योगी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार;आठ मंत्र्यांचा शपथविधी; जुन्या-जाणत्या चेहर्यांसह नव्यांना संधी
11-May-2026
Total Views |
लखनौ : (Lucknow Political News) उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारच्या मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार रविवार, दि. १० मे रोजी दुपारी ३.३० वाजता ‘जन भवन’ येथे उत्साहात पार पडला. राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी आठ नवनियुक्त मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या विस्तारामध्ये जुन्या-जाणत्या चेहर्यांसह नव्या दमाच्या नेत्यांना संधी देऊन भाजपने रणनीती स्पष्ट केली आहे.
या शपथविधी सोहळ्यात भूपेंद्र चौधरी आणि मनोज कुमार पांडेय यांनी कॅबिनेटमंत्री म्हणून शपथ घेतली. डॉ. सोमेंद्र तोमर आणि अजित पाल यांची पदोन्नती करण्यात आली असून त्यांनी राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) म्हणून शपथ घेतली. याशिवाय कृष्णा पासवान, कैलाश सिंह राजपूत, सुरेंद्र दिलेर आणि हंसराज विश्वकर्मा यांनी राज्यमंत्री म्हणून आपल्या कारकिर्दीची नवी इनिंग सुरू केली आहे.
अनुभवी नेत्यांना स्थान
योगी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात पंचायत राज मंत्री राहिलेले तथा भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र चौधरी यांचे पुनरागमन झाले आहे. त्यांच्यासोबतच समाजवादीतून बंडखोरी करणारे उंचाहारचे आ. मनोज कुमार पांडेय यांनीही कॅबिनेटमंत्रिपदाची शपथ घेतली. पांडेय यांनी अखिलेश यादव यांच्या सरकारमध्येही काम पाहिले आहे. वाराणसीचे विधान परिषद सदस्य हंसराज विश्वकर्मा (अतिपिछडा वर्ग), फतेहपूरच्या खागा मतदारसंघाच्या आ. कृष्णा पासवान (अनुसूचित जाती), अलिगडमधील खैरचे आ. सुरेंद्र दिलेर आणि कनौजच्या तिर्वाचे आ. कैलाश सिंह राजपूत यांनी पहिल्यांदाच राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. (Lucknow Political News)
मंत्रिमंडळ विस्तारात दोन मंत्र्यांचा दर्जा वाढवण्यात आला आहे. मेरठ दक्षिणचे आ. डॉ. सोमेंद्र तोमर आतापर्यंत ऊर्जाविभागात राज्यमंत्री होते, त्यांना स्वतंत्र प्रभार देण्यात आला आहे. तसेच, कानपूर देहातच्या सिकंदरा मतदारसंघातील आ. अजित पाल यांचीही पदोन्नती झाली असून, त्यांच्याकडे विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचा स्वतंत्र प्रभार सोपवण्यात आला आहे. (Lucknow Political News)