नागपूर : (Use Of Government Aircraft) अमेरिका-इराण युद्धामुळे उद्धवलेल्या इंधन टंचाईमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काटकसर करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे राज्यातील मंत्र्यांना सरकारी विमानाचा वापर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लेखी मंजूरी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी या निर्णयाबद्दल माहिती दिली.
माध्यमांशी बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "एखाद्या वेळी तातडीची आवश्यकता असल्यास विमानाने प्रवास केला जातो. मी वर्षभरात ४ ते ५ वेळाच विमान प्रवास केला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री व्यस्त असल्याने तेच विमान वापरतात. अन्यथा, राज्यातील खूप कमी मंत्री विमान वापरतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांना सल्ला दिला आहे. आता सर्व मंत्र्यांना विमान वापरण्यासाठी मुख्यमंत्र्यांची मंजूरी घ्यावी लागते. त्याशिवाय त्यांना विशेष विमान वापरता येत नाही. माझ्या जास्तीत जास्त बैठका ऑनलाईनच होतात. मी जिल्हाधिकारी किंवा अधिकाऱ्यांना फार बोलवत नाही. ऑनलाईन बैठका घेऊनच तोडगा काढतो." (Use Of Government Aircraft)
विरोधकांनी केलेल्या टीकेवर बोलताना ते म्हणाले की, "बाळासाहेब थोरात आणि टीका करणाऱ्यांना माझा सवाल आहे की, महात्मा गांधी यांनी स्वदेशीचा नारा दिला होता, हा नारा पुढे नेणे चूक आहे का? पंतप्रधान मोदी यांनी स्वदेशीचा वापर जास्त करा, असे सांगितले. पेट्रोल, डिझेलला इथेनॉलचा तर, गॅस सिलिंडरला सौर ऊर्जेवरील शेगडीचा पर्याय आहे. आपल्या पूर्वजांनी स्वदेशीचा नारा दिला, तोच आता मोदीजींनी दिला. महात्मा गांधीजींनीही हाच नारा दिला होता. मग विरोधक महात्मा गांधीजींवरही टीका करतील का? यामध्ये कुणीही राजकारण करू नये. आम्हीसुद्धा आमच्या वाहनांच्या ताफ्यातील गाड्या कमी करू. त्यामुळे नुसता विरोधासाठी विरोध न करता मोदीजींनी केलेल्या आवाहनाला सकारात्मकतेने घ्यावे." (Use Of Government Aircraft)
कोराडी येथे हनुमंतांची भव्य मुर्ती
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "कोराडी महालक्ष्मी मंदिराजवळ २०६ फूट उंच असलेली हनुमंताची मुर्ती विराजमान झाली असून अंतिम काम सुरु आहे. यातील हनुमंतांची गदा ही ७४ फूटांची आहे. या गदाचे डिझाईन गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमीत शाह यांच्या हस्ते या मुर्तीचा लोकार्पण सोहळा होणार आहे.
आम्ही हनुमान चालीसाच्या माध्यमातून 7D चे प्रक्षेपण करतो आहोत. यात हनुमान चालिसा दिसेल आणि मुर्ती वेगवेगळ्या रुपात दिसेल. मुर्तीच्या खालच्या भागाला असलेल्या गुफेत हनुमानजींचे १७ ते १८ महत्वाच्या क्षणांचे प्रदर्शन करण्यात येईल. मध्य भारतात हनुमानजींची उंच मुर्ती असावी, अशी आमची भावना होती. हे काम आता पुर्णत्वास आले आहे. याबद्दल मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे आभार मानतो. येत्या जून महिन्यात याचे उद्घाटन होईल."
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....