'कोविड' महामारीच्या धक्क्यातून अगदी अलीकडेच जग कसेबसे सावरले होते, तोच आता ‘हंता’ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या बातम्या कानी येऊ लागल्या आहेत. ‘कोरोना’च्या तुलनेत अधिक मृत्युदराचा धोका असलेल्या या विषाणूचा प्रसार वाढत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले. अर्थात, याबद्दल त्यांचे करावे तेवढे कौतुक थोडेच. या विषाणूविषयी अधिकची माहिती देताना, या विषाणूच्या मूळ स्वरूपामुळेच याचा ‘कोविड’ इतका पसरण्याचा वेग नसेल, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. तरीही, त्यांनी याबाबत काळजी घेण्याचे आवाहनही जगातील सर्व देशांना केले आहे.
‘हंता’ व्हायरस हा विषाणूजन्य संसर्ग असून, त्याची लागण संक्रमित उंदरांकडून होते. अलीकडे समुद्रातील जहाजांवरून प्रवास करणार्या प्रवाशांना याची लागण होत असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. हा विषाणू सर्दी किंवा तापासारखा पसरत नाही, हीच त्यातील महत्त्वाची बाब. ‘हंता’ व्हायरसचा विषाणू उंदीर किंवा घुशींसारख्या प्राण्यांच्या मार्फत पसरला जातो. हे प्राणी याचे वाहक असून, या विषाणूचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम होईलच, असे नाही. याचा माणसाला होणारा संसर्ग उंदरांचे मूत्र, विष्ठा, लाळ यांच्या संपर्कात आल्याने होतो. लागण झालेल्या संक्रमितांपैकी काही लोकांमध्ये तो गंभीर आजारही निर्माण करू शकतो. अनेकदा त्याचे गंभीर परिणाम फुप्फुसे, हृदय, मूत्रपिंडे किंवा रक्तवाहिन्यांवर झालेले आढळतात. यामध्ये मुख्यत: दोन प्रकार असून, ‘हंता व्हायरस कार्डिओपल्मनरी सिंड्रोम’ हा प्रकार मुख्यतः फुप्फुसे आणि हृदयावर परिणाम करतो, तर ‘हॅमरेजिक फीव्हर विथ रेनल सिंड्रोम’ हा मुख्यतः मूत्रपिंडे आणि रक्तवाहिन्यांवर परिणाम करणारा ठरतो.
अलीकडे एका जहाजावर या विषाणूच्या समूहातील, ‘अँडीज’ विषाणू आढळल्याने ‘जागतिक आरोग्य संघटना’ सतर्क झाली होती. कारण, या व्यक्तीकडून व्यक्तीमध्ये संक्रमित झालेला हा एक दुर्मीळ प्रकार आहे. अर्थात, अशा घटना अत्यंत दुर्मीळ असल्याचेही जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले आहे. सध्या याच्या संसर्गामुळे जवळपास तीन लोकांचा मृत्यू झाला असून, काहींवर उपचार सुरू आहेत. मात्र, जागतिक आरोग्य संघटनेने अनेक देशांना सक्रिय होण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे युरोपातील देशांनी यासाठी कंबर कसली असून, विविध उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. भारतानेही त्यांच्या १६५ विशेष प्रगत प्रयोगशाळा सक्रिय केल्या आहेत. अमेरिकेमध्ये यावरून राजकारण तापले असून, ट्रम्प यांच्यावर टीका सुरू झाली आहे.
पदभार स्वीकारताच, जागतिक आरोग्य संघटनेतून ट्रम्प यांनी माघार घेतली होती. त्यामुळेच आज या विषाणूविरोधातल्या लढाईत अमेरिका मागे पडल्याची टीका या क्षेत्रातील अनेक तज्ज्ञांनी केली. तसेच जागतिक स्तरावर या आजाराविरोधातील संशोधनात अमेरिकेचे प्रतिनिधित्व दिसत नसल्याबद्दलही त्यांनी ट्रम्प यांच्या भूमिकेलाच जबाबदार धरले आहे.
या आजारामुळे ‘क्रूझ पर्यटन उद्योग’ पुन्हा एकदा लक्ष्य होताना दिसत आहे. समुद्रातील जहाजांवर हजारो लोक एकत्र असतात. सामूहिक भोजन व्यवस्था, वातानुकूलन, मर्यादित वैद्यकीय सुविधा आणि प्रवाशांतील निकट संपर्कामुळे संसर्गाचे नियंत्रण करणे कठीण होते. ‘कोविड’ काळातही अनेक क्रूझ संसर्गाची केंद्रे ठरली होती. ‘हंता’ व्हायरसच्या निमित्ताने ही भीती पुन्हा समोर आली आहे. या घटनेचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे पर्यावरणीय बदल. हवामानबदल, जंगलतोड आणि मानवी अतिक्रमणामुळे वन्यजीव व मानव यांच्यातील संपर्क वाढत आहे. परिणामी, प्राण्यांकडून मानवात पसरणार्या ‘झुनोटिक’ रोगांचे प्रमाण वाढण्याची भीती सातत्याने व्यक्त केली जाते आहे. ‘कोविड’, ‘इबोला’, ‘निपाह’ यांसारख्या संसर्गांनंतर ‘हंता’ व्हायरसनेही त्याच धोयाची आठवण करून दिली आहे. सध्या या आजाराचा प्रसार अत्यल्प असला, तरी सतत वाढणारा आहे. या आजाराबाबत विविध देशांतील तज्ज्ञांमध्ये मत-मतांतरे आढळून येत असून, काहींच्यानुसार, हा आजार एक नवी महामारी ठरेल; तर काहींच्या मते, हा घातक असला तरी महामारीचे रूप धारण करणार नाही. त्यामुळे काही अंशी सामान्य जनतेलाही याचे गांभीर्य समजणे कठीण झाले आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने ही संभ्रमित अवस्था दूर करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
कौस्तुभ वीरकर