बंगालमधील 'भगव्या लाटे'मुळे बांग्लादेशात खळबळ! सीमाबंदीच्या निर्णयाने कट्टरपंथीयांमध्ये कमालीची अस्वस्थता

    13-May-2026   
Total Views |

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : पश्चिम बंगालमध्ये हिंदुत्ववादी सरकार स्थापन झाल्यानंतर बांग्लादेशमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. काही ठिकाणी बंगालमधील नव्या सरकारविरोधात रस्त्यावर आंदोलन सुरू झाले आहे, तर काही कट्टरपंथी मौलवी राज्याचे नवे मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांना उघडपणे जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत. केवळ कट्टरपंथी मौलवीच नव्हे, तर बांग्लादेश सरकारमधील महत्त्वाच्या पदांवर असलेले काही अधिकारीदेखील या घडामोडींमुळे अस्वस्थ असल्याचे दिसत आहे.

यामागील कारण केवळ सरकार बदलणे किंवा एका पक्षाऐवजी दुसऱ्या पक्षाचे सत्तेत येणे इतकेच नाही, तर या सत्तांतरामुळे बंगालमध्ये घडणारा व्यापक वैचारिक बदल आहे. भारत-बांग्लादेश खुली सीमा ही दीर्घकाळ घुसखोरांसाठी प्रवेशद्वारासारखी वापरली जात होती. ममता बॅनर्जी यांच्या सरकारने सीमाभागातील कुंपणबंदीला विरोध केला होता; मात्र आता परिस्थिती बदलली आहे. मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी सीमाभागातील कुंपणबंदीला प्राधान्य दिले असून, यामुळे कट्टरपंथी गटांची अस्वस्थता वाढत असल्याचे मानले जात आहे.

बंगालमध्ये सत्ता हाती घेतल्यानंतर मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी भारत-बांग्लादेश सीमासुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले. नव्या सरकारने निर्णय घेतला की, ज्या भागांमध्ये अद्याप कुंपणबंदी पूर्ण झालेली नाही, त्या भागांसाठी आवश्यक जमीन ४५ दिवसांच्या आत सीमा सुरक्षा दलाला (BSF) हस्तांतरित करण्यात येईल. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, सीमासुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. या निर्णयामुळे सीमाभागात होणारी घुसखोरी, जनसांख्यिकी बदलण्याचे कथित प्रयत्न, पशुतस्करी आणि इतर बेकायदेशीर नेटवर्कवर आळा बसेल, असा सरकारचा दावा आहे.

शुभेंदू सरकारच्या या निर्णयानंतर बांग्लादेशमध्ये अस्वस्थता वाढल्याचे दिसून आले. बांग्लादेशातील इस्लामी कट्टरपंथी संघटनांमध्येही खळबळ उडाली आहे. काही कट्टरपंथी गटांनी रस्त्यावर उतरून बंगालमधील नव्या सरकारविरोधात आंदोलन सुरू केले आहे. एका व्हायरल व्हिडिओमध्ये ‘इन्साफ कायमकारी छात्र श्रमिक जनता’ या कट्टरपंथी संघटनेशी संबंधित एका मौलवीने हिंदूविरोधी वक्तव्य करत म्हटले की, “भारताचे ४० कोटी मुस्लिम संतापले तर हिंदू वाचणार नाहीत.” त्याने पाकिस्तानच्या मदतीने भारतावर हल्ला करून “तीन तासांत ताबा मिळवण्याची” धमकीही दिली.

प.बंगालमध्ये भाजप सत्तेत आल्यानंतर सीमापार चालणाऱ्या कथित बेकायदेशीर व्यवहारांवर आणि त्यांना मिळणाऱ्या राजकीय संरक्षणावर अवलंबून असलेल्या घटकांमध्ये घबराट निर्माण झाल्याचे चित्र आहे. बांग्लादेशातील कट्टरपंथी संघटना, धार्मिक नेते आणि काही सरकारी अधिकाऱ्यांच्या प्रतिक्रियांकडे याच संदर्भात पाहिले जात आहे. बंगालमध्ये कठोर प्रशासकीय व्यवस्था लागू झाल्यास आतापर्यंत सुरू असलेल्या बेकायदेशीर कारवायांवर नियंत्रण येऊ शकते, अशी भीती त्यांना वाटत असल्याचे म्हटले जात आहे.






ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक