शिक्षणक्षेत्रातील ‘एआय’पर्व

    11-May-2026
Total Views |
AI Education Policy India
 
तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नवनवे शोध लागतात आणि ते नैमित्तिक आयुष्याचा भाग होतात. सध्या असेच काहीसे ‘एआय’बाबत म्हणता येईल. या तंत्रज्ञानाच्या लाभाबरोबरच तोट्याचीही चर्चा सुरू आहे. कझाकस्तानने त्यांच्या शिक्षण व्यवस्थेत ‘एआय’ वापराचे धोरण स्वीकारले. आपल्या नव्या शिक्षण धोरणातही अशी तरतूद आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्र आणि ‘एआय’चा वापर याचा घेतलेला आढावा...
 
जग आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सोबतच परिवर्तनाची वाट चालते आहे. जगातील अनेक क्षेत्रे कृत्रिम बुद्धिमत्तेने काबीज करावी, अशी परिस्थिती निर्माण झाली असून, कदाचित मोठ्या प्रमाणावर नोकर्‍या जाण्याचा धोका सांगीतला गेला आहे. वर्तमानात विविध क्षेत्रांत ‘एआय’चा वापर सुरू झाल्यानंतर अनेक क्षेत्रांतील नोकर्‍यांची संख्या कमी झाली आहे. मागील काही महिन्यांतील काही सर्वेक्षणानुसार, जगभरात पाच-सहा लाख कर्मचार्‍यांना त्यांच्या नोकर्‍या गमवाव्या लागल्या आहेत. अशा परिस्थितीत कझाकस्तानने अधिकृतपणे शिक्षण व्यवस्थेत ‘एआय’ तंत्रज्ञानाच्या उपयोगाची भूमिका घेतली आहे. अर्थात, जगातील अनेक देश याच दिशेने पावले टाकत असून, भारतानेही राष्ट्रीय शिक्षण धोरणात त्याच दिशेने पाऊल टाकलेआहे. ‘एआय’च्या धोक्याबाबतची चर्चा अलीकडे सर्वत्र वाढली आहे. मुळातच कोणतेही संशोधन नव्याने झाले की, त्याचा उपयोग करताना त्याचे बरे-वाईट परिणाम समोर येतातच. कोणतेही एक संशोधन हे उपयोगी असते, त्याप्रमाणे त्याचे नकारात्मक परिणामही असतातच.
 
पण, त्याचे परिणाम कसे हवेत, हे संशोधन उपयोजन करणार्‍या व्यक्तीवर अवलंबून आहे. त्यामुळे ‘एआय’चा जगातील सर्वच क्षेत्रांत उपयोग होणार, यात शंका नाही. मात्र, तंत्रज्ञानाच्या अधिक वापराने हमखास नुकसानच होणार, हे गृहीत धरणेही चुकीचेच ठरणार आहे. ‘एआय’चा उपयोग गुणवत्ता आणि प्रशासनाच्या कामासाठी केल्यास नवे तंत्रज्ञान फायदेशीर ठरण्याचीच शक्यता अधिक आहे.
 
आरंभी जेव्हा आकाशवाणी, दूरदर्शन त्यानंतर आंतरजाल, संगणकासारख्या सुविधा आल्या; तेव्हा त्याचा शिक्षणावर परिणाम होण्याची चर्चा झालीच होती. मात्र, त्याचाही परिणाम झालाच. हा परिणाम होत असतानाच, अलीकडे ‘एआय’चा धोका अधिक असल्याची चर्चा सध्यातरी जोर धरते आहे. ‘एआय’मुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची मनोवृत्ती कमी होण्याचा धोका असल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. अर्थात, विद्यार्थी पूर्वी अभ्यास करताना पुस्तकांचे वाचन करून, त्यातूनच प्रश्नांची उत्तरे शोधत असत. त्यावेळी विद्यार्थ्यांना आशय, आकलनाचा विचार केल्याशिवाय कोणत्याही प्रश्नांची उत्तरे मिळत नव्हती. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना अभ्यासात अल्प मदतीकरिता विविध गाईड, अपेक्षित प्रश्नसंच बाजारात आले. मुलांना त्यांची मदत झाली खरी. मात्र, अभ्यासाच्या वृत्तीवरही त्याचा काहीसा परिणाम झाला. मध्यंतरीच्या काळात ‘आंतरजाल’ आल्यावर प्रश्नांची उत्तरे शोधणे तर सहजसाध्य झाले. मात्र, ‘एआय’च्या माध्यमातून उपयोग केला जाऊ लागला. ‘एआय’मुळे आज कोणत्याही प्रश्नाचे उत्तर सहज मिळते. परिणामी, मुले त्याचाच अधिकाधिक उपयोग करतात. त्यामुळेच आज अनेक पालकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. मात्र, अनेकदा ‘एआय’च्या माध्यमातून काही प्रश्नांची उत्तरे मिळवताना चिकित्सक, विचारप्रवर्तक प्रश्नांच्या बाबतीत स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊनच उत्तरे द्यावी लागतात. तेव्हा मात्र, काही मर्यादा पडत असल्याचेही चित्र समोर आले आहे.
 
कझाकस्तानमध्ये सर्व शिक्षण प्रक्रियेत ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी विविध प्रकल्प राबवण्याची भूमिका सरकारने घेतली. ‘डिजिटल’ शिक्षण प्लॅटफॉर्मवर ‘एआय’ आधारित मूल्यांकन साधने वापरून, विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचे निरीक्षण आणि प्रगती मोजली जाण्याच्या दृष्टीनेही काही प्रयोग केले जात आहेत. वेगवेगळ्या स्तरावर विद्यार्थ्यांचे कौशल्य समजून त्यांना योग्य साहित्य उपलब्धतेच्या दृष्टीनेही पावले टाकली जात आहेत.
 
कझाकस्तानने ‘एआय’ आधारित शिक्षण धोरण तयार केले असून, त्यानुसार शिक्षण व मूल्यमापन प्रक्रिया, शिक्षक प्रशिक्षणातही ‘एआय’चा वापर होणार आहे. ‘एआय’च्या उपयोगाने संकलित करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या माहितीच्या आधारे, व्यक्तिगत शिक्षण योजनांचाही विकास होणे अपेक्षित आहे. असे मार्गदर्शन उपलब्ध असेल, तेव्हा विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने व्यावसायिक मार्गदर्शन, विद्यार्थ्याची अभिरुची, विविध विषयांतील नैपुण्याचा विचार करून विद्यार्थ्याला स्वत:ची वाट चालता येईल. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना भविष्याच्या दृष्टीने ‘एआय’द्वारे मदत करता येणेही शक्य होईल. मुळातच कझाकस्तान जे करू पाहते आहे, तोच विचार आपल्यालादेखील करता येणे शक्य आहे. याचबरोबर विविध स्तराच्या परीक्षा मूल्यांकन, स्वयंचलित व्यवस्थेचा वापर शिक्षण प्रक्रियेत शक्य आहे का, याचाही विचार शिक्षण प्रक्रियेत सुरू आहे.
 
मुळात ‘एआय’चा प्रत्यक्ष उपयोग अध्ययन-अध्यापनात करता येणे, काहीसे कठीण आहे. शेवटी, अध्ययन-अध्यापन प्रक्रिया जगभरात सारखीच असते असे नाही. कदाचित, आशय सारखा असला; तरी अध्यापनाच्या प्रक्रियेसाठी स्थानिक परिस्थिती, मुलांची भाषा, परिसर, सामाजिक-आर्थिक-सांस्कृतिक परिस्थिती भिन्न असते. त्यामुळे प्रत्येक मुलाची अभिरुची लक्षात घेऊनच, अध्यापनाचे नियोजन करावे लागते. त्यामुळे माहिती तंत्रज्ञान, ‘एआय’सारख्या साधनांच्या उपयोगाने अध्यापन परिणामकारक करण्याला सध्यातरी निश्चितच मर्यादा आहेत. मात्र, वस्तुनिष्ठ मूल्यमापनासाठी ‘एआय’चा उपयोग करता येणे शक्य आहे. किंबहुना, मूल्यमापन केल्यानंतर जी माहिती आपल्या हाती येते, त्याच्या आधारे विश्लेषण करता येणेही सहजसाध्य आहे. या विश्लेषणाच्या आधारे विद्यार्थ्यांच्या गुणात्मक विकासासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे मूल्यमापनात जरी ‘एआय’चा उपयोग केला, तर विद्यार्थ्यांच्या अध्ययनाला दिशा देणे शक्य होईल. त्यादृष्टीने जगातील अनेक देश ‘एआय’चा उपयोग करू पाहात आहेत. अर्थातच, ‘एआय’चा प्रभावी वापर केल्यास शिक्षणात अचूक निरीक्षण व परिमाणात्मक मूल्यमापन शक्य आहे. प्रत्येक विद्यार्थ्यास वैयक्तिक स्वरूपातले मार्गदर्शनही मिळेल, त्याचबरोबर शिक्षकांनाही प्रत्येक विद्यार्थ्याला कोणत्या पद्धतीने शिकवावे, त्याची अभिरुची लक्षात आल्याने त्यादृष्टीने अनुभवांची रचना करणे शक्य आहे. असे घडले, तर सध्या शिक्षकांना माहिती वारंवार गोळा करणे, त्या माहितीचे विश्लेषण आणि अध्ययन-अध्यापन करणे, त्यादृष्टीने नियोजन करण्यासारखे प्रकार कमी घडतील.
 
यातूनच शिक्षकांचा मोठा वेळही ‘एआय’च्या प्रभावी वापराने वाचेल. या वेळेचा वर्गातील प्रत्यक्ष अध्यापनासाठी उपयोग करता येणे शक्य होईल. त्यामुळे विद्यार्थी-शिक्षक आंतरक्रिया अधिक परिणामकारक होण्यास सहकार्य होऊन त्यातूनच गुणवत्तेची वाट चालता येईल. ‘एआय’च्या वापराने शिक्षकांचा अशैक्षणिक कामाचा भार कमी होण्याचीही अपेक्षा आहे. कझाकस्तानच्या शैक्षणिक धोरणानुसार, विद्यार्थ्यांच्या मूल्यांकन व व्यक्तिगत अध्ययन प्रक्रिया सुधारण्यासाठी त्याचा वापर होणार आहे. शिक्षक प्रशिक्षण व शाळा प्रशासन आधुनिक करण्यासाठी शैक्षणिक निर्णयाच्या प्रक्रियेतही माहितीआधारित, तंत्रज्ञान-सक्षम पद्धतीचाही उपयोग होणार आहे.
 
अर्थात, भारत सरकारनेदेखील जाहीर केलेल्या ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’मध्ये ‘एआय’आधारित ‘राज्यस्तरीय मूल्यमापन’ प्रणाली स्थापन करण्याची भूमिका मांडली आहे. त्याबरोबरच ‘डिजिटल लर्निंग’, ‘एआय इंन्टीग्रेशन’चा विचारही धोरणात नमूद आहे. ‘राष्ट्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान फोरम’ची स्थापना केली जाणार असल्याचेही त्यात म्हटले आहे.
 
‘एआय’आधारित शिक्षण साधने, माहितीआधारित विश्लेषण, डिजिटल शिक्षण प्रतिकृती लागू करण्याबाबतही त्यात सूतोवाच करण्यात आले आहे. ऑनलाईन शैक्षणिक संसाधने, आभासी प्रयोगशाळा आणि ई-अभ्यासक्रम देशातील विविध प्रादेशिकभाषांमध्ये उपलब्ध करून देण्याचा विचार करण्यात आला आहे. आपल्या धोरणात शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या प्रगतीचे ‘डिजिटल ट्रॅकिंग’ व विश्लेषण ‘एआय’द्वारेच करण्यात येणार आहे. तसेच प्रौढ शिक्षण व व्यावसायिक कौशल्ये, प्रौढ व व्यावसायिक शिक्षणात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करत ‘ई-कोर्सेस’ही उपलब्ध केले जाणार आहेत.
 
विविध कौशल्यांच्या दृष्टीने ‘एआय’आधारित मार्गदर्शन, व्यावसायिक समुपदेशन आणि आंतरक्रियात्म अध्यापनाचा विचारही सरकारने केला आहे. या प्रवासात देशातील शिक्षण प्रणालीचे ‘डिजिटायझेशन’ होणार असून, त्यामुळे शिक्षणाचे निरीक्षण, मूल्यांकन आणि प्रशासकीय सुधारणांसाठीची वाट प्रशस्त होणार आहे. त्याचबरोबर ‘एआय’द्वारे अध्ययन विश्लेषणही केले जाईल. विद्यार्थ्यांच्या क्षमता आणि आवडी लक्षात घेऊन शिक्षण अधिक विद्यार्थीभिमुख करण्यावरही भर देण्यात येणार आहे. सध्याच्या शिक्षक प्रशिक्षणातही ‘एआय’चा उपयोग होणार असल्याचे धोरणात नमूद आहे. त्यानुसार, अध्यापन कौशल्य, मूल्यांकन आणि शैक्षणिक संसाधने ‘एआय’च्या आधारे सुधारली जाण्याची अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे. आपल्या धोरणात विद्यार्थ्यांना संपूर्ण ज्ञान, कौशल्ये आणि ‘डिजिटल’ साक्षरता देणे, ‘एआय’च्या माध्यमातून शिक्षणाची गुणवत्तापूर्ण, समावेशक व पारदर्शक अंमलबजावणी करणे आणि सामाजिक-सांस्कृतिक समावेश सुनिश्चित करण्याचा विचारही अंतर्भूत आहे. तसेच शिक्षणाच्या सर्व स्तरावर आधुनिक तंत्रज्ञान आणि ‘डिजिटल’ साधनांचा समावेश करत, आपली शिक्षण प्रणाली बहुविषयक बनवण्याचे उद्दिष्टही ठेवले आहे. आपले शैक्षणिक धोरण २१व्या शतकात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि वेगाने बदलणार्‍या जगाच्या कौशल्य मागणीनुसार, शिक्षणाला आकार देण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. जग ज्या दिशेने पावले टाकते आहे, त्याच दिशेने आपला प्रवास सुरू करण्याच्या दृष्टीनेही धोरणात विचार करण्यात आला आहे. या नव्या वाटांना कोणताही पर्याय नाही, फक्त ‘एआय’च्या प्रभावी वापरासाठी विवेकाची वाट निर्माण करण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे. ‘एआय’ माहिती पुरवेल. पण, विवेकी विचाराची प्रक्रिया माणसालाच करावी लागेल, यात शंका नाही.
 
संदीप वाकचौरे