आकाशची ‘इन्फ्रागाथा’

Total Views |
Akash Bhavsar Infra Journey
 
यांत्रिकी अभियंता ते विकास पत्रकारितेतील विश्वासार्ह चेहरा होण्यापर्यंतचा यशस्वी प्रवास करणार्‍या आकाश भावसार याच्याविषयी...
 
आजच्या या डिजिटलयुगात मजकूरनिर्मिती ही मनोरंजनाची गोष्ट राहिलेली नाही. समाजाला दिशा देणारे अनेक तरुण, या माध्यमातूनच नवीन अवकाशनिर्मिती करत आहेत. या तरुणांना आता राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून, नवीन व्यासपीठही मिळाले आहे. एक वेगळी वाट चोखंदळणारा, नव्या पिढीतील असाच एक तरुण म्हणजे आकाश भावसार.
 
आकाश ‘पॉवर ट्रेन’ नावाने, ‘युट्यूब’वर देशातील विविध पायाभूत प्रकल्पांची इत्यंभूत माहिती देतो. अल्पावधीतच त्याच्या या प्रयत्नांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. यांत्रिकी-अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेला हा तरुण, पत्रकारितेच्या पायाभूत सुविधा क्षेत्रात स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करत आहे.
 
आकाश मूळचा धुळ्याचा. मात्र, अंबरनाथमध्ये आकाशचा जन्म झाला आणि बालपणही तेथेच गेले. मध्यमवर्गीय कुटुंब, संघर्षमय परिस्थिती आणि आयुष्यात सतत बदलणार्‍या जबाबदार्‍या, यातूनच त्याचा जीवनप्रवास घडत गेला. त्याचे वडील मुलुंडमधील ‘गॅब्रिएल’ कंपनीत ‘फॅटरी वर्कर’ म्हणून कार्यरत होते. मात्र, २००६ मध्ये ही कंपनी बंद झाल्याने, कुटुंबावर कठीण काळ ओढावला. मोठ्या कठिण कालखंडानंतर त्यांनी, ‘कन्स्ट्रशन सुपरव्हायजर’ म्हणून स्वतःला स्थिर केले. आकाश यांची आई गृहिणी, तर भाऊ यांत्रिकी अभियंता म्हणून शिक्षण घेत होता. अशा मेहनती वातावरणातच आकाशची जडणघडण झाली.
 
आकाशला लहानपणापासूनच विज्ञान, मशीन आणि तंत्रज्ञानाची विशेष आवड. अभियांत्रिकी आणि वैज्ञानिक क्षेत्राचे त्याला आकर्षण होते. त्यामुळेच यांत्रिकी-अभियांत्रिकीचा मार्ग त्याने निवडला. शिक्षण सुरू असतानाच, मोठ्या कंपनीत नोकरीचे स्वप्न त्याने पाहिले होते. मात्र, ‘बॉश’सारख्या जागतिक कंपन्यांत काम करण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या आकाशसमोर, घराला स्थैर्य देण्याचेही आव्हान होते.
 
अभियांत्रिकीच्या तिसर्‍या वर्षातच त्याला ‘एज्युकेशनल सेल्स’मध्ये नोकरीची आलेली संधी, त्याने स्वीकारली. पण, आकाशने हे काम स्वीकारतानाही स्वतःची स्वप्ने जिवंतच ठेवली. त्याच्या व्यक्तिमत्त्वातील हाच पैलू, त्याला इतरांपेक्षा वेगळी ओळख देतो.
आकाशच्या आयुष्यातील एक मोठा ‘टर्निंग पॉईंट’ म्हणजे, नोकरीदरम्यान बांधकाम क्षेत्राशी आलेला प्रत्यक्ष संबंध. वडिलांसोबत विविध बांधकाम स्थळांवर जाणे, मोठे पायाभूत सुविधा प्रकल्प जवळून पाहणे या सगळ्याने त्याला भूरळ पाडली होती. त्यामुळे शहरातील विविध विकास कामांचा आकाश अत्यंत बारकाईने अभ्यास करू लागला. सामान्य माणूस ज्या रस्त्यांवरून चालतो, ज्या पाण्याच्या जलवाहिन्या वापरतो, ज्या रेल्वेने प्रवास करतो, त्यामागे किती मोठी अभियांत्रिकी, नियोजन असते, हे त्याला जाणवले.
 
याच काळात त्याने ‘व्हिडिओ एडिटिंग’ कौशल्येही आत्मसात केली. सुरुवातीला तो फक्त एक छंद होता. मात्र, पुढे आकाशने याबाबत मोठा विचार केला. ‘पायाभूत सुविधा हीसुद्धा एक महत्त्वाची मीडिया कॅटेगिरी होऊ शकते,’ हाच तो विचार.
आकाशचा मुद्दा अत्यंत स्पष्ट होता. पायाभूत सुविधा हा प्रत्येकाच्या आयुष्याशी जोडलेला विषय असूनही, त्यावर सखोल आणि सातत्यपूर्ण मजकूर अत्यल्प तयार होतो. सामान्य माणूस घराबाहेर पडल्यापासून पायाभूत सुविधांशी जोडला जातो. मग या क्षेत्रासाठी जागा का नसावी? यातूनच ‘पॉवर ट्रेन’चा जन्म झाला. सुरुवातीला हा फक्त एक प्रयोग होता. पण, दोन वर्षांच्या अविश्रांत परिश्रमानंतर परिस्थिती बदलली. लोक जोडले गेले, संपर्क वाढले, सरकारी अधिकारी आशायनिर्मिती बघू लागले. हळूहळू ‘पॉवर ट्रेन’ हे नाव, ‘इन्फ्रास्ट्रचर स्टोरीटेलिंग’मध्ये विश्वासार्ह झाले.
 
आकाशच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण म्हणजे, गोव्यातील एका कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याची मिळालेली संधी. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासारख्या सर्वोच्च नेत्यांकडूनही, ‘पॉवर ट्रेन’चा आशाय बघितला जात असल्याचे त्याचवेळी त्याला समजले. हा क्षण ’योग्य दिशेने चाललो आहोत’ याची खात्री पटवून देणारा ठरल्याचे आकाश सांगतो.
 
आज ‘पॉवर ट्रेन’ पायाभूत सुविधा क्षेत्रातील, विश्वसार्ह माध्यम म्हणून विकसित होत आहे. महाराष्ट्राबरोबरच गुजरात, आंध्र प्रदेश, दिल्ली अशा विविध राज्यांमधूनही आकाशला बोलावणे येते. सरकारी यंत्रणा, खासगी संस्था आणि धोरणकर्त्यांसोबत काम करताना, आकाशने स्वतःला एक विश्वसार्ह संशोधक म्हणून उभे केले आहे.
 
आकाशचा प्रवास आजच्या तरुणांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरतो. करिअर सरळ असेलच असे नाही. अनेकदा सुरुवात एका क्षेत्रात होते आणि खरी ओळख दुसर्‍या क्षेत्रात. अभियांत्रिकी शिकलेला एक मुलगा माध्यमात येतो. पण, मनोरंजनासाठी नाही, तर देशाच्या विकासाच्या कथा सांगण्यासाठी. त्याच्या यशामागे निरीक्षण, संशोधन आणि सातत्य आहे. आजच्या पिढीत अनेकजण व्हायरल होण्याचे स्वप्न पाहतात. पण, आकाशची कथा सांगते की, ‘व्हॅल्यूएबल’ होणे हे ‘व्हायरल’ होण्यापेक्षा जास्त महत्त्वाचे. ‘पॉवर ट्रेन’ला सर्वात विश्वासार्ह बनवणे हेच आकाशचे ध्येय आहे.
 
आकाशला त्याच्या पायाभूत सुविधा क्षेत्रात मजकूरनिर्मितीच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी, यंदाचा ‘देवर्षी नारद’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आकाशला त्याच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.