Madgulkar Family: गदिमांच्या 'पंचवटी'वरुन महाभारत का पेटलं?

माडगूळकर कुटुंबातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

    12-May-2026
Total Views |

gadima

मुंबई : (Madgulkar Family) महाराष्ट्राचे वाल्मिकी अशी ओळख असलेल्या ग दि माडगूळकरांनी ज्या वास्तूमध्ये गीतरामायण रचले, त्याच वास्तूवरुन सध्य माडगूळकरांच्या कुटुंबातील अंर्तगत कलह सध्या चव्हाट्यावर आला आहे. पैशांच्या लालसेपोटी घरातील मंडळींकडूनच ही वास्तू बिल्डरला विकण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा गंभीर आरोप गदिमांचे नातू सुमित्र माडगूळकर यांनी आपली आई शीतल माडगूळकर यांच्यावर केला आहे. सोशल मीडियावर एक सविस्तर पोस्ट लिहून त्यांनी हे आरोप केलेत.

फेसबुकवर सविस्तर पोस्ट लिहीत सुमित्र माडगूळकर (गदिमांचे नातू) म्हणाले की गदिमांनी हयात असताना असे म्हंटले होते की जोपर्यंत माझे घर पंचवटी आहे तो पर्यंत माझे अस्तित्व या जगात राहील. त्यांची हीच पवित्र वास्तू "पंचवटी" पाडण्यास विरोध करीत आल्यामुळे मी व माझ्या कुटुंबाच्या (मी,माझी बायको व छोटी मुलगी) जीवाला धोका व माझी खोटी बदनामी करण्याचे कुभांड रचले जात आहे. माझ्यावर गेले काही महिने याच्यावरून दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे त्याला मी माझ्या जीवात जीव असे पर्यंत विरोध करतो आहे विरोध करणार आहे.गदिमांची वास्तू मी पाडू अथवा विकू देणार नाही. गेली १० वर्षे मी गदिमांच्या स्मारकासाठी लढतो आहे व माझ्या लढ्यामुळे स्मारकाची इमारत आता पूर्ण झाली आहे,आतल्या कामाला आता सुरुवात होईल.गदिमांचे स्मारक जितके महत्त्वाचे आहे तितकीच गदिमांची पंचवटी माझ्या साठी एक देऊळ आहे,या लोकांनी माझी कितीही बदनामी केली,माझा जीव जरी घेतला तरी ही वास्तू मी पाडू देणार नाही.

यावर प्रतिउत्तर देताना शितल श्रीधर माडगूळकर यांनी सुमित्र श्रीधर माडगूळकर यांच्या वागणुकीवर तीव्र आक्षेप घेत त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पंचवटीच्या देखभालीसाठी किंवा दुरुस्तीसाठी कधीही आर्थिक मदत न करता उलट वडिलांच्या कामात विरोध दर्शवणे, घराचा पडलेला भाग दुरुस्त करण्याकडे दुर्लक्ष करणे आणि सध्याही अंगण झाडण्यापासून ते ड्रेनेजच्या कामापर्यंतच्या जबाबदाऱ्या झटकणे, असे अनेक मुद्दे या वादाच्या केंद्रस्थानी आहेत. वडिलांनी मालमत्तेचे मृत्युपत्र (Will) आपल्या नावे केल्याचे समजताच सुमित्र यांनी त्यात ५० टक्के हिश्शाची मागणी केली आणि घरासाठी बिल्डर शोधण्यात पुढाकार घेतला, असा खळबळजनक दावाही करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर, अडचणीच्या काळात मदत करणाऱ्या आई, बहीण आणि मेव्हण्याबद्दल अर्वाच्य भाषा वापरून सुमित्र यांनी कौटुंबिक नात्यांचा अवमान केला असल्याचे पोस्टमध्ये नोंदवण्यात आले आहे. शितल माडगूळकर यांच्या पोस्टला उत्तर देताना सुमित्र माडगूळकर म्हणाले की ज्या खोलीत गदिमांचे २४ वर्षे वास्तव्य होते, त्या खोलीला बाहेरून कुलूप लावून तिची 'अडगळीची खोली' करण्यात आली असून तिथे धूळ आणि मोडके फर्निचर साचल्याचा दावा सुमित्र यांनी केला आहे. आपण ही खोली साफ करायला गेल्यास आपल्यावर घरफोडीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली जाते, असा आरोपही त्यांनी केला आहे.

गदिमांच्या कुटुंबार अन्याय होणार नाही : अॅड आशिष शेलार
या वादावर भाष्य करताना राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार म्हणाले की गदिमा ( गजानन दिगंबर माडगूळकर) आमचं महाराष्ट्राचं देशाचं वैभव आहेत. त्यांच्या असलेल्या सर्व वस्तू आणि त्यांच्या कोणत्याही मिळकतीवर अन्याय होणार नाही हे पाहणे आमची जबाबदारी आहे. मी त्यांच्या कुटुंबाशी संपर्क साधून जो कायदेशीर आणि न्यायिक मार्ग असेल तो घेईन.