हिमंता बिसवांनी दुसऱ्यांदा घेतली मुख्यमंत्रि‍पदाची शपथ, पश्चिम बंगालपाठोपाठ आसाममध्ये एनडीएचं शक्तिप्रदर्शन

    12-May-2026
Total Views |



Himanta Biswa
 
गुवाहाटी : (Himanta Biswa) आसाम विधानसभा निवडणुकीत निर्विवाद बहुमत मिळाल्यानंतर हिमंता बिसवा सरमा यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. गुवाहाटीच्या खानापारा वेटरनरी कॉलेजच्या मैदानावर हा शपथविधी सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. राज्यपाल लक्ष्मण आचार्य यांनी हिमंता बिसवा यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. बिसवा यांच्यासोबत ४ आमदारांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली. यात भाजपचे रामेश्वर तेली, अजंता नेओम, आसाम गण परिषदेचे अतुल बोरा आणि बोडो लँड पीपल्स फ्रंटच्या चरण बोरा यांचा समावेश आहे.
 

Himanta Biswa 
या कार्यक्रमाच्या निमित्ताने एनडीएचं शक्तिप्रदर्शन पाहायला मिळालं. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह भाजपा-एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित होते. यासह अनेक केंद्रीय मंत्र्यांचीही या सोहळ्याला उपस्थिती होती.


 हिमंता बिसवा भाजपचा आश्वासक चेहरा

आसाममध्ये दुसऱ्यांदा मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेणारे हिमंता बिसवा हे पूर्वांचलातील भाजपाचे तरुण आणि आश्वासक नेते म्हणून परिचित आहेत. वकिलीचं शिक्षण घेतलेल्या हिमंता बिसवा सरमा यांनी १९९६ ते २००१ या काळात हायकोर्टात वकिली केली. २००१ साली झालुकबाडी मतदारसंघातून ते पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले. २००२ साली काँग्रेस सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद मिळालं. २०११ सालापर्यंत सलग तिनदा सरकारमध्ये ते मंत्रि‍पदी राहिले.(Himanta Biswa)
 
२०१५ साली मुख्यमंत्रि‍पदाची संधी न मिळाल्यामुळे हिमंता बिसवा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपत प्रवेश केला. २०१६ साली आसामध्ये पहिल्यांदा एनडीएचं सरकार स्थापन झालं, त्यात कॅबिनेट मंत्रि‍पदावर त्यांना सामाधान मानावं लागलं. त्यानंतर २०२१ साली ते पहिल्यांदा आसामचे मुख्यमंत्री झाले. हिमंता बिसवा यांच्या नेतृत्वात २०२४ साली पूर्वांचलात भाजपनं चांगली कामगिरी केली. आता २०२६ सालीही त्यांच्या नेतृत्वात तिसऱ्यांदा एनडीएचं सरकार आसाममध्ये स्थापन झालंय.(Himanta Biswa)
 
आक्रमक हिंदुत्वाच्या भूमिकेमुळे चर्चेत

हिमंता बिसवा सरमा यांनी घेतलेल्या काही निर्णयांमुळे आणि आक्रमक हिंदुत्वाच्या भूमिकेमुळे राष्ट्रीय स्तरावर त्यांची ओळख निर्माण झाली आहे. आसाममध्ये सरकारी मदरसे बंद करुन सामान्य शाळांत त्यांचं रुंपातर करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. गोहत्या नियंत्रणासाठी कठोर कायदाही बिसवा सरकारच्या काळात करण्यात आला. बांगलादेशी घुसखोरांच्या मुद्द्यावर सरमा यांनी सातत्यानं आक्रमक भूमिका घेतली आहे. एनआरसी आणि सीमा सुरक्षेच्या मुद्द्यावर तडजोड होणार नसल्याचं त्यांनी वेळोवेळी सांगितलंय. समान नागरी कायद्याचं जाहीर समर्थन करणाऱ्या सरमा यांनी लव्ह जिहाद, धर्मांतराच्या मुद्द्यावर कायदा आणण्याची भूमिकाही घेतली.(Himanta Biswa)