बंगळुरु : (Narendra Modi's Bengaluru Visit) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कर्नाटक दौर्यानिमित्त कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात असतानाच, बंगळुरुच्या बाहेरील भागात स्फोटके सापडल्याने मोठी खळबळ उडाली. याप्रकरणी रविवार, दि. १० मे रोजी पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. या कार्यक्रमाच्या मार्गात, कग्गलीपुरा भागातील थाथागुणी येथे पोलिसांना जिलेटीनच्या कांड्या सापडल्या. एका पुलाजवळ आणि कंपाऊंडच्या भिंतीपाशी जिलेटीन कांड्या टाकण्यल्या होत्या. पंतप्रधानांचा ताफा या मार्गावरून जाण्यापूर्वीच सुरक्षा यंत्रणांनी या कांड्या शोधल्या, यामुळे मोठा अनर्थ टळला. स्फोटके सापडल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी तातडीने नाकेबंदी केली. बॉम्बशोधक आणि नाशक पथक यांसह फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी धाव घेऊन तपासणी केली.(Narendra Modi's Bengaluru Visit)
पोलिसांनी सांगितले की, "रविवारी सकाळी पंतप्रधानांच्या आगमनापूर्वी केलेल्या तपासणीत पदपथावर दोन जिलेटीन कांड्या सापडल्या. या घटनेचा सखोल तपास सुरू असून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.” ही स्फोटके तेथे कशी आली आणि यामागे काही मोठा कट होता का, याचा शोध अधिकारी घेत आहेत. या भागात सुरू असलेल्या खाणकामासाठी ही स्फोटके आणली होती की, ती मुद्दाम पेरली होती; याबाबत अद्याप स्पष्टता मिळालेली नाही.(Narendra Modi's Bengaluru Visit)