तामिळनाडूत अण्णा द्रमुक पक्षात फूट, बंडखोर ३० आमदारांचा मुख्यमंत्री विजय यांना पाठिंबा
12-May-2026
Total Views |
चेन्नई : (Tamilnadu Politics 2026) तामिळनाडूचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांचं सरकार स्थिर झालंय. अण्णा द्रमुक पक्षात दोन गट पडले असून, फुटीनंतर ४७ पैकी ३० आमदारांनी मुख्यमंत्री विजय यांच्या तमिळगा वेत्री कळगण म्हणजेच टीव्हीके पक्षाला पाठिंबा दिल्याचं जाहीर केलंय. अण्णा द्रमुक पक्षाचे नेते सी व्ही षणमुगम यांनी हा पाठिंबा जाहीर केलाय.
अण्णा द्रमुकचे नेते षणमुगम म्हणाले की, तामिळनाडूच्या जनतेनं दिलेला कौल आम्ही स्वीकारतो आहोत. जनतेचा कौल विजय यांच्यासाठी असल्यानं टीव्हीके सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय. जर द्रमुकशी आघाडी केली असती तर अण्णा द्रमुक पक्षाचं अस्तित्वच संपुष्टात आलं असतं, असंही ते म्हणालेत.
अण्णा द्रमुक पक्षात कशी पडली फूट?
तामिळनाडूत झालेल्या विधानसभा निवडणुकांत अण्णा द्रमुक पक्षाला सत्ता मिळवता आली नाही. त्यांना निवडणुकांत ४७ जागांवर समाधान मानावं लागलं. २०१९ सालापासून तीन विधानसभा आणि दोन लोकसभा निवडणुकांत सलग पाच वेळा पराभवाला सामोरं जावं लागल्यानं पक्षात अविश्वास निर्माण झालाय. सरचिटणीस असलेल्या एडप्पादी पलानीसामी यांच्या नेतृत्वाला पक्षातून विरोध होतोय. या विधानसभा निवडणुकांसाठी अण्णाद्रमुक पक्षानं भाजपशी युती केली होती. मात्र पलानीसामी आणि भाजपातील मतभेदांचा फटका निकालात दिसला. निकालात आलेल्या अपयशानंतर पलानीसामी यांच्या निर्णय प्रक्रियेवर नाराज असलेल्या आमदारांचा गट सक्रिय झाला आणि या बंडखोर आमदारांनी टीव्हीके सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.(Tamilnadu Politics 2026)
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत विजय यांच्या टीव्हीके पक्षाचं संख्याबळ जास्त असलं तरी सत्ता स्थापनेसाठी आवश्यक आमदारांचं बळ सुरुवातीला त्यांच्याकडे नव्हतं. अशा स्थितीत द्रमुक आणि अण्णाद्रमुक या विरोधी पक्षांनी एकत्रित येऊन सरकार स्थापन करावं अशी चर्चाही सुरु झाली होती. याला अण्णा द्रमुकतील अनेक आमदारांचा विरोध होता. गेल्या ५३ वर्षांपासून ज्या द्रमुकविरोधाचं राजकारण अण्णा द्रनुकनं केलं, त्यांच्याशी हातमिळवणी करणं म्हणजे पक्षाचं अस्तित्व संपवण्यासारखं असल्याचा मतप्रवाह पक्षात होता.(Tamilnadu Politics 2026)
आता बंडखोर आमदारांनी पलानीसामी हेच आपले नेते आहेत असं सांगत, भविष्यात कुणाशीही युती-आघाडी न करता पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं सांगितलंय. पक्षाला बळकटी मिळवण्यासाठी सत्ताधारी टीव्हीकेला पाठिंबा देत असल्याची भूमिका बंडखोरांनी घेतलीय. बंडखोर आमदारांच्या या भूमिकेमुळे अण्णा द्रमुक पक्षात आता केवळ पलानीसामी आणि १७ आमदार राहिलेत.(Tamilnadu Politics 2026)