‘डिमेन्शिया’विरुद्धच्या लढाईत ‘एआय’ची ढाल

    12-May-2026
Total Views |
AI Dementia Care Device
 
‘एआय’चा वापर गेल्या काही वर्षांत दैनंदिन जीवनापासून उद्योग, शिक्षण, प्रशासन आणि सुरक्षाव्यवस्थेपर्यंत झपाट्याने वाढताना दिसत आहे. त्यात आरोग्य क्षेत्रातील ‘एआय’चा विस्तार विशेष लक्षवेधी ठरला. आजारांचे निदान, त्यांचे विश्लेषण, औषधनिर्मिती यांसाठी आता ‘एआय’चा प्रभावी वापर सुरू झाला आहे. विशेषतः मेंदू आणि मानसिक आरोग्याच्या समस्यांमध्ये ‘एआय’ नवे पर्याय उपलब्ध करून देताना दिसतो. ‘आयआयटी, पटना’ येथील संशोधकांनी विकसित केलेले ‘डिमेन्शिया’वरचे ‘एआय वेअरेबल उपकरण’ ही त्याच बदलत्या आरोग्यव्यवस्थेची महत्त्वपूर्ण झलक ठरावी. त्यानिमित्ताने ‘डिमेन्शिया’ विकार आणि या उपकरणाचे होणारे लाभ याचा घेतलेला आढावा...
 
नवी आयुष्याचे सरासरी आयुर्मान वाढत असताना, आरोग्य व्यवस्थेसमोर उभ्या राहणार्‍या समस्यांचे स्वरूपही झपाट्याने बदलताना दिसते. एकेकाळी संसर्गजन्य रोगांवर केंद्रित असलेली वैद्यकीय व्यवस्था, आता विविध आजारांच्या वाढत्या ओझ्याशी झुंजताना दिसते. मधुमेह, हृदयरोग, कर्करोग यांच्यासोबतच मानसिक आणि न्यूरोलॉजिकल विकारही मोठ्या प्रमाणात वाढते आहेत. त्यात ‘डिमेन्शिया’ हा विकार जागतिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर चिंतेचा विषय ठरला आहे. स्मरणशक्ती हळूहळू कमी होणे, विचारक्षमता मंदावणे, निर्णय घेण्यात अडचणी निर्माण होणे आणि अखेरीस व्यक्तीचे सामाजिक व वैयक्तिक आयुष्य विस्कळीत होणे, अशी या विकाराची प्रक्रिया. विशेष म्हणजे, हा विकार केवळ रुग्णापुरता मर्यादित नसून, तो संपूर्ण कुटुंबव्यवस्थेवर मानसिक, आर्थिक आणि सामाजिक ताणही निर्माण करतो. अशा वेळी ‘डिमेन्शिया’वर ‘आयआयटी, पटना’ येथील संशोधकांनी विकसित केलेले कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ‘वेअरेबल उपकरण’ हे वैद्यकीय क्षेत्रातील महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
 
‘डिमेन्शिया’ हा एखादा एकमेव विकार नसून, मेंदूच्या कार्यक्षमतेतील र्‍हासाशी संबंधित विकारांचा समूह आहे. ‘अल्झायमर’ हा त्यातील सर्वाधिक सामान्य प्रकार. या आजारामध्ये मेंदूतील पेशींचे कार्य हळूहळू कमी होत जाते. सुरुवातीला व्यक्ती लहानसहान गोष्टी विसरू लागते. वस्तू कुठे ठेवल्या हे आठवत नाही, परिचित व्यक्तींची नावे विसरली जातात, एकाच प्रश्नाची वारंवार पुनरावृत्ती होते किंवा संवादात गोंधळ निर्माण होतो. अनेकदा ही लक्षणे वयानुसार होणारे बदल म्हणून दुर्लक्षित केली जातात. मात्र आजार जसजसा वाढतो, तसतशी व्यक्तीची निर्णयक्षमता, भावनिक स्थैर्य आणि दैनंदिन कामे करण्याची क्षमताही प्रभावित होते. काही रुग्णांमध्ये चिडचिड, नैराश्य, संशयी स्वभाव किंवा सामाजिक अलिप्तताही वाढू शकते.
 
जागतिक आरोग्य संघटनेनुसार, जगभरात कोट्यवधी लोक ‘डिमेन्शिया’ने प्रभावित आहेत, जगात वृद्ध लोकसंख्या वाढत असल्यामुळे, पुढील काही दशकांत हा आकडा आणखी वाढण्याची शयताही व्यक्त केली जाते. भारतातही वाढते आयुर्मान आणि बदलती जीवनशैली यांमुळेही हा आजार वेगाने वाढत आहे. मात्र, मानसिक आरोग्याबाबतची मर्यादित जागरूकता, तज्ज्ञ डॉटरांची कमतरता आणि खर्चिक तपासण्यांमुळे अनेक रुग्णांमध्ये आजार उशिरा ओळखला जातो. नेमके हेच ‘डिमेन्शिया’च्या उपचारांमधील सर्वांत मोठे आव्हान ठरते.
 
‘डिमेन्शिया’चे वेळेत निदान होणे अत्यंत महत्त्वाचे असते. कारण, आज उपलब्ध उपचारपद्धतींमुळे हा विकार पूर्णपणे बरा करता येत नसला, तरी त्याचा वेग कमी करता येतो. औषधोपचार, मानसिक व्यायाम, जीवनशैलीतील बदल आणि सातत्यपूर्ण वैद्यकीय देखरेख यांच्या मदतीने रुग्णाचे जीवनमान अधिक काळ टिकवून ठेवता येते. परंतु, बहुतेक वेळा रुग्ण डॉटरांकडे पोहोचतो, तेव्हा विकार खूप पुढे गेलेला असतो. याचे मुख्य कारण म्हणजे, सुरुवातीच्या लक्षणांकडे होणारे दुर्लक्ष आणि निदानासाठी लागणार्‍या गुंतागुंतीच्या प्रक्रिया.
 
याच पार्श्वभूमीवर, ‘आयआयटी, पटना’च्या संशोधकांनी विकसित केलेले ‘एआयवरील वेअरेबल उपकरण’ विशेष ठरते. या उपकरणचे वैशिष्ट्य म्हणजे, मेंदूमधील आंतरक्रियांवर लक्ष ठेवण्यासाठी या उपकरणात १९ चॅनेल ईईजीआधारित हेल्मेटचा वापार केला आहे, त्यात बसवलेले सेन्सर्स, टायनीएमएल तंत्रज्ञान ‘एआय’शी जोडले गेले आहे. याचा मुख्य उद्देश या विकाराची तपासणी मर्यादित आरोग्य सुविधा असलेल्या क्षेत्रामध्ये कमी वेळात आणि खर्चात करणे हेच आहे. यातील तंत्रज्ञान हे कमी मेमरीमध्ये काम करण्यास सक्षम असल्याने, क्लाऊड किंवा माहिती प्रोसेसिंगचा खर्चही अत्यल्प असणार आहे. त्यामुळे ‘डिमेन्शिया’च्या सुरुवातीच्या काळातच त्यांच्या सर्व शयता ओळखण्यात यश येऊ शकते.
 
यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील दृष्टिकोनात मूलभूत बदल घडण्याची शयता आहे. आजची आरोग्य व्यवस्था मुख्यतः ‘रोग झाल्यानंतर उपचार’ या तत्त्वावर आधारित आहे; परंतु कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ‘वेअरेबल तंत्रज्ञाना’मुळे तपासण्या कमी खर्चिक आणि सर्वत्र उपलब्ध झाल्याने, आजारावर वेळीच नियंत्रण आणणे शक्य होणार आहे. या आजारावर नियंत्रण आणण्यासाठी ‘पूर्वसूचना आणि प्रतिबंध’ ही संकल्पना अधिक महत्त्वाची ठरते आहे.
 
भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशासाठी ही प्रगती महत्त्वपूर्ण ठरू शकते. वाढत्या वृद्ध लोकसंख्येसोबत ‘डिमेन्शिया’चे प्रमाणही वाढणार असल्याचे संकेत आहेत. अशा वेळी कमी खर्चात, वेळेत आणि सातत्याने आरोग्य निरीक्षण करणारी प्रणाली आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी करू शकते. कृत्रिम बुद्धिमत्ता, ‘वेअरेबल तंत्रज्ञान’ आणि वैद्यकीय विज्ञान यांचा संगम भविष्यात आरोग्यसेवेचे स्वरूप पूर्णपणे बदलू शकतो. विस्मरणाविरुद्धची ही लढाई केवळ तांत्रिक प्रगती नसून, मानवी जीवन अधिक सुरक्षित, स्वावलंबी ठेवण्याच्या दिशेने सुरू झालेली नवी आरोग्यक्रांती आहे.
 
(प्रतिनिधी)