मुंबई : (ABVP Event Delhi) "प्रा. केळकरजींमुळे विद्यार्थी परिषदेत मला जीवनदृष्टी मिळाली आणि संघात ती अधिक विकसित झाली.", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी केले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे शिखर पुरुष आणि माजी राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. यशवंतराव केळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘प्रिय केळकरजी’ या विशेष अभिवाचन कार्यक्रमाचे आयोजन डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी, सिविक सेंटर, नवी दिल्ली येथे करण्यात आले.
यावेळी अभाविपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. राजकुमार भाटिया, राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. रघुराज किशोर तिवारी, अखिल भारतीय छात्रा कार्य प्रमुख मनु शर्मा कटारिया, दिल्ली प्रदेश अध्यक्ष डॉ. तपन बिहारी आणि प्रदेश मंत्री सार्थक शर्मा उपस्थित होते. कार्यक्रमास विविध विद्यापीठांचे कुलगुरू, कुलसचिव, प्राध्यापक, दिल्ली विधानसभा अध्यक्ष, दिल्ली सरकारचे मंत्री, संघ प्रेरित संघटनांचे कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
उपस्थितांना संबोधत दत्तात्रेय होसबाळे म्हणाले की, “बाळासाहेब देवरस नेहमी म्हणत असत की, यशवंतराव केळकर हे डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचे खरे वारसदार आहेत. प्रा. केळकरजींनी संघटन उभारणीची अशी सूत्रे दिली, ज्यावर अभाविपची भक्कम पायाभरणी उभी राहिली. त्यांनी अभाविपला केवळ आंदोलनापुरते मर्यादित न ठेवता रचनात्मकता, प्रतिनिधित्व आणि राष्ट्रनिर्मितीची दिशा दिली. टीमवर्क, वेळेचे पालन, साधेपणा, साधनसंपत्तीचा योग्य उपयोग आणि आत्मीय कार्यपद्धतीद्वारे त्यांनी संघटन जीवनाचा आदर्श निर्माण केला. मत्सर आणि द्वेष न बाळगता सर्वांना सोबत घेऊन चालणारे ते व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे जीवन हे कार्यकर्त्यांसाठी अखंड प्रेरणास्त्रोत आहे.”(ABVP Event Delhi)
अभाविपचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. रघुराज किशोर तिवारी म्हणाले, “प्रा. यशवंतराव केळकर यांचे जीवन प्रत्येक कार्यकर्त्यासाठी आदर्श आहे. आज देशभरात अभाविपची जी कार्यपद्धती दिसून येते, ती केळकर यांनी दिलेली आहे. त्यांच्या जीवनातून प्रत्येक कार्यकर्त्याने हे शिकण्याची गरज आहे की, कथनी आणि करणी यामध्ये कोणताही फरक नसावा.”
अभाविपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. राजकुमार भाटिया म्हणाले, “जर आपल्याला प्रा. केळकरजींचे व्यक्तिमत्त्व आणि अभाविपची कार्यपद्धती समजून घ्यायची असेल, तर त्यांच्या जीवनावर आणि विचारांवर आधारित साहित्याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. प्रा. केळकरजी विद्यार्थी परिषदेला व्यक्तिमत्त्व निर्माण करणारी कार्यशाळा मानत असत.”(ABVP Event Delhi)
कार्यक्रमात पुणे येथील मिलिंद भडगे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या अभिवाचन कार्यक्रमात प्रा. केळकरजींचे जीवन, विचार आणि कार्यपद्धती प्रभावीपणे उभी केली. या सादरीकरणात अभाविपची कार्यपद्धती, पूर्वयोजना, पूर्ण योजना, वेळेचे नियोजन, शिस्त, सामूहिकता आणि कार्यकर्ता निर्माणाची सजीव पद्धत मांडण्यात आली.(ABVP Event Delhi)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक