संवादाचा विश्वासू दुवा

    12-May-2026   
Total Views |
Vinod Sadavilkar
 
मुंबई महापालिकेतील जबाबदारी सांभाळताना रुग्णसेवा, जनजागृती आणि सामाजिक समन्वयाच्या माध्यमातून सामान्य नागरिकांशी ऋणानुबंध प्रस्थापित केलेल्या विनोद साडविलकर यांचा प्रवास...
 
मुंबईसारख्या शहरात शासकीय यंत्रणा आणि सामान्य नागरिकांमध्ये अनेकदा संवादाचा अभाव जाणवतो. रुग्णालयातील प्रक्रिया, नागरी सुविधा, शासकीय योजना किंवा कामगारांचे प्रश्न यामध्ये अनेक नागरिक योग्य माहितीअभावी अडचणीत सापडतात. अशा परिस्थितीत प्रशासन आणि समाज यांच्यामध्ये दुवा म्हणून काम करणार्‍या व्यक्तींमध्ये विनोद साडविलकर यांचे कार्य विशेष आहे.
गेली ३२ वर्षे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन शहर विभागात कार्यरत असलेले विनोद साडविलकर सध्या तांत्रिक समयलेखक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महापालिकेतील कामकाज, नागरिकांच्या अडचणी आणि प्रशासनातील प्रक्रिया यांची प्रत्यक्ष माहिती असल्याने त्यांनी अनेकदा सामान्य नागरिकांना मार्गदर्शन करण्याचे काम केले.
 
डी. एस. हायस्कूल, सायन येथे त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर ‘ज्ञानविकास नाईट कॉलेज’मध्ये बारावीपर्यंत शिक्षण घेत त्यांनी ‘आयटीआय, मुलुंड’ येथे तांत्रिक प्रशिक्षण पूर्ण केले. वडील स्वदेशी मिलमध्ये कामगार असल्याने श्रमिक जीवनातील वास्तव त्यांनी जवळून पाहिले. सामान्य कुटुंबातील संघर्ष, कामगारांचे प्रश्न आणि मर्यादित परिस्थितीत जगणार्‍या माणसांच्या अडचणी, यामुळे सामाजिक भान अधिक दृढ होत गेले.
 
‘वाद नको, संवाद पाहिजे; समन्वयातून नागरी सुविधांचा लाभ पाहिजे,’ हा विचार त्यांनी आपल्या कामातून जपला. प्रश्न अधिक गुंतागुंतीचे करण्यापेक्षा संवादातून मार्ग काढण्यावर त्यांचा भर राहिला. प्रशासन आणि सामान्य नागरिक यांच्यामध्ये समन्वय निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी विविध स्तरांवर केला. अनेक वेळा लोकांच्या छोट्या अडचणी ऐकून घेऊन योग्य विभागापर्यंत त्या पोहोचविण्याचे काम त्यांनी शांतपणे केले आहे.
 
‘महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ’, ‘महाराष्ट्र राज्य नशाबंदी मंडळ’, ‘जिल्हा विधी सेवा प्राधिकरण’, समाजकल्याण विभाग, वाहतूक पोलीस, स्थानिक पोलीस, तसेच महापालिका समाज विकास विभाग यांच्या विविध उपक्रमांमध्ये त्यांनी सहभाग घेतला. जनजागृती, मार्गदर्शन आणि नागरिकांना आवश्यक माहिती उपलब्ध करून देण्याच्या कामात ते अग्रेसर असतात. त्यांच्या कार्यातील महत्त्वाचा भाग म्हणजे ‘रुग्णमित्र’ ही संकल्पना. मोठ्या शासकीय रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणार्‍या रुग्णांना प्रक्रिया, कागदपत्रे आणि विभागांची माहिती नसल्याने अनेक अडचणी निर्माण होतात. अशा वेळी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने त्यांनी ‘रुग्णमित्र’ उपक्रमांमध्ये सक्रिय भूमिका घेतली.
 
‘रुग्णमित्र स्नेहसंवाद’, ‘रुग्णमित्र संस्थाभेट’ आणि थेट चर्चा यांसारख्या उपक्रमांच्या माध्यमांतून त्यांनी सामाजिक संस्था आणि कार्यकर्त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. सामाजिक कार्यात समन्वय आणि माहितीचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांनी विविध मार्गदर्शन उपक्रम राबविले. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेमध्ये रुग्णमित्रांना शासकीय प्रक्रिया, नागरिकांचे अधिकार आणि सेवाकार्यातील जबाबदार्‍या याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच ‘मेडी हेल्प : वैद्यकीय साहाय्य’ आणि ‘बृहन्मुंबईतील सेवा, सुविधा, शुश्रूषा व वैद्यकीय साहाय्य’ या पुस्तकांसाठी त्यांनी माहिती-संकलनाचे काम केले. ‘रुग्णमित्र संस्थाभेट चर्चा थेट सामाजिक कार्यकर्ता मार्गदर्शन’ या पुस्तकाचे प्रकाशन विधानसभेचे अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर यांच्या हस्ते झाले असून, नागरिकांची सनद, ‘माहिती अधिकार कायदा’ आणि ‘लोकसेवा हक्क हमी कायदा’ याविषयी कार्यशाळा आयोजित करण्याचाही त्यांचा प्रयत्न आहे.
 
महापालिकेतील माहिती सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने त्यांनी ‘महापालिका कर्मचारी विभागातील माहिती पोहोचविणार घरोघरी’ हा उपक्रम राबविला. ‘निर्मला निकेतन स्कूल ऑफ सोशल वर्क, गोरेगाव’ येथील विद्यार्थ्यांना महापालिकेच्या ‘बी’ विभाग कार्यालयाला भेट घडवून प्रशासनाची प्रत्यक्ष कार्यपद्धती समजावून सांगण्याचे कामही त्यांनी केले. कुर्ला (प.) येथील श्री काळा दत्त मंदिराशी त्यांचा दीर्घकाळ संबंध राहिला. आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि स्वयंरोजगार या विषयांवर समाजात अधिक जनजागृती व्हावी, यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. प्रबोधन, मार्गदर्शन, दक्षता, सेवा आणि सुरक्षितता ही पंचसूत्री त्यांनी आपल्या सामाजिक कार्याचा आधार बनविली. समाजातील वंचित घटकांपर्यंत आवश्यक माहिती आणि मार्गदर्शन पोहोचणे महत्त्वाचे असल्याचे ते मानतात. त्यांच्या कार्याची दखल घेत, ‘मुलखा वेगळी माणसं’, ‘रुग्णमित्र’ यांसारख्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. सध्या ते ‘म्युनिसिपल मजदूर युनियन’मध्ये संघटक म्हणून कार्यरत असून, कामगारांचे प्रश्न आणि संघटनात्मक कार्यामध्येही सक्रिय भूमिका बजावत आहेत.
 
आजच्या काळात प्रसिद्धीपेक्षा प्रत्यक्ष माणसांमध्ये राहून काम करणारी माणसं वेगळी ओळख निर्माण करतात. सामाजिक प्रश्न समजून घेत संवादातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार्‍या विनोद साडविलकर यांच्या सामाजिक आणि सेवाभावी प्रवासासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा!
 
९८६९४५०७२५




सागर देवरे

सागर देवरे, सामाजिक न्याय प्रतिनिधी, दैनिक मुंबई तरुण भारत.
शिक्षण : बी.ए. एल.एल.बी. (अभ्यासक्रम सुरू).
सामाजिक व पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असून विविध सामाजिक, शैक्षणिक व अन्य चळवळींवर वृत्तांकनाचा अनुभव.
समुदायाधारित प्रश्नांवर सातत्याने अभ्यासपूर्ण लेखन.
सामाजिक न्याय, हिंदू बहुजन समाजाचे प्रश्न व विद्यार्थी चळवळींवर विशेष लेखन.