उपाययोजनांची अंमलबजावणी करता येत नसल्यास थट्टा मस्करी तरी करू नका;मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर निशाणा

    13-May-2026   
Total Views |
 Devendra Fadnavis
 
मुंबई : (Devendra Fadnavis) वैश्विक संकटाच्या काळात देशाची अर्थव्यवस्था सुरळीत राहावी, देशासमोर संकट निर्माण होऊ नये, यादृष्टीने पंतप्रधान मोदी यांनी सांगितलेल्या उपायांची विरोधकांना अंमलबजावणी करायची नसल्यास, कमीत कमी त्याची थट्टा मस्करी तरी करू नये, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले.
 
माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “ज्यावेळी एखाद्या वैश्विक संकटाची परिस्थिती असते त्यावेळी आपल्या पंतप्रधानांनी काही उपाययोजना सांगितल्या तर, त्यांना सकारात्मकतेने घेतले पाहिजे. जगातील अनेक देशांची परिस्थिती खराब आहे. अनेक देशांमध्ये लॉकडाऊन लागले आहे तर, काही ठिकाणी पेट्रोलचे भाव ४५०-५०० रूपयांपर्यंत गेले आहे. सर्वजण आपापल्या परीने पंतप्रधानांनी सांगितलेल्या उपायांची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करावा. महाराष्ट्रातही मुख्यमंत्र्यांसहित मंत्र्यांचा ताफा आम्ही कमी करतो आहोत. परदेश दौऱ्यांवर निर्बंध आणतो आहोत. ज्या गोष्टींमध्ये परकीय चलन खर्च होते त्या गोष्टींचा कमीत कमी वापर आणि देशी गोष्टींचा जास्तीत जास्त वापर करण्याचा प्रयत्नसुद्धा करतो आहोत.” (Devendra Fadnavis)
 
 
 
ते पुढे म्हणाले की, “पंतप्रधान मोदी यांनी देशाला जो संदेश दिला त्यादृष्टीने महाराष्ट्र काम करेल. प्रत्येक व्यक्तीने थोडी थोडी आपली जीवनशैली बदलली तरीही आपण देशाला मदत करू शकू. विरोधी पक्षांनी कितीही थट्टा मस्करी केली तरी, वैश्विक संकटात आपण देशाच्या पाठीशी उभे राहिलो नाही तर ते योग्य होणार नाही.” (Devendra Fadnavis)
 
नीट पेपर फुटीप्रकरणी सीबीआयला पूर्ण सहकार्य करणार
 
मुख्यमंत्री म्हणाले की, “नीट पेपर फुटीप्रकरणी सीबीआय तपास करत आहे. आमचे पोलिस सीबीआयला पूर्ण सहकार्य करतील. भारत सरकार आणि नीट परीक्षा घेणाऱ्या बॉडीने हे प्रकरण गांभीर्याने घेतल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आमची मुले इतका अभ्यास करतात पण कुणीतरी पेपर फोडतात ही चुकीची बाब आहे. या प्रकरणात जो जो सहभागी असेल, त्या प्रत्येक व्यक्तीवर कारवाई व्हावी आणि यासाठी आम्ही पूर्ण सहकार्य करू.”
 
 
नागपूर विमानतळाच्या विकासाचा मार्ग मोकळा
 
नागपूर विमानतळाबद्दल बोलताना ते म्हणाले की, “नागपूर विमानतळ हे ब्राउनफील्ड विमानतळ म्हणून विकसित करण्यासाठी मागच्या काळात महाराष्ट्र सरकारने एक टेंडर दिले होते. त्यानंतर त्याच्या प्रक्रियेकरिता कॅबिनेटची मंजूरी हवी होती. आज पंतप्रधान मोदी यांनी मंत्रिमंडळ बैठकीत त्याला मान्यता दिली आहे. त्यामुळे नागपूरला ब्राउनफील्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ तयार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.”
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढे सांगितले की, “आज नाशिक आणि त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या लोगोचे अनावरण झाले. यासोबतच १३ प्रमुख आराखड्यांचे साधू, महंत प्रतिनिधींसोबत एक बैठक झाली. कुंभमध्ये आतापर्यंत काय काय केले याचे प्रेझेंटेशन त्यांच्यासमोर झाले. त्यांच्याकडून आलेल्या काही सूचना समजून घेत त्यावर कार्यवाही करण्यास सांगितले. एक भव्य आणि दिव्य स्वरुपाचा कुंभ व्हावा आणि साधुसंत, महंतांची चांगली सोय व्हावी, यादृष्टीने एक चांगला प्लॅन आम्ही तयार केला असून त्यात आम्हाला साधु महंतांचेही मोठे सहकार्य मिळत आहे.” (Devendra Fadnavis)
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....