परिवर्तनाची पहाट...

    11-May-2026
Total Views |
Suvendu Adhikari
 
बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वात फुललेले ‘कमळ’ आणि तामिळनाडूत सुपरस्टार विजय यांचा उदय, ही घराणेशाहीच्या अंताची नांदी म्हणता येईल. पराभवानंतर ममतांना सुचलेली ऐक्याची पश्चातबुद्धी आणि मोदींनी काँग्रेसवर ओढलेला ‘परजीवी पक्षा’चा आसूड, हे ‘इंडी’ आघाडीच्या विखुरलेल्या वास्तवाचे ढळढळीत सत्य आहे. स्वार्थी आघाड्यांचे राजकारण आता पूर्णपणे संपुष्टात आले आहे, हेच वास्तव आहे.
 
पश्चिम बंगालच्या राजकीय क्षितिजावर सुवेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणे, ही घटना भारतीय राजकारणाच्या इतिहासातील एक सुवर्णपान ठरावी. ज्या बंगालने देशाला राष्ट्रवादाची आणि क्रांतीची शिकवण दिली, त्याच मातीने आज तुष्टीकरण, गुंडगिरी आणि भ्रष्टाचाराला कायमचे गाडून पहिल्यांदाच राष्ट्रवादी विचारांच्या हाती सत्ता सोपवली. पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच भाजपचे सरकार स्थापन होणे, या ऐतिहासिक घटनेला म्हणूनच अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण, हा विजय राजकीय गणितांचा नाही, तर तो बंगाली अस्मितेचा, सुरक्षिततेचा आणि सांस्कृतिक पुनरुत्थानाचा आहे. दशकानुदशके डाव्यांच्या आणि त्यानंतर तृणमूलच्या हिंसक राजकारणात होरपळलेला बंगाल, आता खर्‍या अर्थाने मोकळा श्वास घेईल. तथापि, या विजयाने तोंडघशी कोणाला पाडले असेल, तर ते ‘इंडी’ आघाडीच्या विखुरलेल्या आणि पोकळ इमल्याला; ज्याचा पाया केवळ आणि केवळ द्वेष हाच होता.
 
निवडणुकीच्या रणधुमाळीत अहंकारात आकंठ बुडून ‘एकला चलो रे’चा नारा देणार्‍या ममता बॅनर्जी यांना, आता पराभवानंतर अचानक सामूहिक संघटनेची आणि भाजपविरोधात एकत्र येण्याची आठवण झाली. जागावाटपाची वेळी काँग्रेस आणि डाव्यांना बंगालच्या वेशीवरच रोखून, आपणच सर्वसत्ताधीश असल्याच्या थाटात वावरणार्‍या ममतांना आता एकीचे बळ आठवले. यालाच राजकारणात ‘पश्चातबुद्धी’ म्हणतात. सत्तेच्या मलाईसाठी आणि वैयक्तिक स्वार्थासाठी ज्या मित्रपक्षांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या, त्यांच्याच दारात आता गयावया करणे, हा राजकीय दैवदुर्विलासच. बंगालमध्ये स्वतंत्र लढताना त्यांना मित्रपक्षांची गरज वाटली नाही. कारण, त्यांना वाटले होते की, मुस्लीम लांगूलचालन आणि दहशतीच्या जोरावर आपण पुन्हा सत्ता काबीज करू. पण, जनतेने त्यांचा हा भ्रमाचा भोपळा फोडला.पराभवानंतर त्यांना आता संविधानाची आणि लोकशाही वाचवण्याची चिंता सतावू लागली. मुळातच ‘इंडी’ आघाडीमध्ये बिघाडी का झाली? याचे उत्तर या पक्षांच्या नेत्यांच्या अतिमहत्त्वाकांक्षेत दडलेले आहे. स्वार्थासाठी एकत्र येणार्‍यांना संघटन कसे साधायचे, हेच माहिती नाही. ज्यांची ना विचारधारा एक आहे, ना ज्यांचे उद्दिष्ट एक आहे, ते केवळ सत्तेच्या लोभापोटी किती काळ एकत्र राहू शकतात?
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केलेली ‘परजीवी’ ही टीका, आजच्या राजकीय वास्तवाचा अचूक आरसा ठरली. पंतप्रधानांनी अत्यंत प्रखर शब्दांत काँग्रेसच्या राजकीय नीतीचे वाभाडे काढले. पंतप्रधान मोदी अत्यंत परखडपणे म्हणतात की, "काँग्रेस हा आता असा पक्ष झाला आहे, ज्याच्यात स्वतःच्या पायावर उभे राहण्याची कोणतीही क्षमता राहिलेली नाही. जगण्यासाठी त्यांना दुसर्‍याच्या रक्ताची आणि आधाराची कायम गरज लागते. निसर्गातील परजीवी ज्याप्रमाणे यजमानाला पोखरून मोठा होतो, तशीच अवस्था आजच्या काँग्रेसची आहे. प्रादेशिक पक्षांच्या खांद्यावर बसायचे, त्यांच्या जनाधारावर निवडून यायचे आणि सत्तेचे स्वप्न पाहायचे, एवढेच त्यांचे काम. या पक्षाची भयानक ओळख म्हणजे, संधी मिळताच साथीदारांच्या पाठीत खंजीर खुपसणे. हा काँग्रेसचा तसा जुनाच धंदा. ज्यांना स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी दुसर्‍याच्या कुबड्या लागतात, ते देशाला काय नेतृत्व देणार?” असा जळजळीत आणि विचार करायला लावणारा प्रश्न मोदींनी उपस्थित केला आहे. पंतप्रधानांनी तामिळनाडू आणि केरळम्मधील सरकार स्थापनेच्या घडामोडींवरूनही काँग्रेसला पूर्णपणे उघडे पाडले. सत्तेच्या वाटाघाटीत काँग्रेस ज्या पद्धतीने प्रादेशिक पक्षांना वेठीस धरते ते पाहता, प्रादेशिक पक्षांसाठी काँग्रेस हा एक भस्मासूर ठरत आहे. जो पक्ष सत्तेसाठी स्वतःच्या मित्रांचा होऊ शकत नाही, तो सामान्य जनतेचा काय होणार, हा पंतप्रधानांचा सवाल विरोधकांच्या वर्मावर अचूक घाव घालणारा आहे.
 
पूर्वेकडेच नाही, तर दक्षिणेतही असाच राजकीय भूकंप पाहायला मिळतो आहे. तामिळनाडूमध्ये विजय यांनी, तब्बल १२१ आमदारांच्या घसघशीत समर्थनासह मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याने द्रमुकच्या राजकारणाला मोठाच हादरा बसला. द्रमुक आणि अण्णाद्रमुक यांच्या आलटून-पालटून येणार्‍या सत्तेला आणि भ्रष्टाचाराला कंटाळून, जनतेने एका नव्या तरुण नेतृत्वाला पसंती दिली. या नव्या राजकीय समीकरणातही सर्वात मोठी अडचण काँग्रेसच ठरली. तामिळनाडूत द्रमुक आणि काँग्रेस यांच्यात सत्तेवरून ज्या पद्धतीने वाजले ते पाहता, ‘आघाडी धर्म’ नावाची कोणतीही गोष्टच यांच्याकडे शिल्लक नसल्याचे अधोरेखित होते. द्रमुकसारख्या प्रादेशिक पक्षालाही, काँग्रेस ओझे वाटू लागला आहे. कारण, जनाधार नसलेला हा पक्ष सत्तेत सिंहाचा वाटा मागतो, ही विसंगती आता प्रादेशिक पक्षांच्या लक्षात आली आहे.
 
पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रवादी विचारांचे सरकार येणे आणि दुसरीकडे तामिळनाडूमध्ये नव्या नेतृत्वाचा उदय होणे, हे राजकारणातील एका मोठ्या स्थित्यंतराचे संकेत. ज्या पक्षांनी स्वतःची घरे भरण्यासाठी आघाड्या केल्या, त्यांना जनतेने त्यांची योग्य जागा दाखवून दिली. बंगालमधील भाजपचा ऐतिहासिक विजय तर, तुष्टीकरणाच्या राजकारणाचा शेवट ठरला. आज बंगालसारख्या राज्यांना एका स्थिर, प्रगल्भ आणि कणखर नेतृत्वाची गरज होती. भारत आज जागतिक पातळीवर मोठी झेप घेत आहे. एका बाजूला व्हिएतनामसारख्या देशासोबत सामरिक करार करून भारत शक्ती वाढवत असताना, देशांतर्गत राजकारणात अशा ‘परजीवी’ प्रवृत्तींना ठेचून काढणेही,अत्यंत गरजेचे असेच. सत्तेसाठी लाचार झालेल्या या विरोधकांना संघटन कधीच साधता येणार नाही. एकीचे बळ हे ध्येयवादी वाघांच्या संघर्षात शोभते, स्वार्थासाठी एकत्र आलेल्या कोल्ह्यांच्यात नाही, हे लक्षात घ्यायला हवे.