पंतप्रधान मोदी यांच्या वर्क फ्रॉम होम आवाहानाचे आयटी क्षेत्राकडून स्वागत; वर्क फ्रॉम होम अनिवार्य करण्याची आयटी कर्मचारी परिषदेची मागणी

    12-May-2026
Total Views |
IT Sector Welcomes Prime Minister Modi
 
नवी दिल्ली : (Work From Home Appeal) वैश्विक संकटकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहानाला देशातील उद्योगजगताने सकारात्मक प्रतिसाद दिला असून , माहिती व तंत्रज्ञान कर्मचारी परिषदेने वर्क फ्रॉम होमला पाठींबा दर्शवला आहे. राष्ट्रीय हित साधण्यासाठी वर्क फ्रॉम होम आवश्यक असून, ते अनिवार्य करण्याचे पत्रक सरकारने प्रसिद्ध करण्याची मागणी केली आहे.(Work From Home Appeal)
 
पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत असून, त्यामुळे इंधन संकटही वाढत आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी भारतीयांना विविध नियम पाळण्याचे आवाहन करताना, त्यात घरातूनच काम करण्याचे आवाहन केले होते. कोविड काळामध्ये दीर्घकाळ भारतीयांनी अशापद्धतीनेच काम केले होते. घरातूनच काम केल्याने मोठ्या प्रमाणावर इंधन बचत होईल, असेही पंतप्रधान मोदी यांनी म्हटले होते.
 
 
देशातील माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्राकडून या सूचनेचे स्वागत करण्यात आले असून, राष्ट्रहितासाठी घरातून काम करणे अनिवार्य करण्याबाबतही केंद्र सरकारकडे मागणी करण्यात आली आहे. केंद्रीय कामगार मंत्री मनसूख मांडवीय यांना पत्र लिहून माहिती व तंत्रज्ञान कर्मचारी परिषदेने अशी मागणी केली. या पत्रामध्ये कर्मचारी परिषदेने घरातून काम करणे, ऑनलाईन बैठकांचे आयोजन करणे कंपन्यांना अनिवार्य करण्याबाबत पत्र प्रसिद्ध करण्याची मागणी केली आहे. या संवेदनशील काळात राष्ट्रीय जबाबदारी म्हणून ही पाऊले आवश्यक असल्याचेही कर्मचारी परिषदेने म्हटले आहे.
 
तसेच, अशा पद्धतीचे काम कोविड काळात केल्याने माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्राला याचा पूर्वानुभव आहे. त्याचा लाभ या काळात होऊन, या क्षेत्राचे अर्थव्यवस्थेतील योगदानास हानी पोहचणार नसल्याचा विश्वासही कर्मचारी परिषदेने व्यक्त केला आहे.(Work From Home Appeal)