पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या तळांना उद्ध्वस्त करणार्या भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ची अगदी जागतिक स्तरावरही दखल घेतली गेली. नुकतीच या ‘ऑपरेशन’ची वर्षपूर्तीही झाली. पण, त्यानिमित्ताने चीनने पाकिस्तानला तांत्रिक साहाय्य केल्याचे उघडकीस आले आहे. एरवीही चीन पाकिस्तानच्या मदतीला धावतोच. पण, आता पाकिस्तानातील सैन्यासह दहशतवाद्यांनाही चीनचे अभय असल्याचे यावरुन सिद्ध झाले. तेव्हा या ‘टू फ्रंट वॉर’साठी भारताला सदैव सावध राहावे लागेल.
पाकिस्तानसमवेत झालेल्या संघर्षादरम्यान किंवा पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादी हल्ल्यांच्या वेळी चीनने कधीच भारताची बाजू घेतल्याचे दिसून आलेले नाही. अगदी संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानचा निषेध करायची वेळ आली असताना, आपला विशेषाधिकार वापरून चीनने पाकिस्तानला नेहमीच आपल्या पदराखाली घेतले, हा इतिहास आपण जाणतोच. त्यामुळे भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी आणि त्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यासाठी जी ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहीम हाती घेतली होती, त्यादरम्यान चीन पाकिस्तानविरुद्ध भूमिका घेणे शक्यच नव्हते. आता चीनने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या काळात आपण पाकिस्तानची बाजू घेतली होती, याची थेट कबुलीच दिली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ला एक वर्ष उलटून गेल्यानंतर चीनने आपण पाकिस्तानला पाठिंबा दिला होता, याची कबुली दिली. तसेच ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान चीनच्या तंत्रज्ञांनी पाकिस्तानला तांत्रिक सहकार्य केले होते, याचीही माहिती चीनच्या सरकारी माध्यमांनी दिली आहे. भारताच्या दहशतवादी मोहिमांना मोडता घालण्यासाठी चीनने थेट भूमिका बजाविली होती, हेच यावरून दिसून येते. चीनच्या लष्करी ‘हार्डवेअर’च्या विश्वासार्हतेबद्दल जागतिक पातळीवर शंका उपस्थित केल्या जात असतानाच, चीनकडून ही कबुली दिली गेली. चीनची लष्करी ‘हार्डवेअर’ पाकिस्तान, इराण, व्हेनेझुएला या देशांमध्ये असफल ठरल्याची सर्वत्र चर्चा होत आहे.
चीनने प्रथमच भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या काळात पाकिस्तानला तांत्रिक मदत केल्याची जाहीर कबुली दिली. चीनच्या प्रसारमाध्यमांवरून ‘एव्हिएशन इंडस्ट्री कॉर्पोरेशन ऑफ चायना’शी संबंधित काही अभियंत्यांच्या मुलाखती प्रसृत करण्यात आल्या होत्या. त्यावरून ही माहिती उघड झाली. या मुलाखती लक्षात घेता, गेल्या वर्षी मे महिन्यात भारताने जी ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहीम हाती घेतली होती, त्या मोहिमेस मोडता घालण्यासाठी चीनने थेट मदत केली होती, हे स्पष्टपणे दिसून येते.
भारत-पाकिस्तानदरम्यान चार दिवसांचा जो लष्करी संघर्ष झाला, त्यावेळी आपण पाकिस्तानला तांत्रिक मदत केल्याची कबुली झांग हेंग नावाच्या एका अभियंत्याने या मुलाखतीत दिली. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या दरम्यान चीनने पाकिस्तानला पुरविलेली हवाई संरक्षण यंत्रणा कुचकामी ठरल्याचे दिसून आले. चीनची ही यंत्रणा लक्ष्यभेद करण्यात असफल ठरल्याचे दिसून आले. तसेच चीनकडून घेतलेली ‘जे-१० सी’ आणि ‘जेएफ-१७’ ‘ब्लॉक III’ प्रकारची लढाऊ विमानेही अपेक्षित परिणाम साधू शकली नाहीत. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या काळात पाकिस्तानला थेट लष्करी मदत करणार्या चीनने आपली लष्करी सामग्री ही कुचकामी असल्याचे दाखवून दिले आहे. इराण आणि व्हेनेझुएला येथील कारवायांमध्येही हे दिसून आले आहे. ही सर्व माहिती लक्षात घेता, ‘ऑपरेशन सिंदूर’च्या काळात चीन पाकिस्तानला हवी ती मदत करीत होता, हे सिद्ध होते. असे असले, तरी चीनची लष्करी सामग्री ही परिपूर्ण नसल्याचे यानिमित्ताने जगास दिसून आले. चीन आणि पाकिस्तान हे देश भारतास नेहमीच पाण्यात पाहत आले आहेत. त्यामुळे हे दोन्ही देश विश्वास ठेवण्याच्या लायकीचे नाहीत, हे यानिमित्ताने पुन्हा दिसून आले आहे.
‘जर ४० कोटी मुस्लीम भडकले तर...’
पाकिस्तान किंवा बांगलादेशमधील कोणीही मुल्ला-मौलवीने किंवा एखाद्या नेत्याने उठावे आणि भारतास धमक्या द्याव्यात, असे प्रकार अधूनमधून घडताना दिसून येतात. ‘कोणीही यावे आणि टिचकी मारून जावे’ अशी भारताची अवस्था आहे, असे या मुस्लीम नेत्यांना वाटत असावे. पण, भारत हा पूर्वीचा भारत राहिलेला नाही. जशास तसे उत्तर देणारा देश आहे, हे भारताने अलीकडील काळात दाखवून दिले. असे असले, तरी या इस्लामी नेत्यांचे डोळे अजून उघडत नसल्याचे दिसून येते. अशीच एक धमकी एका बांगलादेशी मौलवीने नुकतीच दिली. भारत आणि हिंदू समाजास धमकावत हा मौलवी म्हणतो की, "पाकिस्तान आणि भारतातील मुस्लीम अवघ्या तीन तासांमध्ये भारत ताब्यात घेऊ शकतील.” या मौलवीने आपल्या भाषणाची चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रदर्शित केली आहे. त्यावरून संतापाची लाट उसळली. स्वत:स ‘इन्साफ कायेम्कारी छात्रश्रमिक जनता’ या संघटनेचा नेता म्हणविणार्या या धर्मांध नेत्याने भारतातील हिंदू समाज आणि राजकीय नेत्यांविरुद्ध अनेक आक्षेपार्ह विधाने केली. पाकिस्तान आणि भारतातील मुस्लिमांच्या पाठिंब्याने अवघ्या तीन तासांत भारत ताब्यात घेता येऊ शकतो, अशी वल्गना या मौलवीने केली. "भारताचे २६ प्रांत आम्ही चिरडून टाकू आणि त्यासाठी भारतातील मुस्लीम पुरेसे आहेत,” असे त्याने म्हटले. "भारतातील ४० कोटी मुस्लीम भडकले, तर भारताचे अस्तित्वच राहणार नाही. भारतातील हिंदू जगूच शकणार नाही,” असेही या मौलवीने धमकाविले आहे. "सुवेंदू, मोदी, राजनाथ सिंह, हिमंता, योगी आदी नेत्यांनी मुस्लीम समाजाची माफी मागितली पाहिजे,” असे या मौलवीचे म्हणणे. पूर्व भारतात राजकीय आणि जातीय तणाव असण्याच्या पार्श्वभूमीवर ही चित्रफीत प्रदर्शित करण्यात आली, हे लक्षात घ्यायला हवे. प. बंगाल, आसाम या सीमावर्ती राज्यांमध्ये घुसखोरी, धार्मिक ध्रुवीकरण असे मुद्दे चर्चेत आहेत. तसेच हा भाग राजकीयदृष्ट्या संवेदनशील आहे. हे सर्व लक्षात घेता, एक बांगलादेशी मौलवी मुस्लीम समाजास भडकविण्याची भाषा बोलत असेल, तर वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत, हे समस्त हिंदू समाजाने लक्षात घ्यायला हवे. मात्र, संघटित हिंदू समाजाचा एक हुंकार अशा धर्मांधांची बोलती कायमसाठी बंद करण्यास पुरेसा आहे.
दोन दिवसांत ९७ लाख सिलिंडरचे वितरण!
प. आशियातील संघर्षामुळे जगातील विविध देशांसमोर भीषण तेलसंकट उभे राहिले आहे. या परिस्थितीवर मात करण्याचा प्रयत्न भारत करीत असून, त्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन जनतेला काटकसरीने राहण्याचे आवाहन केले आहे. एकीकडे असे आवाहन केले जात असताना, देशात पेट्रोल, डिझेल आणि वायुपुरवठा सुरळीत सुरू राहण्याच्या दृष्टीने सरकारने उपाययोजना केल्या आहेत. ‘एलपीजी’चा पुरवठा देशात सर्वत्र सुरळीत होईल, याची दक्षता सरकारने घेतली आहे. संकटकाळात भारत योग्य व्यवस्थापन कसे करू शकतो, हे ‘एलपीजी’च्या सुरळीत पुरवठ्यावरून दिसून आले आहे. भारताने अवघ्या दोन दिवसांमध्ये देशभरात ९७ लाख ‘एलपीजी’ सिलिंडर पोहोचविले. गेल्या दि. ८ मे रोजी केंद्र सरकारने जनतेला, ‘घाबरून खरेदी करू नका,’ असे आवाहन केले होते. देशात पेट्रोल, डिझेल, एलपीजीचा पुरेसा साठा आहे, असे सरकारकडून सांगण्यात आले होते. तसेच इतक्यात चिंता करण्यासारखी परिस्थिती नसल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले. स्वयंपाकाच्या गॅसची टंचाई नसल्याचे सरकारने आपल्या कृतीमधून दाखवून दिले. अवघ्या दोन दिवसांमध्ये देशाच्या विविध भागांमध्ये ९७ लाख सिलिंडर पोहोचविण्यात आल्याचे शासनाकडून सांगण्यात आले. हा आकडाच खरं तर थक्क करणारा आहे. देशाचा कारभार योग्य व्यक्तींच्या हातात असेल आणि सुशासन असेल, तर काय होऊ शकते हे या उदाहरणावरून लक्षात येते. प्रत्यक्षात नोंदणी ८७. ६६ लाख सिलिंडरची झाली असताना, त्यापेक्षा कितीतरी अधिक संख्येने या सिलिंडरचा पुरवठा सरकारकडून करण्यात आला. मध्यंतरी सिलिंडरसाठी अचानक मागणी वाढल्याचे दिसून आले. पण, कोणत्याही वितरकाकडे सिलिंडरचा खडखडाट असल्याचे आढळून आले नाही. याच काळात ५० हजार, ४०० ‘पीएनजी’धारकांनी आपल्याकडील ‘एलपीजी’ जोडणी परत केल्याची माहिती अधिकार्यांकडून देण्यात आली. पेट्रोलियम पदार्थांची टंचाई भासू नये म्हणून शासनाचे प्रयत्न सुरू आहेतच. पण, जनतेने काटकसरीची सवय ठेवावी, असे जे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे, तेही अत्यंत महत्त्वाचे आहे. पेट्रोलियम उत्पादनांचा वापर जपून करण्याचे जे आवाहन करण्यात आले आहे, त्यास जनतेने सकारात्मक प्रतिसाद देण्याची अत्यंत आवश्यकता आहे. असे झाल्यास आपण कोणत्याही संकटावर सहजपणे मात करू शकू.
९८६९०२०७३२