मुंबई (विशेष प्रतिनिधी) – कान्हा व्याघ्र प्रकल्पात केनाईट डिस्टेम्पर व्हायरसमुळे वाघिणीसह तिच्या चार बछड्यांचा मृत्यू झाला आहे (Canine Distemper Virus) . या पार्श्वभूमीवर ताडोबा व्याघ्र प्रशासनाने सर्तकता दाखवत गेल्या सहा महिन्यांमध्ये दोन हजार कुत्र्यांचे लसीकरण केले आहे (Canine Distemper Virus) . ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर आणि कोअर क्षेत्रालगतच्या गावातील पाळीव आणि भटक्या कुत्र्यांना वेगवेगळ्या रोगांवरील लस देण्यात आली आहे. (Canine Distemper Virus)
केनाईट डिस्टेम्पर (सीडीव्ही) हा कुत्रे आणि वन्य मांसाहारी प्राण्यांमध्ये आढळणारा अत्यंत संसर्गजन्य विषाणूजन्य आजार आहे. हा विषाणू कुत्रे, कोल्हे, लांडगे, वाघ, सिंह, बिबटे आणि रानकुत्रे यांना संक्रमित करतो. हा आजार संक्रमित प्राण्यांच्या श्वसनातील थेंब, लाळ, मूत्र, मल व डोळ्यातील स्त्राव यांच्या संपर्कातून पसरतो. विशेषतः भटकी वा लसीकरण न झालेले कुत्रे हे वन्यप्राण्यांसाठी मोठा संसर्गाचा स्रोत असतात. सीडीव्हीमुळे श्वसनसंस्था, पचनसंस्था, मज्जासंस्था व रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होतो. अतिसार, अशक्तपणा, आकडी व चालण्यात असंतुलन ही प्रमुख लक्षणे आहेत. गंभीर अवस्थेत मृत्यूदर खूप जास्त असतो. या संसर्गामुळे मध्यप्रदेशातील कान्हा व्याघ्र प्रकल्पात वाघिणी आणि तिच्या चार बछड्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. हा संसर्ग जंगलाच्या सीमेजवळील भटक्या किंवा पाळीव कुत्र्यांमुळे पसरल्याची शक्यता आहे. या घटनेनंतर, महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये व्याघ्र प्रकल्पांच्या परिसरात लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. मात्र, ताडोबामध्ये ही मोहिम गेल्या सहा महिन्यांपासून सुरू आहे.
ताडोबाचे क्षेत्रसंचालक डॉ. प्रभूनाथ शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे आणि त्यांच्या टीमने गेल्या सहा महिन्यांमध्ये प्रकल्पाच्या आसपास गावांमधील कुत्र्यांचे लसीकरण पूर्ण केले आहे. प्रकल्पाच्या बफर आणि कोर क्षेत्रालगतच्या ६३ गावांमधील पाळीव आणि भटके मिळून एक हजार ९४६ कुत्र्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये शिवनी वनपरिक्षेत्रातील २१ गावांमधील ३८८ कुत्रे, पळसगावमधील ११ गावांमधील ६१५ कुत्रे, खडसंगीच्या सहा गावांमधील १०५ कुत्रे, मुल वनपरिक्षेत्रातील १४ गावांमधील २५२ कुत्रे आणि ताडोबा वनपरिक्षेत्रातील ११ गावांमधील ५७६ कुत्र्यांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. त्यांना नसबंदीसोबतच रेबिज आणि केनाईट डिस्टेम्परचे (सीडीव्ही) लसीकरण करण्यात आले आहे. तसेच त्यासंदर्भात जनजागृती मोहिमही सुरू आहे.