Work From Home : दुचाकी-चारचाकी वाहनांचा वापर कमी केल्यास इंधन बचत शक्य

    11-May-2026
Total Views |

Work From Home
 
मुंबई : पश्चिम आशियातील उर्जा संकटाने तेल बाजारात पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे. भारतासाठी ही स्थिती चिंताजनक मानली जाते कारण, आजही ८५ टक्के कच्चे तेल हे विदेशातून भारतात आयात केले जाते. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवार, दि. १० मे रोजी शक्य असेल, अशा कंपन्यांना ‘वर्क फ्रॉम होम’चा सल्ला दिला आहे. तसेच व्हर्च्युअल मिटींग्सचा पर्याय निवडावा, अशी विनंतीही केली आहे.
 
काही उर्जा तज्ञांच्या मते, आपण जरी वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडला तर वाहतूकीचा खर्च आणि इंधन बचत होऊ शकते. मात्र, यामुळे कार्यालयाच्या वापराऐवजी घरगुती उर्जेची मागणी वाढू शकते. याचा थेट संबंध इंधनाशी, परकी गंगाजळीशी आणि घरगुती विजबिलाशी येतो. घरातून काम सुरू केले तर इंधनाची बचत होऊ शकते. मात्र, घरून काम करत असल्याने घरगुती विजेच्या मागणीत वाढ होऊ शकते.

 
काही तज्ज्ञांनी मात्र, याला पाठिंबा दिला आहे. हायब्रिड वर्क मॉडेलचा वापर केल्यास इंधन बचत शक्य आहे. विशेषतः मुंबई-दिल्ली-बंगळुरू आणि कोलकाता सारख्या प्रमुख शहरांमध्ये जिथे खासगी वाहनचालकांचा वेळ दिवसभर ट्राफीकमध्ये जातो, त्यांना याचा लाभ नक्की मिळू शकतो. भारत हा कच्चे तेल आयात करतो, त्यामुळे सकाळी आणि सायंकाळच्या सत्रात जर का गर्दी आणि ट्राफिक कमी राहिले तर शहरांत प्रदुषणही कमी होईल.
 
जर ही गोष्ट समजून घ्यायची असेल तर करोना काळातील स्थितीचा अभ्यास करावा लागेल. पेट्रोलिअम प्लानिंग अँड एनॅलिसिसच्या आकडेवारीनुसार, एप्रिल २०२०मध्ये भारताचा इंधन खपतीचा दर ४५.८ टक्के इतका होता. रस्ते बंद, औद्योगिक उत्पादने ठप्प असल्याने हा दर तेव्हा इतका होता. थेट लॉकडाऊन हा काही इंधन बचतीचा पर्याय नाही, असा सल्ला काही तज्ज्ञ देतात. त्याऐवजी हायब्रीड मॉडेलचा अवलंब केला जावा, असे त्यांचे मत आहे.
 
दुचाकी-चारचाकी वाहनांचा वापर टाळला तरच फायदा
 
‘वर्क फ्रॉम होम’मुळे इंधन बचतीचा लाभ त्यांनाच होईल जे दुचाकी किंवा चारचाकींनी कार्यालयात पोहोचतात. याउलट मेट्रो, रेल्वे किंवा सायकलचा वापर करत कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे इंधन बचतीचा लाभ होईल, अशी शक्यता नाही. मुंबई, बंगळुरू, नोएडा, हैदराबाद, पुणे, मुंबई आणि चेन्नई सारख्या शहरांमध्ये जिथे प्रवासाचे अंतर खूप जास्त आहे, त्यांना इंधन बचतीचा लाभ होऊ शकतो.
 
सोनेखरेदी न करण्यामुळे होऊ शकतो फायदा
 
‘जीटीआरआय’ या थिंक टँकने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोने न खरेदी करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या परकी गंगाजळीवर ताण पडतो. व्यापार ताळेबंदावर याचा परिणाम होतो. भारतात सोन्याच्या आयातीच्या आकडेवारीनुसार, २०२२मध्ये ३६.५ अब्ज डॉलर्सने वाढून २०२५मध्ये ५८.९ अब्ज डॉलर्सवर पोहोचली. भारत आपल्या एकूण बाजारपेठेच्या शंभर टक्के सोने आयात करतो.
 
मुक्त व्यापारात धातूंच्या आयातशुल्काचा विचार गरजेचा
 
ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटीव्हने दिलेल्या सल्ल्यानुसार, सरकारला आवाहन दिले आहे की, परकी गंगाजळीच्या सुरक्षिततेसाठी मुल्यवान धातूंवर लागणाऱ्या आयात शुल्काचा विचार व्हायला हवा.