मुनीर, ‘ऑप. सिंदूर’ अजून सुरू आहे!

    12-May-2026
Total Views |
Operation Sindoor Pakistan Reality
 
गतवर्षी पाकी जनरल असीम मुनीरने भारताबद्दल गरळ ओकली होती. ‘काश्मीर हे आपले गळ्यातील हाड आहे’ असा दावा करून त्याने भारतीय (हिंदू) व पाकिस्तानी हे कधीच एकत्र राहू शकत नाहीत, काश्मीर घेतल्याशिवाय पण स्वस्थ बसणार नाही, असे म्हटले होते. त्या भाषणानंतर १५ दिवसांतच पहलगामचा हल्ला झाला. आताही या मुनीरने कारण नसताना पुन्हा एकदा भारतविरोधी वक्तव्य केले. पण, ‘ऑपरेशन सिंदूर’ अजूनही सुरूच आहे, याची त्याला आठवण करून देण्याची नितांत गरज आहे.
 
पाकिस्तानचा लष्करप्रमुख व स्वयंघोषित ‘फील्ड मार्शल’ जनरल असीम मुनीरने पुन्हा एकदा आपला फणा काढला आहे. रावळपिंडीतील काही लष्करी अधिकार्‍यांपुढे बोलताना त्याने गतवर्षी भारताबरोबर झालेल्या युद्धाचे कारण ‘दोन विचारसरणींतील संघर्ष’ असे केले आहे. तसेच या संघर्षात पाकिस्तान यशस्वी झाल्याचा दावाही केला. ‘ऑपरेशन सिंदूर’ला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त भारताने पाकिस्तानला इशारा दिला होता की, पाकिस्तानच्या कोणत्याही कोपर्‍यातील दहशतवाद्यांचा अड्डा भारताच्या मारक क्षमतेपासून दडून राहिलेला नाही. त्यानंतर रावळपिंडीत काही लष्करी अधिकार्‍यांसमोर बोलताना जनरल मुनीरने या युद्धात पाकिस्तानचा विजय झाल्याचा दावा केला.
 
भारताने पाकिस्तानशी चार युद्धे लढली. त्या सर्व युद्धांत भारताचा विजय झाला. सारे जग ही वस्तुस्थिती मान्य करते. पण, फक्त पाकिस्तानच या सर्व युद्धांमध्ये आपणच जिंकल्याचा दावा करीत असतो. १९७१च्या युद्धात तर पाकिस्तानच्या ९३ हजार सशस्त्र फौजेने शरणागती पत्करली होती. त्या जवानांना आपल्या पॅन्ट खाली उतरवाव्या लागल्या होत्या. पाकिस्तानचा बांगलादेशातील कमांडर नियाझी हा शरणागतीच्या कागदपत्रावर स्वाक्षरी करतानाचा फोटो तर जगप्रसिद्ध आहे. तरीही, या युद्धात आपणच जिंकल्याचा दावा पाकिस्तानने सोडलेला नाही. (एका अर्थी, तो दावा खराही आहे. कारण, प्रत्यक्ष लष्करी कारवाईत जरी भारताचा विजय झालेला असला, तरी नंतरच्या वाटाघाटींच्या टेबलावर भारताचा पराभव झाला होता. इतका मोठा लष्करी विजय मिळवूनही इंदिरा गांधींच्या कथित पोलादी नेतृत्वाला पाकिस्तानने पकडलेले भारताचे ५४ जवान आणि पाकव्याप्त काश्मीर काही परत घेता आले नव्हते किंवा पाकिस्तानकडून युद्धखर्चाची भरपाईही घेता आली नव्हती. असो).
 
गतवर्षीच्या युद्धात चारच दिवसांत भारताने आपली लष्करी कारवाई ताबडतोब थांबवावी आणि आपले अधिक नुकसान करू नये, यासाठी पाकिस्तानला अक्षरश: भीक मागावी लागली होती. भारताने ही कारवाई थांबवावी, यासाठी पाकिस्तानने आधी संयुक्त अरब अमिरातीला मधे घालण्याचा प्रयत्न केला. त्या देशाने यात मधे पडण्यास साफ नकार दिल्यावर पाकिस्तान आपल्या मायबाप अमेरिकेकडे भीक मागत गेला. अमेरिकेनेही त्याला थेट भारताशीच बोलणी करण्याचा सल्ला दिला, तेव्हा पाकिस्तानच्या ‘डीजीएमओ’ने दोनदा भारताच्या ‘डीएमओ’ला फोन लावला होता. भारतीय लष्कराने आपले लष्करी लक्ष्य आधीच साध्य केले असल्याने भारतालाही युद्ध लांबविण्याची गरज भासत नव्हती. त्यामुळे भारताने युद्धबंदी जाहीर केली. हा सारा केवळ वर्षभरापूर्वीचा इतिहास आहे. पण, आपल्या जनतेच्या नजरेत आपली छिन्नभिन्न झालेली प्रतिमा कायम राहावी, यासाठी पाकिस्तानने या युद्धात आपलाच विजय झाल्याचा दावा केला. तो खरा वाटावा, यासाठी लष्करप्रमुख जनरल असीम मुनीरला चक्क ‘फील्ड मार्शल’ हा किताब जाहीर केला गेला. पण, ही लबाडी अडाणी पाकिस्तानी जनतेत पचली, तरी जगाला खरी गोष्ट ठाऊक आहे.
 
या युद्धाला पाकिस्तानने ‘मार्का-ए-हक’ (म्हणजे हक्काची लढाई) असे नाव दिले आहे. "हे ‘मार्का-ए-हक’ म्हणजे केवळ दोन देशांतील वा दोन लष्करांमधील युद्ध नव्हते, तर दोन विचारसरणींमधील संघर्ष होता. अल्लाच्या कृपेने त्यात सत्याचा विजय झाला आणि खोटेपणाचा पराभव झाला. या संघर्षात पाकिस्तानची लष्करी रणनीती नेहमीच वरचढ राहिली,” असा दावा जनरल मुनीरने केला. इतया निर्लज्जपणे खोटा दावा करणार्‍या या माणसाशी कसला वाद घालायचा? मुनीर कोणत्या विचारसरणींची चर्चा करतो आहे? मुनीरची कसली आलीय विचारसरणी? दंगेधोपे करून बळजबरीने मिळविलेला प्रदेश आणि भिकेत मिळालेली शस्त्रास्त्रे यांच्या जोरावर पाकिस्तान फारच उड्या मारीत असतो. एका अर्थी, मुनीरचा दावा खराही आहे. कारण, मुनीरची विचारसरणी एकच आहे आणि ती म्हणजे दहशतवाद पसरविणे! उलट, भारत हा शांततेचा अग्रदूत आहे. गरज नसताना भारताविरुद्ध आगळीक केलेल्या पाकिस्तानच्या झोळीतही भारताने दयेची भीक घातली होती. त्यामुळे मुनीरच्या विचारसरणीच्या विरोधात ही लढाई होती, हे खरेच. फक्त मुनीरचा निष्कर्ष चुकीचा आहे. विजय सत्याचा, म्हणजे भारताचा झाला आहे. पाकिस्तानची दहशतवादाची विचारसरणी ही फक्त भारताविरोधात नसून, ती शेजारच्या अफगाणिस्तानविरोधातही आहे. पण, दोन्हीकडे त्याला जबरदस्त मार खावा लागला आहे.
 
स्वत:ला ‘फील्ड मार्शल’ म्हणवून घेणारा हा भ्याड जनरल, भारत जेव्हा हल्ले करीत होता, तेव्हा एका बंकरमध्ये (भूमिगत खोली) सुरक्षितपणे लपून बसला होता. या संघर्षाआधीच त्याने आपल्या कुटुंबीयांना लंडनला पाठवून दिले होते. म्हणजे त्याला स्वत:च्या जीवाची भीती तर होतीच; पण न जाणो, काही अघटित घडलेच; तर आपल्या कुटुंबीयांनाही त्याने सुरक्षित स्थळी हलविले होते. म्हणजे त्याचा आपल्याच फौजेच्या शौर्यावर विश्वास नव्हता आणि विजयाची खात्री नव्हती. ‘फील्ड मार्शल’ शब्दाचा अर्थ- युद्धाच्या वेळी प्रत्यक्ष रणभूमीवर राहून मार्गदर्शन करणारा नेता. पण, स्वत:ला बंकरमध्ये दडवून ठेवणारा हा मुनीर ‘फील्ड’ नव्हे, तर ‘बंकर मार्शल’ ठरला. या युद्धात सपशेल शरणागती पत्करल्यावरही आपलाच विजय झाला, असा दावा करणारा हा ‘फेल्ड मार्शल’ आहे.
 
आता वर्षभराने या संघर्षावरील म्हणजे, पाकिस्तानच्या आणखी एका अपमानास्पद पराभवावरील खपली निघाल्याने त्यावर मलमपट्टी करण्यासाठी मुनीरला ही सारवासारव करावी लागत आहे. पण, ‘ऑपरेशन सिंदूर’ अजून सुरूच आहे, याची त्याला आठवण करून दिली पाहिजे. म्हणजे त्याला पुन्हा एक सुरक्षित बंकर शोधायला वेळ मिळेल.
 
राहुल बोरगांवकर