकायला मिळाले,” असे सांगतात. भटया-विमुक्तांच्या मुलांनी शिक्षण घ्यावे व इतर समाजासोबत यावे, यासाठी ते प्रयत्नशील आहेत. यमगरवाडीत शिकणार्या अनेक मुलांच्या घरी सोमानी काका यांनी भेट दिली आहे व त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आहेत. "यमगरवाडीमध्ये आल्यानंतर ‘भटके-विमुक्त विकास प्रतिष्ठान’चे अध्यक्ष उद्धव काळे, उपाध्यक्ष डॉ. अभय शहापूरकर, कार्यवाह विवेक अयाचित, कोषाध्यक्ष नरेश पोटे, अशोक संकलेचा, डॉ. प्रणिता गडेकर, अॅड. जनक पाटील, तसेच येथील मुला-मुलींकडून खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या,” असे ते सांगतात. यमगरवाडीत राहात असताना सोमानी काकांची नातवंडे सतत त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतात; आठवणीने रडतात ’‘बाबा, तुम्ही लवकर घरी या,” असे सांगतात. परंतु, सोमानी यांनी सेवा देण्याचा व्रत घेतले आहे. "सेवा देण्याच्या कालावधी संपल्यानंतर घरी येतो,” असे सोमानी काका आपल्याला नातवंडांना समजावून सांगतात. गोविंद सोमानी व सुमन सोमानी हे यमगरवाडीमध्ये रमले आहेत. त्यांना यमगरवाडी प्रकल्प आपला वाटू लागला आहे. इथे शिकणार्या सर्व मुलामुलींसोबत ते पूर्ण वेळ घालवतात. त्यामुळे त्यांना घरची आठवण येत नाही. घरदार सोडून भटया समाजाकरिता दूरवर, जिथे कुठल्याही सुविधा सहज उपलब्ध होत नाहीत, अशा ठिकाणी येऊन राहणे, हे कौतुकास्पद आहे. समाजाने आदर्श घेण्यासारखे आहे. सोमानी यांनी तीन वर्षे पूर्ण वेळ सेवाव्रती म्हणून वेळ देण्याचे ठरवले होते.
आज त्यांच्या या कामाला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. ते आता थांबणार आहेत. परंतु, ”भटयांच्या या कामाला व यमगरवाडी प्रकल्पाला सतत आम्ही स्मरणात ठेवू, भटयांसाठी नक्कीच यापुढेही काहीतरी करत राहू,” अशी त्यांची इच्छा आहे. या त्यांच्या आदर्शवत सेवाकार्याला मी ‘भटके-विमुक्त विकास प्रतिष्ठान’ यमगरवाडी ‘एकलव्य विद्या संकुला’तर्फे त्यांना धन्यवाद देतो व शुभेच्छा देतो.
विठ्ठल म्हेत्रे
(लेखक एकलव्य विद्या संकुल, मंगरूळ यमगरवाडी, तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव येथे मुख्याध्यापक आहेत.)