पीडितेची मूळ ओळख लपवली, एमआयएम नगरसेवकाची आश्रित बनली, ४४ दिवस ठिकाणं बदलत दिला पोलीसांना गुंगारा

निदा खानला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

    11-May-2026
Total Views |
 Nida Khan Custody
 
नाशिक : (Nida Khan Custody) टीसीएस कंपनीमधील कार्पोरेट जिहाद, धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिला न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. तिच्या जबाबामध्ये आलेल्या माहितीनुसार पुन्हा एकदा आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची समोरासमोर चौकशी केली जाणार आहे. नाशिकमधील बहुराष्ट्रीय कंपनी टीसीएसमध्ये हिंदू तरुणींचे धर्मांतर आणि लैंगिक शोषण होत असल्याचा प्रकर उघड झाल्यानंतर नाशिक पोलिसांनी देवळाली कॅम्प आणि मुंबई नाका पोलीस ठाण्यात दाखल तक्रारींचा तपास सुरू केला होता. यातील काही आरोपींना अटक करण्यात आली होती, मात्र निदा खान फरार होती.
 
दरम्यान, सोमवार, दि. ११ मे रोजी पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर तिला नाशिकरोड येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे आता तिची रवानगी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात होणार आहे. या गुन्ह्यातील मुख्य संशयित दानिश शेख आणि तौसिफ अत्तार या दोघांचा ताबाही आता एसआयटी घेणार असल्याचे बोलले जात आहे. निदा, दानिश आणि तौसिफ या तिघांना समोरासमोर बसवून चौकशी केली जाणार आहे. यातून या रॅकेटचे धागेदोरे आंतरराज्य किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर आहेत का, हे स्पष्ट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.(Nida Khan Custody)
 
वाढीव कोठडीची मागणी
 
मुंबई नाका पोलिसांनी या प्रकरणात कट रचणे आणि धार्मिक भावना दुखावण्याबाबतच्या कलमांमध्ये वाढ केली आहे. तसेच निदा खानकडून जप्त करण्यात आलेल्या १७१ लिंकचा तांत्रिक तपास आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यासाठी एसआयटीने तिच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. मात्र, न्यायालयाने तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
 
हेही वाचा :  दोन दिवस रेकी केली, टार्गेटवर गोळी झाडली... सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या-कोल्ड ब्लडेड मर्डर?
 
एमआयएमच्या नगरसेवकाने दिला आश्रय
 
२६ मार्चपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या निदा खान हिला छत्रपती संभाजीनगर येथे एमआयएमचे नगरसेवक मतीन माजिद पटेल यांनी आश्रय दिला होता. सुरुवातीला हा फ्लॅट निदाच्या नातेवाईकाचा असल्याचे सांगितले जात होते. मात्र, पोलिसांच्या पडताळणीत निदाचा त्या फ्लॅटशी कोणताही संबंध नसल्याचे समोर आले आहे. तसेच निदा गर्भवती असतानाही तिला मिळालेला हा आश्रय आणि त्या काळात तिला झालेला अर्थपुरवठा नेमका कोणाकडून झाला, याचा शोध एसआयटी घेत आहे.
 
पीडितेची मूळ ओळख पुसण्याचा रचला कट
 
देवळाली कॅम्पमधील पीडितेची मूळ ओळख पुसून टाकण्याचा कट निदाने रचल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. निदा हिने पीडितेचे नामकरण ‘हानिया’ असे केले होते. इतकेच नव्हे, तर निदा स्वतः पीडितेच्या घरी जाऊन तिला विशिष्ट धर्माचे शिक्ष देण्याबरोबरच धार्मिक पेहराव परिधान करण्यास भाग पाडत होती. तसेच विशिष्ट प्रार्थनांची सक्ती करण्यात येत होती. पीडितेला पूर्णपणे प्रभावाखाली घेण्यासाठी निदाने जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.(Nida Khan Custody)