गरज असेल तरच इंधन वापरा;पश्चिम आशियातील संकटानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देशवासियांना आवाहन

    11-May-2026
Total Views |
 
Narendra Modi
 
हैदराबाद: (Narendra Modi's Appeal to the Nation) "आजच्या काळाची गरज ओळखून पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा वापर अत्यंत संयमाने करा,” असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या जागतिक तेलसंकटानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना महत्त्वाचा संदेश दिला आहे.
हैदराबाद येथे रविवार, दि. १० रोजी पार पडलेल्या एका कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी तेलंगणमध्ये सुमारे ९ हजार, ४०० कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन केले. यावेळी संबोधित करताना त्यांनी देशातील ऊर्जासुरक्षेवर भाष्य केले.
 
सध्या अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत तेलाचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. जगातील सर्वात महत्त्वाचा तेल वाहतूक मार्ग असलेल्या ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ बंद झाल्याने भारतासारख्या आयातीवर अवलंबून असलेल्या देशांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
 
अक्षय ऊर्जेवर भर
 
पंतप्रधान मोदी यांनी अक्षय आणि पर्यायी ऊर्जेच्या क्षेत्रात भारताने केलेल्या प्रगतीचाही उल्लेख केला. "सौरऊर्जानिर्मितीत भारत आज जगातील आघाडीच्या देशांपैकी एक आहे. तसेच, आयात इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण करण्याच्या मोहिमेत भारताने अभूतपूर्व प्रगती केली,” असे सांगितले.(Narendra Modi's Appeal to the Nation)
 
एक वर्ष सोने खरेदी करू नका
 
"पुढील एक वर्षभर सोन्याची खरेदी टाळावी. भारताला मोठ्या प्रमाणात सोने आयात करावे लागते, ज्यासाठी परकीय चलन खर्च होते. हे चलन वाचवणे सध्या देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी आवश्यक आहे,” असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
 
हेही वाचा :  PM Narendra Modi Economic Appeals : “आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचे मोठे आवाहन; पेट्रोलपासून सोन्यापर्यंत ‘हे’ खर्च तात्काळ कमी करा!”
 
परकीय चलन वाचवण्याचे उद्दिष्ट
 
"जागतिक संकटाच्या काळात भारताची अर्थव्यवस्था भक्कम ठेवण्यासाठी विदेशी मुद्रा वाचवणे हे सरकारचे प्राधान्य आहे. आपण जितकी इंधन आणि सोन्याची बचत करू, तितकाच देशाला फायदा होईल," असे पंतप्रधान मोदी(Narendra Modi's Appeal to the Nation) यांनी सांगितले.
 
पेट्रोलियम उत्पादने आवश्यकतेनुसारच वापरा
 
"आज पेट्रोल, गॅस आणि डिझेल यांसारख्या गोष्टींचा अत्यंत संयमाने वापर करणे, ही काळाची गरज आहे. आपल्याला आयात केलेली पेट्रोलियम उत्पादने केवळ आवश्यकतेनुसारच वापरावी लागतील. यामुळे केवळ परकीय चलनच वाचणार नाही, तर युद्धाच्या प्रतिकूल परिणामांची तीव्रताही कमी होईल,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.(Narendra Modi's Appeal to the Nation)
 
बहुआयामी ऊर्जाधोरणावर भाष्य
 
सरकारच्या बहुआयामी ऊर्जा धोरणावर पंतप्रधान मोदी म्हणाले की, "सरकारने प्रथम प्रत्येक घरापर्यंत ‘एलपीजी’ पोहोचवण्यावर लक्ष केंद्रित केले आणि आता स्वस्त ‘पाईप्ड गॅस’ पुरवठा वाढवण्याकडे लक्ष दिले जात आहे. याशिवाय ‘सीएनजी’आधारित इकोसिस्टमलाही केंद्र सरकार सक्रियपणे प्रोत्साहन देत आहे.
 
तेलंगणला विकासकामांची भेट
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दौर्‍यात अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांचे लोकार्पण केले. यामध्ये काझीपेट-विजयवाडा रेल्वे मार्ग, हैदराबादमधील नवीन पेट्रोलियम टर्मिनल आणि वारंगल येथील ‘पीएम मित्रा पार्क’ (काकतिया मेगा टेक्सटाईल पार्क)चा समावेश आहे. सुमारे १ हजार, ७०० कोटी खर्चून उभारलेले हे देशातील पहिले पूर्णतः कार्यरत ‘पीएम मित्रा पार्क’ आहे. केंद्राच्या ‘५एफ’ व्हिजनअंतर्गत हे पार्क कापूस उत्पादक शेतकर्‍यांपासून ते निर्यातीपर्यंतची संपूर्ण साखळी मजबूत करेल. यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होईल. ही काकतिया मेगा टेक्सटाईल पार्कची काही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
 
पर्यायी ऊर्जेसाठी भारताचे पाऊल
 
"भारत आज सौरऊर्जानिर्मितीत जगात आघाडीवर आहे. आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सरकारने पुढील पावले उचलली आहेत. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याच्या प्रमाणात मोठी वाढ करण्यात आली आहे. ‘उज्ज्वला योजने’द्वारे गॅस कनेक्शन दिल्यानंतर आता स्वस्त पाईप गॅस पुरवठ्यावर भर दिला जात आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी आणि स्वस्त इंधनासाठी सीएनजी जाळ्याचा विस्तार केला जात आहे,” असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.(Narendra Modi's Appeal to the Nation)