देशातील खेळ क्षेत्रालाही एक इतिहास आहे. हा इतिहास विविध खेळाडूंच्या आत्मचरित्रातून बाहेर येतो. त्यातून नवीन माहिती समोर येते, अनेकदा काही गौप्यस्फोटही होतो, तर काही महान नेत्यांच्या जीवनावरही प्रकाश टाकला जातो. भारतीय क्रीडा क्षेत्र आणि महात्मा गांधी यांच्यातील सहसंबंधांचा घेतलेला हा आढावा...
मोहनदास करमचंद गांधी अर्थात, ‘राष्ट्रपिता’ हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या राजकीय समस्यांमध्ये इतके मग्न असत की, कला-क्रीडा या क्षेत्रांकडे लक्ष देण्यास त्यांच्याकडे अनेकदा वेळच नसे. हॉकी, क्रिकेट, फुटबॉल वगैरे क्रीडाप्रकार, तसेच चार्ली चॅप्लिनसारख्या गोष्टींसाठीही त्यांच्याकडे वेळ नसे. ‘पिता’ अर्थात, वडील म्हटले की, त्याने आपल्या सर्व मुलांना सम वागणूक देणे अपेक्षित असते. पण, राष्ट्रपित्याकडून मिळालेली वागणूक अनेकांना खटकणारी असल्याची उदाहरणे आपल्याला आढळतील. पित्यावर कामांची जबाबदारी मोठी असल्याने दुर्लक्ष झाले, तर मुलांनी कुरकुर करायची नसते.
एक काळ असा होता की, गांधी आणि फुटबॉल यांचा संबंध दृढ झाला होता. गांधीजी दक्षिण आफ्रिकेत असताना त्यांनी याचा वापर केवळ एक खेळ म्हणून नाही, तर सामाजिक जागृती आणि संघटित प्रतिकाराचे प्रभावी माध्यम म्हणूनही केला होता. गांधीजी यांनी दक्षिण आफ्रिकेतील डर्बन, प्रिटोरिया आणि जोहान्सबर्ग येथे तीन ‘फुटबॉल क्लब’ची स्थापना केली होती. खेळाच्या माध्यमातून तेथील भारतीय समुदायाचे संघटन उभारण्याचे कार्य ते करत.
मोहनदास करमचंद गांधी लहानपणी जिथे राहायला होते, तेथील स्थानिक युवकांच्या क्रिकेट सामन्यांतही ते ‘पंच’ म्हणून उत्साहाने सहभाग होत असत. आज जसे क्रिकेटमधील ‘आयपीएल’ स्पर्धा प्रसिद्ध आहे, तद्वतच त्याकाळी धर्माच्या आधारावर खेळवली जाणारी ‘बॉम्बे पेंटाग्युलर’ नावाची स्पर्धा प्रसिद्ध होती. या स्पर्धेत हिंदू, मुस्लीम, पारशी, युरोपियन आणि ‘इतर’ म्हणजे बौद्ध, ‘ज्यू’ आणि भारतीय ख्रिश्चनांसारखे धर्मावर आधारित पाच संघ असत. त्यावेळी याला गांधीजींनी देशाच्या एकात्मतेसाठी घातक मानले होते. जर क्रिकेटचे सामने धर्माच्या आधारावर खेळले जाणार असतील, तर ही संकल्पना धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाच्या कल्पनेशी विसंगत ठरेल, असे त्यांचे मत होते. तत्कालीन राजकीय स्वातंत्र्यलढ्याच्या काळात जेव्हा अनेक सत्याग्रही तुरुंगात होते, तेव्हा अशा मोठ्या क्रिकेट स्पर्धेच्या आणि एकूणच खेळांच्या माध्यमातून होणार्या त्यांच्या मौजमजेवरचे खर्च चुकीचे असल्याचेही त्यांचे मत होते. म्हणूनच, क्रिकेट स्पर्धांनाच गांधींचा स्पष्ट विरोध असे. कालांतराने १९४६ मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ‘बॉम्बे पेंटाग्युलर’ स्पर्धा बंद करून, त्याऐवजी ‘रणजी करंडका’सारखे सामने सुरू केले. गांधीजींचे असे ठाम मत होते की, खेळामध्ये धर्माला स्थान देऊ नये. त्यामुळे समाजात फूट पडून, त्यातूनच फाळणीची बीजे रोवली जाऊ शकतात. ‘पेंटाग्युलर’ क्रिकेटला विरोध करणारे गांधीजी, मग फुटबॉल आणि हॉकी करत, एकूणच क्रीडा क्षेत्रातून बाहेर पडले.
कालांतराने तर गांधीजी मैदानी खेळाचे नावही काढेनासे झाले. ते मग फक्त पदयात्रांद्वारे भरपूर चालणे, उपास करणे या व अन्य अशा क्षेत्रांशीच संलग्न राहिल्याचे दिसते. क्रीडा क्षेत्राशी तर जणूकाही त्यांनी फारकतच घेतली. समाजकारण व राजकारण यामध्ये लक्ष देताना क्रीडा क्षेत्राकडे ते डोळेझाक करू लागले. ब्रिटिश सत्तेशी भारताच्या वतीने चर्चा करणे, वाटाघाटी करण्याच्या कामात क्रीडा क्षेत्राला ते जणू विसरूनच गेले. त्याकाळात हिटलरसारख्या जागतिक स्तरावरील नेत्यानेही दखल घेतलेल्या भारतीय हॉकी-ध्यानचंद या घटनेकडेही गांधीजी गंभीरपणे बघेनासे झाले. ‘सुवर्णपदक’ मिळवून देत ‘ऑलिम्पिक’मध्ये भारताच्या नावाचा जयघोष जगभरात दुमदुमत असताना, गांधीजींकडून हॉकी-ध्यानचंदलाच नव्हे, तर एकूणच क्रीडा क्षेत्रालाच दुर्लक्षित केले गेल्याची अनेक उदाहरणे आपल्याला आढळतील.
मेजर ध्यानचंद यांनी त्यांच्या आत्मकथनात गांधीजींचा एका प्रकरणात उल्लेख केला आहे. त्या प्रकरणात गांधींवर टीका न करता व त्यांचा आदर राखत, गांधींसारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या नेत्याची वर्तणूक कशी होती, हे नमूद केले आहे. गांधींवर ते काय लिहितात ते आपण थोडक्यात बघूयात.
गांधीजी विचारतात, ‘हॉकी म्हणजे काय?’ : ‘लॉस एंजेलिस ऑलिम्पिक - १९३२’च्या दौर्यासाठी भारतीय संघाला मुंबई ते लॉस एंजेलिस असा प्रदीर्घ सागरीप्रवास करून जावे लागले होते. या स्पर्धेला जाणार्या भारतीय हॉकी संघाच्या खर्चाचा प्रस्तावित निधी उभारण्याकरिता, ‘भारतीय हॉकी महासंघा’च्या अधिकार्यांनी उचललेल्या एका असाधारण पावलाचा उल्लेखही ध्यानचंद यांनी केला आहे. पुढे जेव्हा ते जुन्या ‘स्क्रॅपबुक्स’ची (कात्रण-संग्रहाची) पाने चाळतात, तेव्हा आर्थिक चणचण भागवण्यासाठी केलेल्या आणखी एका प्रयत्नाचा पुरावा त्यांना सापडतो. दुर्दैवाने, तो प्रयत्न मात्र सफल होऊ शकला नाही. त्याकाळात खेळांकडे फारसे लक्ष दिले जात नसे. शिवाय, देशातील राजकीय वातावरणही तेव्हा अत्यंत तप्तच होते. त्यावेळी गांधीजी सिमल्यामध्ये, लॉर्ड आयर्विन यांच्याशी चर्चा करण्यात मग्न होते. क्रीडा क्षेत्रातीलच एका पडद्याआडच्या व्यक्तीने अशी सूचना केली होती की, जर गांधीजींना भारताच्या ऑलिम्पिक सहभागाच्या कल्पनेला आशीर्वाद देण्यासाठी राजी करता आले आणि त्यांच्या नावाने निधी उभारण्याचे आवाहन करण्यास त्यांची संमती मिळवता आली, तर आर्थिक प्रश्न सहजपणे सुटू शकेल. या सूचनेवर अंमलबजावणी करण्यात भारतीय हॉकी महासंघाने जराही वेळ घालवला नाही.
त्यावेळी पत्रकार म्हणून आपल्या व्यावसायिक कामासाठी सिमल्यामध्ये उपस्थित असलेल्या चार्ल्स न्यूहॅम यांच्यावर गांधीजींना भेटून विनंती करण्याचे कार्य सोपवण्यात आले. गांधीजींच्या अत्यंत व्यस्त राजकीय घडामोडींच्या गर्दीतून वाट काढत, न्यूहॅम यांना गांधीजींची भेट घेण्यात मोठ्या कष्टाने यश आले. पुढे त्यांनी आपला उद्देश गांधीजींना समजावूनही सांगितला. त्यावेळी गांधीजींनी आपल्या खास शैलीत न्यूहॅम यांना विचारले, ‘हॉकी म्हणजे काय?’ अत्यंत निराशेनेच न्यूहॅम घरी परतले. त्यांचे हे प्रयत्न विफल ठरले होते. या घटनेवरूनच ध्यानचंद आणखी एका प्रसंगाची आठवण त्या पुस्तकात लिहितात. ध्यानचंद म्हणतात, "तुमच्यापैकी अनेकांनी गांधीजी आणि चार्ली चॅप्लिन यांचे एकत्र असलेले एक छायाचित्र पाहिले असेल; हे छायाचित्र इंग्लंडमध्ये काढले होते. गांधीजी जेव्हा ‘गोलमेज परिषदे’च्या निमित्ताने तिथे गेले होते, त्यावेळचे हे छायाचित्र. चॅप्लिन यांनी गांधीजींना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. जेव्हा ही इच्छा गांधीजींपर्यंत पोहोचवण्यात आली, तेव्हा गांधीजींनी विचारले, ‘चार्ली चॅप्लिन म्हणजे कोण?’ गांधीजी राजकीय समस्यांमध्ये आणि आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात इतके मग्न होते की, चॅप्लिन, हॉकी किंवा ‘द अॅशेस’ (क्रिकेट मालिका) यांसारख्या गोष्टींकडे लक्ष द्यायला त्यांच्याकडे फारसा वेळच नव्हता. मला यात काहीच शंका वाटत नाही की, जर न्यूहॅम आपल्या कार्यात यशस्वी झाले असते, तर अपेक्षेपेक्षाही अधिक निधी नक्कीच जमा झाला असता. अर्थात, तत्कालीन सरकारने या गोष्टीकडे कोणत्या दृष्टीने पाहिले असते, हे मात्र मला सांगता येत नाही. कारण, त्याकाळात खेळांनाही परकीय सरकारचाच मोठा आश्रय घ्यावा लागत असे. शिवाय, त्या सरकारच्या ‘अनुदानाच्या’ प्रवाहावर जर गांधीजींच्या विचारांची किंवा प्रभावाची कोणतीही छटा उमटली असती, तर त्यांनी नक्कीच त्या गोष्टीला नापसंती दर्शवली असती.”
एकदाची चॅप्लिन-गांधी भेट झाली : लंडनच्या कॅनिंग टाऊन येथे एकदाची दि. २२ सप्टेंबर १९३१ रोजी गांधी-चॅप्लिन ही भेट झाली. गांधीजींना चित्रपट आवडत नसे. त्यांनी त्यांच्या उभ्या आयुष्यात फक्त दोनच चित्रपट पाहिले होते, त्यामुळे ते चॅप्लिनला ओळखत नव्हते. जेव्हा गांधीजींच्या सहकार्यांनी सांगितले की, चॅप्लिनला गरिबांबाबत कळवळा असून, त्यांच्या चित्रपटांतून चॅप्लिन गरिबांचा सन्मान करतात, तेव्हा गांधीजी महत्प्रयासाने कसेबसे मग भेटायला तयार झाले. त्या भेटीत चॅप्लिनने गांधीजींना यांत्रिकीकरणाबद्दल विचारले होते. त्यावर गांधीजी म्हणाले की, ‘यंत्रांमुळे भारतीयांचा रोजगार हिरावून घेतला जात आहे.’ या भेटीमुळे प्रभावित होऊन चार्ली चॅप्लिनने नंतर ‘मॉडर्न टाइम्स’ हा प्रसिद्ध चित्रपटाची निर्मिती केली, ज्यामध्ये आपल्याला गांधीजींच्या विचारांची झलक पाहायला मिळते. चार्ली चॅप्लिन आणि महात्मा गांधी यांची ही भेट, दोन पूर्णपणे भिन्न क्षेत्रांतील दिग्गज व्यक्तींची भेट ठरली होती. त्या चॅप्लिनविषयी गांधीजींचे विचार काय होते? त्याचाही ध्यानचंद यांनी त्यांच्या आत्मकथनात थोडक्यात उल्लेख केला आहे.
तर असा होता, ध्यानचंदसारख्या महान खेळाडूने अनुभवलेला स्वातंत्र्यपूर्व काळ. ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक पदके मिळवूनही गांधीजींसारख्या नेत्याने भारतीय खेळाडूंची पाठ थोपटल्याची एकही घटना दिसली नाही. असाच होता तो काळ आणि असेच होते ते नेते. आज स्वातंत्र्यप्राप्तीनंतर कला व क्रीडा क्षेत्राकडे पाहाण्याच्या दृष्टिकोनात आमूलाग्र फरक पडलेला आपल्याला सहज दिसून येतो आहे. याबाबतीत आजचे भारतीय क्रीडापटू नक्कीच नशीबवान म्हणायला हवेत. आता गरज आहे, ती त्यांनी देशाला ऑलिम्पिक आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अधिकाधिकपदके मिळवून देण्याची. कारण, आर्थिक पाठबळ मिळवण्यात त्यांना पूर्वीसारखे झगडायला लागत नाही, ही वस्तुस्थिती आहे.
श्रीपाद पेंडसे
(लेखक माजी खेलकूद आयामप्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत.)
९३७०२९९५२९