सुवेंदू अधिकारी नसते, तर पाच हजार कार्यकर्त्यांची हत्या झाली असती;तृणमूल काँग्रेसच्या प्रवक्त्यांचा खळबळजनक दावा; गटबाजीला उधाण
11-May-2026
Total Views |
कोलकाता : (Suvendu Adhikari's Statement) पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर आता पक्षात अंतर्गत वाद सुरू झाला आहे. पक्षाने सहा वर्षांसाठी निलंबित केलेले प्रवक्ते ऋजू दत्ता यांनी आता थेट नवनियुक्त मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची स्तुती केल्याने बंगालच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
सुवेंदू अधिकारी नसते, तर पाच हजार तृणमूल कार्यकर्त्यांची हत्या झाली असती, असा खळबळजनक दावा दत्ता यांनी केला आहे. ऋजू दत्ता यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सुवेंदू अधिकारी यांच्या संयमाचे कौतुक केले. "भारताच्या राजकीय इतिहासात ममता बॅनर्जी यांचे नाव मोठे असेलच, पण सुवेंदू अधिकारी यांची बाजू वेगळी आहे. निवडणुकीच्या निकालानंतर दि. ६ मे रोजी सुवेंदू यांच्या स्वीय साहाय्यकाची हत्या करण्यात आली.
जर त्या रात्री सुवेंदू अधिकारी यांनी सूड घेण्याची भाषा केली असती, तर बंगालमध्ये किमान पाच हजार तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्यांची हत्या झाली असती. मात्र, त्यांनी अत्यंत संयम दाखवत कोणालाही कायदा हातात न घेण्याचे आवाहन केले आणि पाच हजार कार्यकर्त्यांचे प्राण वाचवले,” असे ऋजू दत्ता यांनी सांगितले.
ऋजू दत्ता यांनी ममता आणि अभिषेक बॅनर्जी यांच्यावरही टीकेची झोड उठवली. "बाहेरच्या संस्थेने संपूर्ण पक्षावर ताबा मिळवला आहे, याची जबाबदारी दीदी आणि अभिषेक यांनी घ्यायला हवी,” असे त्यांनी सांगितले.
वरिष्ठ नेत्यांमध्येही धुसफूस
अनेक बड्या नेत्यांनीही नाराजी व्यक्त केली. माजी क्रीडामंत्री मनोज तिवारी यांनी अरूप विश्वास यांच्यावर कामात अडथळे आणल्याचा आरोप केला. कोलकात्याचे उपमहापौर अतीन घोष यांनी पक्षाच्या या अवस्थेला थेट अभिषेक बॅनर्जी यांची कार्यपद्धती जबाबदार असल्याचे म्हटले. रत्ना चॅटर्जी यांनी निवडणुकीच्या काळात नेतृत्वाशी संवाद साधता आला नाही, अशी खंत व्यक्त केली.(Suvendu Adhikari's Statement)