पुण्यातील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रास ‘अजितदादा पवार’ यांचे नाव

    13-May-2026   
Total Views |
Desi Cow Research and Training Centre
 
मुंबई : ( Desi Cow Research and Training Centre) दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून स्थापन करण्यात आलेल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषी महाविद्यालय, पुणे येथील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रास 'अजितदादा पवार देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र' असे नाव देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली. बुधवारी याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला.
 
महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद यांच्या १२२ व्या बैठकीत या केंद्राला 'अजितदादा पवार देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र' असे नाव देण्यास मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांनी शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता.
 
याबद्दल बोलताना कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, "देशी गायींच्या मौल्यवान व दुर्मिळ प्रजातींचे जतन, त्यांची दुग्धक्षमता वाढवणे तसेच शाश्वत शेतीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे या महत्त्वाच्या बाबींवर या प्रशिक्षण केंद्रामार्फत कार्य सुरू आहे. अजितदादांच्या पश्चात या केंद्रास त्यांचे नाव देऊन त्यांच्या कार्याची व स्मृतीची जपणूक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या केंद्रास अजितदादा पवार यांचे नाव देण्यात आले आहे." (Desi Cow Research and Training Centre)
 
हेही वाचा :  मंत्र्यांना विमान प्रवासासाठी मुख्यमंत्र्यांची मंजूरी बंधनकारक;इंधन बचतीसाठी राज्य सरकारचा निर्णय
 
ते पुढे म्हणाले की, “देशी गायींचे संवर्धन, संशोधन आणि प्रशिक्षणाला चालना देण्यासाठी राज्य शासन सक्षमपणे काम करत आहे. पुण्यातील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राला दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे नाव देण्यात आल्याने या कार्याला आणखी नवी ओळख आणि बळ मिळेल." (Desi Cow Research and Training Centre)
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....