देशाची वीजनिर्मिती क्षमता वाढणार; तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे दुसरे युनिट पुन्हा सुरु होणार;अणुऊर्जा नियामक मंडळाने दिली मंजुरी

Total Views |
Tarapur Nuclear Power Plant
 
मुंबई : (Tarapur Nuclear Power Plant) अणुऊर्जा नियामक मंडळाने तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या दुसऱ्या युनिटला पुन्हा सुरू करण्यास आणि पुढील दहा वर्षे चालवण्यास मंजुरी दिली आहे. मोठ्या दुरुस्तीचे काम, सुरक्षा सुधारणा आणि तांत्रिक तपासण्या पूर्ण झाल्यानंतर ही परवानगी दि. ७ मे २०२६ रोजी देण्यात आली.
 
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील युनिट १ आणि २ हे भारतातील पहिले अणुऊर्जा प्रकल्प आहेत. या दोन्ही युनिट्सनी १९६९ मध्ये वीज निर्मिती सुरू केली होती. आशियातील पहिले व्यावसायिक अणुऊर्जा प्रकल्प म्हणूनही त्यांची ओळख आहे. पालघर जिल्ह्यातील बोईसरजवळ हा प्रकल्प आहे.
 
न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने युनिट २ मध्ये मोठ्या प्रमाणावर दुरुस्ती आणि आधुनिकीकरणाचे काम केले. यामध्ये रिऍक्टरमधील जुन्या पाइपलाइन बदलून नवीन आणि गंज न लागणाऱ्या स्टेनलेस स्टीलच्या पाइप बसवण्यात आल्या. त्यामुळे यंत्रणेची सुरक्षितता आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार आहे.
 
हेही वाचा :  LPG new rule: ...या ग्राहकांचे एलपीजी गॅस अनुदान बंद होणार! नवा नियम काय आहे? सविस्तर वाचा
 
याशिवाय सुरक्षिततेसाठी काही नवीन यंत्रणाही बसवण्यात आल्या. प्रकल्पातील महत्त्वाच्या भागांची तपासणी करून त्यांची स्थिती, सुरक्षितता आणि पुढे किती वर्षे वापर करता येईल याचा सविस्तर अभ्यास करण्यात आला. या सर्व चाचण्या आणि तपासण्यांनंतर प्रकल्प सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले.(Tarapur Nuclear Power Plant)
 
एईआरबीने या सर्व कामांचा आणि अहवालांचा सखोल आढावा घेतल्यानंतर युनिट २ पुन्हा सुरू करण्यास मंजुरी दिली. मंडळाने प्रकल्पाच्या सुरक्षित कामकाजावर पुढेही लक्ष ठेवले जाणार असल्याचे सांगितले.
 
यापूर्वी तारापूर प्रकल्पाच्या युनिट १ मध्येही अशीच दुरुस्ती करण्यात आली होती. डिसेंबर २०२५ मध्ये ते युनिट पुन्हा सुरू करण्यात आले असून ते सध्या १६० मेगावॅट क्षमतेने वीज निर्मिती करत आहे. तारापूर अणुऊर्जा प्रकल्प हा देशाच्या अणुऊर्जा क्षेत्रातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रासह देशाच्या वीजपुरवठ्यात महत्त्वाचे योगदान मिळत आहे.(Tarapur Nuclear Power Plant)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.