मराठी नामफलक नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा;तजिंदर सिंग तिवाना यांची मागणी; मोठ्या हॉटेल्सपासून कॉर्पोरेट इमारतींपर्यंत इंग्रजी फलकांची दादागिरी
मुंबई: (Tajinder Singh Tiwana Demands Action) सर्वोच्च न्यायालयाने मराठी नामफलकाबाबत स्पष्ट आदेश दिले असतानाही मुंबईतील हजारो दुकाने, हॉटेल्स आणि व्यावसायिक आस्थापनांवर आजही मराठी पाट्या नसल्याचा गंभीर मुद्दा विधी समिती सदस्य तथा नगरसेवक तजिंदर सिंग तिवाना यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे उपस्थित केला.
तजिंदर सिंग तिवाना म्हणाले की, "मराठी नामफलकासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश असतानाही प्रशासन नेमके काय करत आहे? कारवाई सक्तीची का केली जात नाही? आपले निरीक्षक नेमके काय काम करत असतात? ते स्वतःच्या विभागात फिरत नाहीत का? की, त्यांच्या चष्म्याचा नंबर वाढला आहे म्हणून त्यांना इंग्रजीतील मोठमोठे फलक दिसत? मुंबईतील हजारों दुकाने आणि व्यावसायिक आस्थापनांवर मराठी नाव नसतानाही प्रशासनाकडून प्रभावी कारवाई होत नाही. फक्त नोटीस देता का? की, प्रत्यक्ष दंड करता? किती आस्थापनांवर दंड आकारला आणि किती परवाने निलंबित केले?," असा सवाल त्यांनी केला.(Tajinder Singh Tiwana Demands Action)
मोठ्या आस्थापनांना वेगळे नियम का?
ते पुढे म्हणाले की, "मुंबईत 'वेस्टिन', 'मॉर्गन स्टॅन्ले' यांसारख्या मोठ्या हॉटेल्स आणि व्यावसायिक इमारतींवर केवळ इंग्रजीमध्ये नावे झळकत आहेत. अशा मोठ्या आस्थापनांना वेगळे नियम आहेत का? त्यांना कायद्यातून सूट दिली आहे का? चित्रपट कलाकारांच्या छतावरील हॉटेल्स आणि आलिशान उपाहारगृहांमध्येही मराठी नामफलक नियमांचे पालन होत नसल्याचे नाही. सामान्य दुकानदारावर नियम आणि मोठ्या लोकांवर मोकळीक, हे कोणत्या धोरणानुसार चालते? पत्र दिल्यानंतरही 'वेस्टिन'वर नेमकी कोणती कारवाई झाली? त्यांना नोटीस दिली का? दंड केला का? की, फक्त छायाचित्र काढून प्रकरण बंद केले?” असा टोला त्यांनी लगावला.(Tajinder Singh Tiwana Demands Action)
तजिंदर सिंग तिवाना म्हणाले की, "मराठी नामफलकासंदर्भात स्पष्ट नियम जाहीर करावे. मराठी नाव लहान अक्षरांत चालणार आहे की, मोठ्या अक्षरांत बंधनकारक आहे? अनेक ठिकाणी इंग्रजी मोठे आणि मराठी अगदी कोपऱ्यात छोटे लिहून नियमांची थट्टा केली जात आहे. मराठी भाषेचा सन्मान फक्त भाषणांमध्ये नको, तर प्रत्यक्ष कारवाईत दिसला पाहिजे. अन्यथा हे सर्व नियम फक्त कागदापुरते राहतील."(Tajinder Singh Tiwana Demands Action)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....