मुंबई : (VistadomeCoach) मध्य रेल्वेच्या व्हिस्टाडोम डब्यांना गेल्या तीन वर्षांत प्रवाशांकडून मोठा प्रतिसाद मिळाला असून अनेक मार्गांवर या डब्यांची प्रवासी क्षमता १०० टक्क्यांपेक्षाही अधिक नोंदवली गेली आहे. निसर्गरम्य प्रवासाचा अनुभव देणाऱ्या या विशेष डब्यांमुळे प्रवासी संख्या, महसूल आणि आसन भराव दरात सातत्याने वाढ झाली आहे.
आर्थिक वर्ष २०२३-२४ ते २०२५-२६ या तीन वर्षांच्या कालावधीत मध्य रेल्वेने ११ हजार ८७८ व्हिस्टाडोम फेऱ्या चालवल्या. या काळात सुमारे ५ लाख ३३ हजार प्रवाशांनी प्रवास केला असून मध्य रेल्वेला ८१.२९ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.
आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये ३,९८२ व्हिस्टाडोम फेऱ्यांमधून १ लाख ७६ हजार ४०४ प्रवाशांनी प्रवास केला. यामधून २६.५० कोटी रुपयांचा महसूल मिळाला आणि आसन भराव दर ९१.३६ टक्के होता. त्यानंतर २०२४-२५ मध्ये ३,९३० फेऱ्यांतून १ लाख ७६ हजार ६०८ प्रवाशांनी प्रवास केला. या वर्षात २६.८३ कोटी रुपयांचा महसूल मिळाला असून आसन भराव दर ९२.५६ टक्क्यांपर्यंत वाढला.(VistadomeCoach)
आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये व्हिस्टाडोम सेवेला आणखी चांगला प्रतिसाद मिळाला. या वर्षात ३,९६६ फेऱ्यांमधून १ लाख ८० हजार ४६६ प्रवाशांनी प्रवास केला. यामधून २७.९६ कोटी रुपयांचा महसूल मिळाला असून आसन भराव दर ९३.६७ टक्क्यांवर पोहोचला आहे.
मुंबई-पुणे घाट विभाग, मुंबई-मडगाव कोकण मार्ग आणि पुणे- सिकंदराबाद या निसर्गरम्य मार्गांवर व्हिस्टाडोम डबे विशेष आकर्षण ठरत आहेत. या डब्यांमध्ये काचेचे छत, मोठ्या काचा असलेल्या खिडक्या, १८० अंश फिरणाऱ्या आरामदायी खुर्च्या, निरीक्षण गॅलरी, स्वयंचलित दरवाजे, वातानुकूलित सुविधा, आधुनिक स्वच्छतागृहे आणि सीसीटीव्ही यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत.
विशेषतः पश्चिम घाट आणि कोकण मार्गावरील डोंगर, धबधबे, बोगदे आणि हिरवाईचा मनमोहक नजारा या डब्यांतून अधिक जवळून अनुभवता येत असल्याने पर्यटक आणि प्रवासी या सेवेला प्राधान्य देत आहेत. मध्य रेल्वेने प्रवाशांना अधिक चांगला आणि आरामदायी प्रवास अनुभव देण्यासाठी भविष्यातही अशा प्रीमियम सेवा वाढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.(VistadomeCoach)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.