जित्याची खोड...!

    13-May-2026
Total Views |
DMK Sanatana Politics Debate
 
द्रमुकने तामिळ अस्मितेचे राजकारण फुटीरतावादापर्यंत नेऊन ठेवले होते. पण, तामिळी जनतेला या द्रविडी राजकारणापासून सुटका हवी होती. तामिळी जनतेला लोकप्रिय अभिनेता विजयच्या ‘टीव्हीके’ पक्षाचा पर्याय उपलब्ध होताच, त्यांनी द्रमुकचे ओझे मानेवरून फेकून दिले. द्रमुकची सनातनविरोधी भूमिका आपल्याला पसंत नाही, हाच संदेश जनतेने मतदानातून दिला असला; तरी उदयनिधीसारख्या नेत्यांनी त्यातून अजिबात धडा घेतलेला नाही.
 
द्रमुकचे नेते आणि माजी मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचा पुत्र उदयनिधीने काल पुन्हा एकदा सनातनविद्वेषी वक्तव्य केले. नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीच्या वेळी विधानसभेत केलेल्या या वक्तव्याने पुन्हा वातावरण तापले आहे. तामिळनाडू विधानसभेच्या निवडणुकीत जनतेने द्रमुकचा जोरदार पराभव केला असून, एम. के. स्टॅलिन यांनाही आपली जागा वाचविता आलेली नाही. द्रमुकच्या द्रविडी राजकारणाला आणि सनातनद्वेषी भूमिकेला जनतेने साफ नाकारल्याचे या जनादेशातून अगदी स्पष्ट होते. तरीही, उदयनिधीसारखे नेते यातून काही धडा घेत नाहीत, ही आश्चर्याची गोष्ट. उदयनिधीने यापूर्वी केलेल्या सनातनविरोधी विधानांची दखल सर्वोच्च न्यायालयानेही घेतली होती आणि त्याला इशाराही दिला होता. कदाचित, म्हणूनच यावेळी उदयनिधीने हे विधान विधानसभेत केले. कारण, सभागृहातील वक्तव्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकत नाही, असा कायदा आहे. त्यामुळे तेच हिंदूद्वेषी विचार त्याने विधानसभेतून मांडले, जे आणखीनच संतापजनक!
 
द्रमुकने नेहमीच तामिळ वर्चस्ववादाचे राजकारण केले. तामिळी जनता ही अन्य भारतीयांपेक्षा कोणी वेगळी आहे, असे भासविण्याचा प्रयत्न केला असून, त्यात फुटीरतावाद अभिप्रेत आहे. १९८०च्या दशकात श्रीलंकेत व्ही. प्रभाकरन या दहशतवाद्याच्या ‘एलटीटीई’ या दहशतवादी संघटनेने श्रीलंकेच्या विभाजनासाठी जो सशस्त्र संघर्ष चालू केला होता, त्याला द्रमुकचा पूर्ण पाठिंबा होता. या ‘एलटीटीई’च्या दहशतवाद्यांना तामिळनाडूत उदार आश्रय व आर्थिक मदत मिळत होती. त्यातून द्रमुकने द्रविडी राजकारणाला अन्य भारतीय राजकारणापासून काहीसे वेगळे पाडले. तेव्हापासून तामिळी लोक हे उत्तर भारतीयांपेक्षा श्रेष्ठ आणि अलग आहेत, अशी एक भूमिका, एक नॅरेटिव्ह द्रमुकने तयार करण्याचा प्रयत्न केला. त्या भूमिकेचेच विस्तारित स्वरूप म्हणजे सनातन धर्माला विरोध! करुणानिधी यांच्या काळात ही संकल्पना रुजविण्यात आली आणि स्टॅलिन यांनी ती अधिक विकसित केली. पण, कोणत्याही संकल्पनेचे आयुष्य हे मर्यादित असते. सनातनद्वेषाच्या राजकारणाने द्रमुकला जो लाभ व्हायचा, तो आता होऊन गेला आहे. तामिळी जनतेला आता हे राजकारण पसंत पडत नाही. ताजे निकालही हेच दर्शवितात. पण, आपल्याला सांगण्यासारखे काही नसले आणि राज्यकारभार करताना कोणतेही ठोस कार्य केले नसेल; तर प्रादेशिक, भाषिक अस्मितेसारख्या भावनिक मुद्द्यांचाच आधार घ्यावा लागतो. द्रमुकचाही कारभार अत्यंत भ्रष्ट होता. त्यामुळे त्याने भाषिक व प्रादेशिक अस्मितेचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, द्रमुक नेत्यांपेक्षा तामिळ जनता अधिक समजूतदार व प्रगल्भ निघाली आणि तिने मतपेटीतून या भंपक राजकारणाचा अंत केला. पण, जनादेश आपल्याला मिळाला नाही, म्हणूनही सनातनच्या नावाने ही मळमळ असू शकते. तसेच आता सत्ता हातातून गेलीच आहे. त्यामुळे जनता-मतदार आपले काहीएक बिघडवू शकत नाही. म्हणा, तसेही जनतेच्या स्मरणशक्तीला मर्यादा आहेतच. असा विचार करून, उदयनिधीने पुन्हा सनातनद्वेषाचा राग आळवलेला दिसतो. फक्त दु:ख एवढेच की, उदयनिधीच्या या सनातन धर्माला लक्ष्य करणार्‍या वक्तव्यावर अन्य पक्षांतील एकाही हिंदू आमदाराने तत्काळ कोणताही आक्षेप का नोंदवला नाही? म्हणजे सभागृहात एरव्ही क्षुल्लक कारणांवरुन गदारोळ करणारे, एकमेकांवर तुटून पडणारे उदयनिधीच्या त्या संतापजनक विधानानंतरही ढिम्मच होते, यावरुन सनातनप्रती तेथील लोकप्रतिनिधींच्या संवेदनाच बोथट झाल्या आहेत का, असा प्रश्न आज उद्विग्नपणे उपस्थित करावासा वाटतो.
 
लोकप्रिय अभिनेता थलपती जोसेफ विजयने द्रविडी राजकारणापासून स्वत:ला वेगळे ठेवले आहे. तोही तामिळी आहे. पण, स्टॅलिन यांच्यासारखा तो उत्तर भारतीयद्वेषावर पोसलेला नाही. किंबहुना, द्रमुक व अण्णाद्रमुक हे आपले राजकीय शत्रू असल्याचे त्याने उघडपणे सांगितले होते. तामिळी जनतेलाही या ‘द्रविडी’ राजकारणापासून सुटका हवी होती. त्यामुळे विजयच्या ‘टीव्हीके’ या पक्षाच्या रूपाने त्यांना नवा पर्याय उभा राहिलेला दिसताच, त्यांनी विजयच्या झोळीत भरभरून मते टाकली. विजय ख्रिश्चन असला, तरी बहुसंख्य हिंदू तामिळी जनतेने त्याला मते दिली आहेत. मात्र, विधानसभेत उदयनिधीच्या भाषणावर विजयने काही प्रतिक्रिया व्यक्त न करणे, हेही सूचक आणि धोक्याची घंटाच म्हणावी लागेल. विजय हा ख्रिश्चन असून, त्याने निवडणुकीच्या प्रचारात आपल्या ख्रिस्ती असण्याचे भरपूर प्रदर्शनही केले होते. येशू ख्रिस्ताची तसबीर उघडपणे आपल्या ट्रकवर लावून त्याने मिरवणूकदेखील काढली होती.
 
आता उदयनिधीने हिंदूविरोधी विधान केल्यावरही बहुसंख्य हिंदू जनता असलेल्या राज्याचा मुख्यमंत्री या नात्याने विजयने त्या विधानावर आक्षेप घ्यायला हवा होता किंवा त्याचे किमान खंडन करणे तरी अपेक्षित होते. कारण, शपथविधीनंतर त्याने केलेल्या भाषणात आपण ‘सेक्युलर’ असल्याचे सांगत, राज्यात आता सामाजिक न्यायाचे पर्व सुरू होत असल्याचा दावा केला होता. पण, उदयनिधीच्या वक्तव्यावर विजयने कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही, हे सर्वस्वी खेदजनकच. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी हेही ख्रिश्चन असून, त्यांच्या राजवटीत आंध्र प्रदेशात बेछूट धर्मांतराचे प्रकार उघडकीस आले होते. तशीच भीती आता तामिळनाडूबद्दल व्यक्त होत आहे. ‘द्रमुक हा आपला राजकीय विरोधक असला, तरी भाजप हा वैचारिक शत्रू आहे,’ असेही विजयने मागेच म्हटले होते. त्यामुळे द्रमुक व ‘टीव्हीके’ हे वेगळे पक्ष असले, तरी सनातनविरोधात त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू ठरण्याची शयता नाकारता येत नाही.
 
द्रविड अस्मितेच्या राजकारणामुळे द्रमुकने आधी हिंदीला कडाडून विरोध केला. आता त्याचेच पुढचे पाऊल म्हणून सनातन धर्मालाही विरोधाची भूमिकाही पुढली रेटलेली दिसते. त्यामुळे या द्रविडी पक्षांच्या लेखी तामिळ हे हिंदू नाहीत का? की, ‘तामिळ’ नावाचा कोणता स्वतंत्र धर्म आहे? त्यामुळे द्रमुकच्या तामिळ अस्मितेच्या राजकारणाचा मुद्दा पोकळ आहे. तामिळनाडू हा भारताचाच अविभाज्य भाग. त्यामुळे राजकीय स्वार्थासाठी वारंवार उत्तर-दक्षिण असा भेद करणे हे राष्ट्रहिताला नख लावणारेच कृत्य! एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळ संस्कृतीलाही अन्य संस्कृती, राज्यांइतकेच महत्त्व दिले. ‘सबका साथ, सबका विकास, सबक विश्वास’ अशी सर्वसमावेशक भूमिकाच मोदींनी घेतली. ‘तामिळ-काशी संगम’सारखे सांस्कृतिक उपक्रम यशस्वीपणे राबवून उत्तर-दक्षिण दरी मिटवण्याचा प्रयत्न केला. त्यातून त्यांची भारताबद्दलची व्यापक आणि समावेशक दृष्टीच दिसून येते. पण, त्यावरून द्रमुकचे नेते काही शिकले नाहीत, हेच खरे!
 
‘जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही,’ असे म्हणतात. त्यामुळे उदयनिधी स्टॅलिनची सनातनद्वेषी भूमिका ही त्याच्याबरोबरच नाहीशी होईल. याचे कारण, तामिळी जनता द्रमुकलाच राजकारणातून हद्दपार करेल, तेव्हा उदयनिधीसह त्याची ही विद्वेषी भूमिकाही तामिळनाडूतून नष्ट होईल. त्याची सुरुवात द्रमुकच्या पराभवातून झालीच आहे. पुढील निवडणुकीपर्यंत द्रमुकचे हे कथित अस्मितेचे राजकारण पूर्णपणे विरून जाईल. त्यामुळे तामिळनाडूसह देशभरातील हिंदूंनी आता रस्त्यावर उतरून उदयनिधीच्या या सनातनद्वेष्ट्या वक्तव्यांचा तीव्र निषेध करुन, बंगालमध्ये दिसलेली सनातनच्या उत्थानाचीच ताकद दाखवून द्यावी!