ब्रिटिश राजवटीतही भारत हिंदूराष्ट्रच! : दत्तात्रेय होसबाळे

    13-May-2026   
Total Views |

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : “आम्ही हिंदू राष्ट्र निर्माण करत नाही आहोत, भारत आधीपासूनच हिंदू राष्ट्र आहे. ब्रिटिश राजवटीतही हे हिंदू राष्ट्रच होते. हिंदू राष्ट्राचा अर्थ सांस्कृतिक ओळख असा आहे, धार्मिक राज्य असा नाही. राष्ट्रीयत्व एकच असल्यामुळे आम्ही कुणालाही वेगळे मानत नाही. भारतात मुस्लीमांना दुय्यम नागरिक समजले जात नाही. सरकारी योजनांचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचत असून संघ सुद्धा सातत्याने अल्पसंख्याक समाजातील नेत्यांशी संवाद साधत असतो.” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी केले. मंगळवारी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी विविध विषयांवर आपले मत व्यक्त केले.

याप्रसंगी सरकार्यवाहंनी पाकिस्तानसोबत संवाद कायम ठेवण्याची भूमिका मांडल्याचे दिसून आले. त्यांनी स्पष्ट केले की, जर पाकिस्तान पुलवामासारख्या घटनांद्वारे सुयीच्या टोचणीसारखे वार करण्याचा प्रयत्न करत असेल, तर परिस्थितीनुसार त्याला योग्य प्रत्युत्तर देणे आवश्यक आहे. देशाची सुरक्षा आणि राष्ट्रीय स्वाभिमानाचे रक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे असून, यासाठी विद्यमान सरकारने योग्य पावले उचलली पाहिजेत. मात्र, त्याचवेळी संवादाचे मार्ग कायम खुले ठेवले पाहिजेत. आपण नेहमी चर्चेसाठी तयार असले पाहिजे.

यालाच जोडून त्यांनी पुढे सांगिलते की, म्हणूनच राजनैतिक संबंध टिकवून ठेवले जातात. व्यापार, वाणिज्य सुरू राहते आणि व्हिसाही दिले जातात. हे सर्व थांबवू नये, कारण संवादासाठी एखादा मार्ग कायम उघडा असणे गरजेचे असते. त्यांनी भारत आणि पाकिस्तानच्या समान इतिहासाकडेही लक्ष वेधले आणि सांगितले की, लोकांमधील परस्पर संबंध दोन्ही देशांतील तणाव कमी करण्यास मदत करू शकतात. आपल्यामध्ये सांस्कृतिक नाते आहे आणि आपण कधीकाळी एकाच राष्ट्राचे भाग होतो.

सरकार्यवाहंनी पाकिस्तानमधील खेळाडू, शास्त्रज्ञ आणि नागरी समाजालाही शांततेसाठी पुढे येण्याचे आवाहन केले. पाकिस्तानच्या सैन्यावर विश्वास ठेवता येत नसल्याचे सांगतानाच, समाजातील सकारात्मक शक्तींनी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले. त्यांचे हे वक्तव्य भारत-पाकिस्तान संघर्षाच्या पहिल्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर आले आहे. २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर या संघर्षाला सुरुवात झाली होती.

इराण युद्ध संसाधनांच्या संघर्षातून
पश्चिम आशियामध्ये सुरू असलेला संघर्ष हा संस्कृतींचा संघर्ष नसून तेल आणि इतर संसाधनांवरून निर्माण झालेला वाद आहे. जगातील बहुतांश युद्धे लोभ, अहंकार आणि इतरांवर वर्चस्व गाजवण्याच्या मानसिकतेतून जन्म घेतात. इतिहासात प्रत्येक काळात युद्धे झाली आहेत आणि भविष्यात पाण्यावरूनही संघर्ष होण्याची शक्यता आहे. युद्धामुळे मानवजात संपणार नाही, पण मानवी जीवन आणि व्यवस्था निश्चितपणे बदलतील, असे त्यांनी सांगितले.
 
संपवण्याची भाषा केली म्हणून सनातन नष्ट होत नाही
तमिळनाडू विधानसभेतील विरोधी पक्षनेता उदयनिधी स्टॅलिन याने 'लोकांमध्ये भेद निर्माण करणाऱ्या सनातनचे पूर्णतः उच्चाटन व्हायला हवे' असे वक्तव्य केले होते. त्यावर भाष्य करताना सरकार्यवाह म्हणाले की, सनातन हे शाश्वत आहे. कुणी ते संपवण्याची भाषा केली म्हणून ते नष्ट होणार नाही.






ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक