नवी मुंबईच्या भविष्यासाठी सिडकोची मोठी मोहीम;दोन वर्षांत ११० हेक्टर जमीन अतिक्रमणमुक्त;एरोसिटी, मेडिसिटीसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गती

Total Views |
CIDCO Navi Mumbai
 
मुंबई : (CIDCO Navi Mumbai) नवी मुंबईला जागतिक दर्जाचे, सुनियोजित आणि आधुनिक शहर बनवण्याच्या दिशेने सिडकोने गेल्या दोन वर्षांत मोठी मोहीम राबवत तब्बल ११० हेक्टर जमीन अतिक्रमणमुक्त केली आहे. या काळात ५ हजार ८०४ अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमण हटविण्यात आली असून त्यामुळे सिडकोच्या अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी मार्ग मोकळा झाला आहे.
 
एरोसिटी, एज्युकेशन सिटी, मेडिसिटी, इंटरनॅशनल कॉर्पोरेट पार्क, लॉजिस्टिक पार्क, एंटरटेनमेंट अरेना आणि मेट्रोसारखे मोठे प्रकल्प सध्या नवी मुंबई परिसरात उभारले जात आहेत. या प्रकल्पांसाठी आवश्यक असलेल्या जमिनींवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली होती. त्यामुळे प्रकल्पांच्या कामात अडथळे निर्माण होत होते. याच पार्श्वभूमीवर सिडकोने अतिक्रमणांविरोधात व्यापक मोहीम सुरू केली.
 
सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेला वेग देण्यात आला. “सार्वजनिक जमिनींचे संरक्षण आणि नवी मुंबईचा नियोजित विकास हे सिडकोचे प्रमुख उद्दिष्ट आहे. अतिक्रमणमुक्त झालेली जमीन ही केवळ मोकळी जागा नसून भविष्यातील मोठ्या विकास प्रकल्पांची संधी आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.(CIDCO Navi Mumbai)
 
सिडकोच्या मते, अनधिकृत बांधकामांमुळे शहराच्या नियोजित विकासात अडथळे निर्माण होतात आणि शहराचे विद्रुपीकरणही होते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियमातील तरतुदींनुसार कारवाई करण्यात येत आहे. अतिक्रमणधारकांना नोटिसा देऊन तसेच जनजागृती करून ही मोहीम राबविण्यात येत आहे.
 
गेल्या दोन वर्षांत शेकडो निष्कासन मोहिमा राबवून मोठ्या प्रमाणावर झोपड्या, अनधिकृत बांधकामे आणि जाहिरात फलक हटविण्यात आले. खारघर-तुर्भे लिंक रोड प्रकल्पातील अडथळे दूर करण्यासाठी झोपडीधारकांशी समन्वय साधण्यात आला. तसेच सिडकोच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे मलबा टाकणे आणि माती चोरी करणाऱ्यांविरोधात गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.
 
नैना क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली असून विस्तारित नवी मुंबईच्या नियोजित विकासाला त्यामुळे बळ मिळाले आहे. अतिक्रमण हटवल्यानंतर त्या जमिनींवर पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी संरक्षक कुंपण उभारण्यावर भर देण्यात येत आहे. सिडकोच्या या कारवाईमुळे भविष्यातील पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती मिळणार असून नवी मुंबईच्या विकासाचा पुढील टप्पा अधिक वेगाने पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.(CIDCO Navi Mumbai)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.