भारतीय संस्कृतीतील अध्यात्मविचाराने जगाला मुक्तीचा मार्ग दाखवला. बुद्धांच्या ज्ञानवृक्षाची अनुभूती घेतल्याशिवाय हे अध्यात्मदर्शन पूर्ण होत नाही, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. माणसाला त्याच्या माणूसपणाची खरी ओळख बुद्धांनीच करून दिली. मानवमुक्तीचा विचार मांडणार्या बुद्ध धर्माच्या शिकवणुकीने राष्ट्राच्या सीमा ओलांडल्या. काळाच्या ओघात बुद्धविचारांच्या शाखा आणखी विस्तारत गेल्या. मनाची मशागत करणारा हा विचार, आज असंख्य लोकांसाठी दीपस्तंभ ठरतो आहे. बुद्धविचारांचा वारसा बुद्धांच्या अनुयायांनी पुढे चालवला. मात्र, आता त्याचबरोबर येणार्या काळात रोबोट्सही यात योगदान देणार असल्याचे दक्षिण कोरियातील एका कार्यक्रमातून सिद्ध झाले.
दक्षिण कोरिया येथील प्रसिद्ध जोगयेसा बौद्ध मंदिरात ‘गाबी’ नावाच्या एका ह्युमनॉईड रोबोटने अधिकृतपणे बौद्ध भिक्खू म्हणून दीक्षा घेतली. विज्ञान आणि अध्यात्माच्या क्षेत्रात पहिल्यांदाच असा चमत्कार घडल्याने सगळ्यांच्याच भुवया आनंदाने उंचावल्या. ‘गाबी’ हा शब्द बौद्ध धर्मातील ‘करुणा’ या संकल्पनेशी जोडलेला आहे. लोकांचे दुःख दूर करण्यासाठी बुद्धांचा आशीर्वाद, असाही त्याचा अर्थ होतो. ‘भिक्खू होणे’ याचा अर्थ, केवळ एका विशिष्ट पद्धतीने जीवन व्यतित करणे नसून, आपली जीवनरूपी समिधा कार्यसिद्धीसाठी अर्पण करणे होय. या विचारानेच अत्याधुनिक रोबोटचा प्रवेशसोहळा जोगयेसा मंदिरातील मुख्य भिक्खूंच्या उपस्थितीत दिमाखात संपन्न झाला. १३० सेंटीमीटर उंच असलेल्या या रोबोटला बौद्धपरंपरेनुसार, राखाडी आणि तपकिरी रंगाची वस्त्रे परिधान करण्यात आली.
दीक्षाविधीदरम्यान, ज्येष्ठ भिक्खूसमोर या रोबोटने नतमस्तक होत, "मी धम्माला समर्पित राहीन,” अशी शपथही घेतली. भिक्खूंना दीक्षा देताना अग्नीने डाग देण्याच्या ‘येनबी’ विधीची प्रथा आहे. मात्र, रोबोटच्या बाबतीत असे करणे शक्य नसल्याने ‘स्टिकर’ लावूनच हा विधी संपन्न झाला. उपस्थित भिक्खूंनी १०८ मण्यांची जपमाळ ‘गाबी’च्या गळ्यात घातल्यावरही त्याने सर्वांना अभिवादन केले. या महिन्याच्या अखेरीस असलेल्या धार्मिक उत्सवामध्ये ‘गाबी’ सामील होणार आहे. अध्यात्मविचाराला मुळातच माणसापासून वेगळे करता येत नाही. म्हणूनच, मानवी उत्क्रांती ज्या क्षेत्रात होईल, त्या प्रत्येक क्षेत्रात अध्यात्माचा प्रभाव होणारच. ‘गाबी’च्या माध्यमातून धर्म आणि विज्ञानाच्या अनोख्या संगमाबद्दल आपण बोललो. मात्र, हा संगम काही पहिल्यांदाच झालेला नाही. काही वर्षांपूर्वी जपानमधील एका ४०० वर्षे जुन्या मंदिराने प्रवचन देण्यासाठी ‘मिंदार’ नामक रोबोटला पाचारण केले होते. बौद्ध धर्मातील करुणेची देवी असलेल्या ‘कन्नोन बोधिसत्वा’च्या प्रतिरूपावर आधारित, प्रौढ आकाराच्या ‘अँड्रॉईड’ला क्योटोमधील ‘कोदाईजी’ला मंदिरात आणले गेले होते. ‘मिंदार’ नावाच्या या अनोख्या रोबोटचे वैशिष्ट्य म्हणजे, हा रोबोट भरपूर माहितीसंग्रह करू शकतो आणि अनेकांना भेटूही शकतो. या एका रोबोटच्या निर्मितीसाठी दहा लाख डॉलर्स खर्च करण्यात आले होते. बुद्धविचार लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ‘मिंदार’वर येऊन ठेपली, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
प्रगतिशील राष्ट्रांच्या पंक्तीत आपली ओळख नव्याने निर्माण करणार्या या दोन्ही देशांचा सांस्कृतिक विचार बुद्धविचारांनीच बांधला गेला. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात गरुडभरारी घेणार्या दक्षिण कोरिया आणि जपान या देशांमध्ये प्रयोगशीलतेचा विचार खोलवर रुजल्यामुळे असा वेगळा विचार त्यांनी सत्यात उतरवला. बुद्धविचारांचा अन्वयार्थ लावताना त्यांचे कार्य एक सामाजिक आणि सांस्कृतिक क्रांती असल्याचे मतही काही अभ्यासकांनी मांडले. योगायोगाने या अभिनव संकल्पनेतही मुलखावेगळा विचार याच तत्त्वज्ञांनी मांडला. कृत्रिम बुद्धिमत्तेचा सर्वव्यापी व्यवहार, आजमितीला त्याची गरज आणि त्यातून निर्माण होणार्या भविष्याविषयी आज हिरिरीने चर्चा सुरू आहे. माणसाचा भार कमी करण्यासाठी ‘एआय’चे माणूसपण कसे अचूक घडवता येईल, याविषयी अलीकडे संशोधन होत आहे. आध्यात्मिक विचार हा खर्या अर्थाने माणसातील माणूसपण जगवणारा विचार आहे. मानवी मनाला मुक्तीची आस असते. मुक्तीची स्वतःचीच एक संकल्पना बाळगून तो जगतो. येणार्या काळात बुद्धिमत्तेच्या कृत्रिम प्रज्ञेला कंटाळलेले ह्युमनॉईड रोबोटदेखील आध्यात्मिक मुक्तीचे नवे मानकरी असतील, यात शंका नाही.