
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : छत्रपती संभाजीनगर येथील एआयएमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या घरावर आणि कार्यालयावर बुधवारी बुलडोझरची कारवाई करण्यात आली. अवैध बांधकामाच्या प्रकरणात महानगरपालिकेकडून सदर कारवाई करण्यात आली. नाशिकच्या कॉर्पोरट जिहाद प्रकरणातील आरोपी निदा खान हिला ७ मे रोजी छत्रपती संभाजीनगर येथून अटक करण्यात आली. मतीन पटेल यांनी तिला आपल्या घरात आश्रय दिल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यानंतर ९ मे रोजी महानगरपालिकेने अवैध बांधकामाबाबत नोटीस बजावून ७२ तासांत उत्तर मागितले होते.
अशी माहिती आहे की, मतीन पटेल यांच्यावर आरोपी निदा खान हिला नारेगाव येथील कौसर पार्क परिसरातील आपल्या घरात आश्रय दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणात नाशिक पोलिसांनी त्यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम २४९ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. निदा खानला अटक केल्यानंतर पोलिसांनी मतीन पटेल यांनाही ताब्यात घेऊन चौकशी केली होती.
नाशिकच्या आयटी कंपनीत काम करणाऱ्या काही महिलांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. एसआयटी चौकशीतून असे लक्षात आले की, पहिली एफआयाआर मार्च रोजी देवलाली कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. त्यानंतर आणखी ८ महिलांनी तक्रारी नोंदवल्या. त्यांच्या जबाबांमधून लैंगिक शोषण, जबरदस्ती आणि धार्मिक भावना दुखावल्याचा एक ठरावीक पॅटर्न समोर आला.
कारवाईदरम्यान परिसरातील काही महिला महानगरपालिका अधिकाऱ्यांसमोर फुले घेऊन पोहोचल्या आणि त्यांनी अधिकाऱ्यांचे स्वागत केले. महिलांनी अधिकाऱ्यांना भारतीय संविधानाच्या प्रतीही भेट दिल्या. कायद्याचे पालन झाले पाहिजे, मात्र कारवाई ही संविधान आणि न्यायप्रक्रियेच्या चौकटीत राहूनच व्हायला हवी, असे त्यांचे म्हणणे होते. महिलांच्या या अनोख्या आंदोलनाने संपूर्ण परिसराचे लक्ष वेधून घेतले. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आणि संपूर्ण परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. बुलडोझर कारवाईदरम्यान स्थानिक नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. त्यामुळे प्रशासन अत्यंत सतर्कतेने परिस्थिती हाताळताना दिसून आले.
एफआयआर नुसार निदा खानवर व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांवर नमाज पठण करण्यासाठी आणि मांसाहार करण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप आहे. महिलांना इस्लामी परंपरेनुसार कपडे घालणे आणि वागणे याबाबतही सूचना दिल्या जात असल्याचे समोर आले आहे. निदा खानने अटकपूर्व जामिनासाठी आपल्या गर्भावस्थेचा आधार घेतला होता, मात्र न्यायालयाने तो युक्तिवाद फेटाळून लावला. या प्रकरणावर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ने गेल्या महिन्यात निवेदन जारी करत म्हटले होते की, कंपनी कोणत्याही प्रकारच्या छळ आणि जबरदस्तीविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ धोरणावर काम करते.
आतापर्यंत अटक करण्यात आलेल्यांमध्ये आसिफ अन्सारी, शफी शेख, शाहरुख कुरेशी, रजा मेमन, तौसीफ अत्तर आणि इतरांचा समावेश आहे. ऑपरेशन मॅनेजर अश्विन चेनानी यांनाही अटक करण्यात आली आहे. एसआयटी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करत असून १२ हून अधिक संभाव्य पीडितांची ओळख पटवण्यात आली आहे. सध्या पोलिस या नेटवर्कचे इतर संबंध आणि बाह्य दुव्यांचीदेखील चौकशी करत आहेत. या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.