नेपाळ सरकारचे ‘देवभूमी नेपाळ’ अभियान; आध्यात्मिक पर्यटनातून अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा प्रयत्न

    12-May-2026   
Total Views |
Devbhumi Nepal
 
मुंबई : (Devbhumi Nepal) नेपाळ सरकारने आपला पहिला धोरणात्मक कार्यक्रम सादर केला असून, देशाला मोठे आध्यात्मिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यावर विशेष भर देण्यात आलाय. 'देवभूमी नेपाळ' अभियानाच्या माध्यमातून नेपाळची धार्मिक आणि सांस्कृतिक ओळख जगभर पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सोमवारी नेपाळच्या संसदेत राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी सरकारचा हा धोरणात्मक कार्यक्रम सादर केला. यामध्ये धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक पर्यटनाला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. सरकारच्या मते, नेपाळची श्रद्धा, संस्कृती आणि परंपरा जगभरातील पर्यटकांना आकर्षित करू शकतात आणि त्यामुळे पर्यटनासोबत देशाच्या अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल.
 
नेपाळ सरकारने आपल्या नव्या धोरणात 'आध्यात्मिक तीर्थ कूटनीती'ला विशेष स्थान दिले आहे. त्याअंतर्गत पशुपतीनाथ मंदिर, मुक्तिनाथ मंदिर, लुंबिनी आणि जनकपूर धाम यांसारख्या धार्मिक स्थळांना आंतरराष्ट्रीय स्तरावर जोडून त्यांचा प्रचार करण्याची तयारी सुरू आहे. सरकार या स्थळांना केवळ धार्मिक केंद्र म्हणून नव्हे, तर जागतिक आध्यात्मिक पर्यटनाची मोठी आकर्षणे म्हणून विकसित करू इच्छित आहे. यासाठी पर्यटन आणि संस्कृती मंत्रालयांतर्गत स्वतंत्र तीर्थाटन विभाग सुरू करण्याची तयारीही केली जात आहे.(Devbhumi Nepal)
 
सरकारची ही योजना केवळ धार्मिक पर्यटनापुरती मर्यादित नसून ती स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेशीही जोडण्यात आली आहे. नव्या धोरणात 'जिवंत संग्रहालय' ही संकल्पना मांडण्यात आली असून, त्याद्वारे स्थानिक कला, संस्कृती आणि परंपरा थेट पर्यटनाशी जोडल्या जाणार आहेत. सरकारचे उद्दिष्ट किमान ५ हजार नवीन होमस्टे उभारून त्यांना नेपाल होमस्टे या ब्रँडअंतर्गत ऑनलाइन बुकिंग प्लॅटफॉर्मशी जोडण्याचे आहे. यामुळे सीमावर्ती आणि दलित समाजातील लोकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्याची योजना आहे.
 
हेही वाचा :  PM Narendra Modi Economic Appeals : “आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचे मोठे आवाहन; पेट्रोलपासून सोन्यापर्यंत ‘हे’ खर्च तात्काळ कमी करा!”
 
एकूणच, नेपाळ सरकारचे हे नवे धोरण स्पष्ट संकेत देत आहे की भविष्यात नेपाळ स्वतःची ओळख केवळ पर्वत आणि नैसर्गिक सौंदर्यापुरती मर्यादित ठेवू इच्छित नाही, तर धार्मिक श्रद्धा, संस्कृती आणि पर्यटन यांचा संगम घडवून जागतिक स्तरावर नवी ओळख निर्माण करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.(Devbhumi Nepal)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक