Vishwas Patil :‘संभाजी’ कादंबरीबाबत सरकारी वकिलांकडून दिशाभूल
लेखक विश्वास पाटील यांची आयोगाकडे तक्रार
11-May-2026
Total Views |
मुंबई : (Vishwas Patil) प्रख्यात लेखक विश्वास पाटील यांनी ‘संभाजी’ कादंबरी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या अंत्यसंस्काराबाबत सरकारी वकील अॅड. शिशिर हिरे यांच्याविरोधात भीमा कोरेगाव आयोगाकडे रीतसर तक्रार नोंदवली आहे. सरकारी वकिलांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतींमध्ये कादंबरीतील संदर्भांचा विपर्यास करून आपली आणि कादंबरीची जाणीवपूर्वक बदनामी केल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. या संदर्भात फेसबूक आणि युट्युबच्या माध्यमातून त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
विश्वास पाटील यांनी आयोगाच्या पुणे कार्यालयात ही तक्रार दिली. अॅड. शिशिर हिरे यांनी दिल्ली आणि पुणे येथे विविध वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतींमध्ये कादंबरीबाबत असत्य कथन केल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. "माझी साक्ष झाल्यानंतर अॅड. हिरे यांनी जाणीवपूर्वक माध्यमांसमोर जाऊन माझ्या विधानाचा आणि कादंबरीतील मजकुराचा चुकीचा अर्थ लावला. 'संभाजी' कादंबरीमुळे समाज दुभंगला जात असल्याचे विधान करून त्यांनी वाचकांमध्ये माझ्याविषयी तिरस्कार निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे," असा दावा पाटील यांनी तक्रारीत केला आहे.
अॅड. हिरे यांनी असा आरोप केला होता की, कादंबरीत संभाजी महाराजांचा अंत्यविधी एका विशिष्ट समाजाने केला आणि स्थानिकांनी मदत केली नाही, असा उल्लेख आहे. यावर स्पष्टीकरण देताना विश्वास पाटील म्हणाले, "कादंबरीच्या शेवटच्या प्रकरणात मी २६ ठिकाणी नमूद केले आहे की, वडू बुद्रुकच्या सर्व जातीधर्मांच्या बहाद्दर गावकऱ्यांनी मिळून महाराजांवर अंत्यसंस्कार केले. फक्त एकाच समाजाने हे कार्य केले, असे मी कुठेही लिहिलेले नाही. उलट मी वडू बुद्रुक गावाला देहू-आळंदीसारख्या पवित्र स्थानाचा दर्जा दिला आहे."संभाजी महाराजांच्या अंत्यसंस्काराचा प्रसंग काल्पनिक असल्याचे विधान अॅड. हिरे यांनी केले होते. याला छेद देताना पाटील यांनी सांगितले की, "मी आयोगासमोर 'मासिर-इ-आलमगिरी', 'फुतूहात-इ-आलमगिरी' यांसारखे समकालीन पुरावे आणि सेतू माधवराव पगडी, डॉ. जयसिंगराव पवार, वा. सी. बेंद्रे यांसारख्या थोर इतिहासकारांच्या ग्रंथांचे संदर्भ दिले आहेत. हे सर्व पुरावे असतानाही सरकारी वकील इतिहासाचा विपर्यास करत आहेत." अॅड. हिरे यांनी मुलाखतीदरम्यान 'सिनेमॅटिक लिबर्टी' संदर्भात जे भाष्य केले होते, त्यावर बोलताना विश्वास पाटील म्हणाले की "एखादे सरकारी वकील न्यायालयीन आयोगाच्या व्यासपीठाचा वापर स्वतःच्या प्रसिद्धीसाठी आणि भविष्यातील लेखन स्वातंत्र्यावर बंधने आणण्यासाठी करत असतील, तर ते त्यांच्या कक्षेबाहेरचे आणि आक्षेपार्ह आहे.
बदनामीचे कृत्य दु:खद! -- विश्वास पाटील
"संभाजीराजांच्यावर उत्तम लेखन करण्यासाठी मी दिल्ली, बुरहानपूर, बारदेश, चिकमंगरूळपासून ते दक्षिणेत तामिळ प्रांतात त्रिचनापल्लीपर्यंत धडक मारली होती. संभाजी राजे आणि शिवराय यांचे २५० पेक्षा अधिक किल्ले मी स्वतः चढून पाहिले आहेत. माझ्या कादंबरीचे प्रत्येक पान लिहिताना मी दहा वेळा विचार करतो. अनेक दिवस चिंतन-मनन करतो. त्यामुळेच गेल्या चाळीस वर्षांत मराठी वाचकांनी माझे लेखन डोक्यावर घेतले आहे. पण कोणी मुद्दाम कट करून, योजनाबद्धरित्या मला व माझ्या लेखनाला बदनाम करत असेल, तर ती गोष्ट खूपच दुःखदायक आहे."