नवी दिल्ली : (Maharashtra Economy) पायाभूत सुविधा, नाविन्यपूर्णता, प्रतिभा, स्वच्छ ऊर्जा, सुव्यवस्थित शहरीकरण, तंत्रज्ञान आणि संस्थात्मक विश्वास या घटकांवरून भविष्यातील आर्थिक नेतृत्व निश्चित होणार आहे. या सर्व शक्तींचा सहयोग साधणाऱ्या अर्थव्यवस्था भविष्याचे नेतृत्व करणार असल्याने ही क्षमता असणारा महाराष्ट्र त्यादृष्टीने आवश्यक इकोसिस्टीम उभारत आहे. जागतिक अर्थव्यवस्थेच्या पुढील युगासाठी महाराष्ट्र सज्ज असून त्यासाठी सर्व आघाड्यांवर जाणीवेने प्रयत्न सुरु असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
नवी दिल्ली येथील हॉटेल ताज पॅलेसमध्ये कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीतर्फे (सीआयआय) आयोजित ॲन्युअल बिझनेस समिट-२०२६ या दोन दिवसीय परिषदेअंतर्गत सकाळच्या सत्रात झालेल्या 'व्हिजन फॉर इंडिया@१००' या परिसंवादात ते बोलत होते. कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीचे डायरेक्टर जनरल चंद्रदीप बॅनर्जी आणि अध्यक्ष राजीव मेमाणी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "इतिहासात असे काही क्षण येतात जेव्हा देश बदलामध्ये सहभागी होतात आणि असेही काही क्षण येतात जेव्हा देश त्या बदलाची व्याख्या स्वतः ठरवतात. सध्याचा क्षण हा भारतासाठी बदलाची व्याख्या ठरवण्याचा आहे. आजचे जग एकाच वेळी अनेक स्थित्यंतरातून जात आहे.
यात भू-राजकीय विखंडन, तांत्रिक उलथापालथ, ऊर्जा संक्रमण, पुरवठा साखळीतील बदल आणि आर्थिक विकासाच्या भविष्याबद्दलची मोठी अनिश्चितता यांचा समावेश आहे. मात्र, या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर भारत हा एकमेव देश मोठ्या प्रमाणावर जगाचा आत्मविश्वास वाढवत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, भारताने गेल्या दशकात स्वतःबद्दल जागतिक स्तरावर नवी प्रतिमा स्थापित केली आहे. आता आमच्याकडे क्षमतेसोबतच संधी आणि धोरणांची वेगाने अंमलबजावणी करणारा देश म्हणून पाहिले जात आहे."(Maharashtra Economy)
महाराष्ट्र देशाची ‘डेटा सेंटर’ आणि ‘स्टार्टअप’ राजधानी
"महाराष्ट्र या परिवर्तनाचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज आहे. त्यातही आमचा प्रयत्न पूर्णतः कायापालट करण्याचा आहे. दशकानुदशके महाराष्ट्र हे भारताचे ‘इकोनॉमिक इंजिन’ राहिले आहे. पण आता आम्ही त्याहूनही मोठ्या ध्येयासाठी स्वतःला तयार करत आहोत. जागतिक अर्थव्यवस्थेच्या पुढील युगासाठी आम्ही महाराष्ट्राला सज्ज करत आहोत. आज महाराष्ट्र ६६० अब्ज डॉलर्सची अर्थव्यवस्था आहे. भारताच्या अभियांत्रिकी निर्यातीत राज्याचा वाटा २० टक्क्यांहून अधिक असून देशाची ‘डेटा सेंटर’ आणि ‘स्टार्टअप’ राजधानी आहे," असेही ते म्हणाले.
"भविष्यातील महाराष्ट्राबाबत आमचा रोडमॅप स्पष्ट असून २०३० पर्यंत १ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था आणि २०४७ पर्यंत जगातील सर्वात महत्त्वपूर्ण प्रादेशिक अर्थव्यवस्थांपैकी एक असणे, हा उद्देश आहे. अनिश्चिततेच्या जगात, विश्वास हीच खरी आर्थिक पुंजी असते आणि महाराष्ट्राने हा विश्वास निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक काम केले आहे. महाराष्ट्रात डिझाइन, नवनिर्मिती आणि जागतिक बौद्धिक संपदा निर्माण करण्याची आमची महत्वाकांक्षा आहे. कारण भविष्यातील आर्थिक नेतृत्व हे तंत्रज्ञान निर्माण करणाऱ्यांकडेच असेल," असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.(Maharashtra Economy)
‘सीआयआय’ सारख्या संस्थांची महत्त्वाची भूमिका
ते पुढे म्हणाले की, "महाराष्ट्राची सर्वात मोठी ताकद म्हणजे इथला खुलेपणा, उद्योजकता, प्रागतिक विचारांचे नागरिक, भांडवल आणि कल्पकता आत्मसात करण्याची क्षमता आहे. महाराष्ट्र उद्योगांकडे राष्ट्रनिर्मितीतील भागीदार म्हणून मोठ्या आशेने पाहतो. केवळ सरकार जागतिक स्तरावर स्पर्धात्मक अर्थव्यवस्था निर्माण करू शकत नाही आणि केवळ उद्योगही ते करू शकत नाहीत. भावी काळ हा जिथे सरकार, उद्योग, शैक्षणिक संस्था आणि संशोधक एका सामायिक ध्येयाने एकत्र काम करतील, अशा समाजाचा असणार आहे. ‘सीआयआय’सारख्या संस्थांची हे भविष्य घडवण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका राहणार आहे."(Maharashtra Economy)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....