मुंबई : (BMC Water Supply) मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील पाणीसाठ्यात घट झाल्याने तसेच भारतीय हवामान खात्याने पुढील वर्षी येणाऱ्या अल निनो व आयओडी बाबत वर्तवलेल्या अंदाजानुसार कमी मान्सून प्रमाण लक्षात घेता राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाच्या निर्देशानुसार मुंबई महानगरात शुक्रवार, दिनांक १५ मे २०२६ पासून १० टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. मुंबईकर नागरिकांनी घाबरून न जाता पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहनही पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.
दि. ११ मे २०२६ रोजीची आकडेवारी लक्षात घेता, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये मिळून एकूण ३ लाख ४० हजार ३९९ दशलक्ष लीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. वार्षिक १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लीटरच्या तुलनेत सध्या २३.५२ टक्के इतकाच उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. पाणीसाठ्यावर महानगरपालिका प्रशासनाचे अत्यंत बारकाईने लक्ष असून दररोज नियोजनपूर्वक पाणीपुरवठा केला जात आहे.
भातसा धरणातील निभावणी साठ्यातून १ लाख ४७ हजार ९२ दशलक्ष लीटर तर अप्पर वैतरणा धरणातील निभावणी साठ्यातून ९० हजार दशलक्ष लीटर अतिरिक्त पाणीसाठा मुंबईला मिळणार आहे. याचाच अर्थ मुंबईसाठी पाणीसाठा उपलब्ध असून मुंबईकर नागरिकांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही.(BMC Water Supply)
परंतू, अलीकडे वाढलेले तापमान, पर्यायाने वाढणारे बाष्पीभवन आणि पाणीसाठा १० टक्केपेक्षा कमी झाल्यानंतर यापुढेही पाणीपुरवठा नियोजनपूर्वक करता यावा, या सर्व पैलूंचा विचार करून, खबरदारीचा उपाय म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने १० टक्के पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई महापालिकेच्या वतीने ठाणे, भिवंडी-निजामपूर महानगरपालिका व इतर गावांना जो पाणीपुरवठा केला जातो, त्यातही शुक्रवारपासून १० टक्के पाणीकपात लागू राहणार आहे. समाधानकारक पर्जन्यमान होऊन जलाशयांमधील उपयुक्त साठ्यामध्ये सुधारणा होईपर्यंत ही पाणी कपात लागू राहणार आहे.
पाण्याचा अपव्यय टाळा
दैनंदिन जीवनात पाण्याचा काटकसरीने वापर करणे, त्याचा अपव्यय टाळणे शक्य आहे. यासाठी पाणी बचतीच्या सवयी अंगीकाराव्यात. आवश्यक तितकेच पाणी पेल्यामध्ये घेवून प्यावे. आंघोळीसाठी शॉवरचा उपयोग न करता बादलीमध्ये पाणी घेवून आंघोळ केल्याने पाण्याची मोठी बचत होते. नळ सुरु ठेवून दात घासणे, दाढी करणे टाळावे. घरकामे करताना पाण्याचे नळ वाहते ठेवू नका. त्याऐवजी भांड्यांमध्ये पाणी घेवून कामे उरकावीत.
वाहने धुण्यासाठी नळी न लावता भांड्यामध्ये पाणी घेवून ओल्या कापडाने वाहने पुसणे सहज शक्य असते. घरातील लादी, गॅलरी, व्हरांडा, जिने आदी धुवून काढण्याऐवजी ओल्या फडक्याने पुसून घ्या. आदल्या दिवसाचे पाणी शिळे समजून फेकू नका. वॉशिंग मशीनमध्ये एकाचवेळी शक्य तेवढे कपडे धुतल्यास, मशीनचा पर्यायाने पाण्याचा वापर कमी होवू शकतो. मुंबईकरांनी शक्य तितकी पाणीबचत करावी, पाण्याचा काटकसरीने वापर करावा, महानगरपालिका प्रशासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.(BMC Water Supply)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....