भारतीय संस्कृतीने जगाला दिलेल्या अमूल्य देणगीपैकी एक म्हणजे गर्भसंस्कार. गर्भसंस्कारांची महती ही वैज्ञानिक प्रयोगाअंती वेळोवेळी सिद्ध झाली आहे. गर्भसंस्कारांच्या प्रक्रियेत संगीताचीही भूमिका तितकीच महत्त्वाची. त्याविषयी आजच्या लेखात माहिती जाणून घेऊया...
सूर, कंपन आणि चेतना यांतून घडतं व्यक्तिमत्त्व
मानवी जीवनाची सुरुवात गर्भातून होते. हीच ती सूक्ष्म अवस्था, जिथे व्यक्तिमत्त्वाची बीजं पेरली जातात. गर्भातील बाळ फक्त शारीरिक वाढ करत नाही, तर ते ध्वनी, भावना आणि ऊर्जा यांचाही अनुभव घेत असते. त्यामुळेच गर्भसंस्कारात संगीताला विशेष महत्त्व आहे.
स्वामी विवेकानंदांच्या बालपणातील एक प्रसंग सांगितला जातो. लहान वयात नरेंद्र एका संगीत सभेत होते. तेव्हा एका गायकाने सूर चुकवला आणि नरेंद्रांनी ते अचूक ओळखलं. त्यांनी स्वतः संगीताचं शिक्षण घेतलेलं नव्हतं, पण त्यांच्या आई गर्भावस्थेत संगीत साधना करत असे. या अनुभवाचा परिणाम त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर झालेला दिसतो. ही कथा केवळ प्रेरणादायी नाही, तर आजच्या विज्ञानाशीही सुसंगत आहे.
आधुनिक विज्ञान आणि भारतीय परंपरा
आजचं विज्ञान सांगतं की, गर्भातील बाळ आईच्या भावनांना, आवाजांना आणि वातावरणाला प्रतिसाद देतं. आई शांत, आनंदी असेल आणि मधुर संगीत ऐकत असेल, तर त्याचा सकारात्मक परिणाम बाळावर होतो.
संगीतामुळे मेंदूमध्ये ‘फील-गुड हार्मोन्स’ (डोपामिन, सेरोटोनिन) वाढतात. ताण कमी होतो, हृदयगती संतुलित राहते आणि मेंदूला चांगला ऑसिजन मिळतो. या सर्वांचा फायदा गर्भातील बाळालाही होतो.
रागांचे मनोविज्ञान : यमन आणि आसावरी
भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये प्रत्येक रागाचा एक भाव असतो.
राग यमन - शांतता, प्रसन्नता आणि आध्यात्मिकता देणारा.
राग आसावरी - करुणा, नम्रता आणि अंतर्मुखता वाढवणारा.
हे राग ऐकल्याने आईचं मन शांत राहतं, विचार सकारात्मक होतात आणि याचाच चांगला परिणाम बाळाच्या मानसिक आणि भावनिक विकासावर होतो.
तंतुवाद्यांची मधुर साधना
सरोद, संतूर, सितार, वीणा यांसारखी तंतुवाद्यं गर्भसंस्कारासाठी अत्यंत उपयुक्त मानली जातात. या वाद्यांच्या सूरांमध्ये सूक्ष्म कंपने असतात, जी मनाला थेट स्पर्श करतात. शब्दांशिवायही हे संगीत भावनांपर्यंत पोहोचतं. विशेषतः आलाप, ज्यात स्वर हळूहळू उलगडतात; मनाला ध्यानासारखी शांत अवस्था देतो. ही अवस्था गर्भातील बाळासाठी खूप लाभदायक असते.
सात सूर आणि शरीरातील ऊर्जा
आपल्या शरीरात सात ऊर्जाकेंद्रे (चक्र) असतात आणि त्यांचा संबंध संगीताच्या सात सूरांशी जोडला जातो,
- सा - स्थिरता
- म - प्रेम, करुणा
- नी - उच्च चेतना
विशेषतः ‘नी’ स्वर मन शांत करून विचारांना स्पष्टता देतो.
वारंवारतेचा प्रभाव
ध्वनी म्हणजे कंपन.
ॐचा नाद सुमारे २२० Hzच्या आसपास असतो, जो मनाला स्थिर करतो.
४४० Hz हा उच्च ‘सा’ चेतनेला उंचावतो.
या संतुलित कंपनांचा परिणाम मेंदूच्या कार्यक्षमतेवर होतो आणि शिकण्याची क्षमता वाढते.
वेळ, स्वर आणि गर्भसंस्कार
- भारतीय संगीत वेळेनुसार बदलतं.
- सकाळचे राग - ताजेपणा देतात
- संध्याकाळचे राग - संतुलन देतात
- रात्रीचे राग - विश्रांती देतात
- गर्भावस्थेतही टप्प्याटप्प्याने संगीत ऐकणं फायदेशीर-
- पहिल्या तीन महिन्यांत - कोमल स्वर
- पुढील काळात - शुद्ध स्वर
- शेवटच्या महिन्यांत - तीव्र मध्यम
- ऋतुनुसार मल्हारसारखे राग कधीही ऐकता येतात.
साहित्यिक भाव : सुरांमधून संस्कार
आई जेव्हा शांत मनाने संगीत ऐकते, तेव्हा ती फक्त स्वर ऐकत नाही, ती आपल्या बाळासाठी संस्कार निर्माण करत असते. प्रत्येक सूर, प्रत्येक कंपन बाळाच्या मनावर छाप सोडत असतो. हेच पुढे जाऊन बाळाच्या स्वभावात, संवेदनशीलतेत आणि विचारांमध्ये दिसून येतं.
सूरांमधून सृजन
गर्भसंस्कारात संगीत हे विज्ञान आणि कलेचं सुंदर मिश्रण आहे. योग्य पद्धतीने संगीत ऐकल्यास आई आणि बाळ दोघांचाही सर्वांगीण विकास होतो.
शेवटी एक सोपा मंत्र-
जसे सूर ऐकाल, तसे संस्कार घडतील;
जसे भाव जगाल, तसे भविष्य घडेल.
(लेखक मुंबई येथे सरोदवादक आहेत.)
(शब्दांकन: डॉ. मधुरा उदय कुलकर्णी)