Modi Script : मराठ्यांच्या इतिहासाची गुरुकिल्ली म्हणजे मोडी लिपी : सुनील कदम

मुंबईत पहिले मोडी लिपी संमेलन उत्साहात संपन्न

    11-May-2026
Total Views |

modi script
 
मुंबई : (Modi Script) “मुंबईमध्ये आजच्या घडीला अनेक ठिकाणी मोडी लिपीचे वर्ग घेतले जातात. खासगी वर्ग घेणारे शिक्षक, इतिहास अभ्यासक अत्यंत पोटतिडकीने हे वर्ग घेत असतात, त्याचबरोबर शासन सुद्धा आपल्यापरीने मोडी लिपीच्या प्रसारासाठी काम करत आहे. येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात लोकांनी यामध्ये सहभाग नोंदवणे आवश्यक आहे. मोडी लिपीच्या संवर्धनाची मोठी चळवळ उभी करुन आपल्याला पुढच्या पिढीमध्ये मोडीची गोडी निर्माण करायची आहे, कारण मोडी लिपी हे मराठ्यांच्या इतिहासाची गुरुकिल्ली आहे” असे प्रतिपादन मोडी लिपीचे अभ्यासक सुनील कदम यांनी केले.
 
दि. १० मे रोजी, पहिल्यांदाच दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंजदिराच्या राजर्षी शाहू सभागृहात मोडी लिपी संमेलन पार पडले. या संमेलनाचे अध्यक्षपद सुनील कदम यांनी भूषवले, तर स्वागताध्यक्षांची भूमिका इतिहास अभ्यासक पंकज भोसले यांनी बजावली. मोडी लिपीच्या संवर्धनासाठी, प्रसारासाठी सर्वंकष विचार करणाऱ्या या संमेलनात मान्यवर इतिहास अभ्यासकांनी श्रोत्यांना मार्गदर्शन केले. छत्रपती शिवाजी महाराज तसेच छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन या भव्य संमेलनाची सुरुवात झाली. मोडी लिपी संवर्धक अमित घाट्ये यांनी संमेलनाचे प्रास्ताविक केले. भारतभरात विखुरलेल्या मोडी लिपीच्या अभ्यासकांना एका व्यासपीठावर एकत्र आणणे हा या संमेलनामागचा उद्देश आहे. आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. मात्र या भाषेला दोन लिप्या आहेत हे आपण विसरुन चालणार नाही. येणाऱ्या काळात मोडी लिपीचे लिप्यांतरकार, अभ्यासक मोठ्या प्रमाणात तयार व्हायला हवे असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे सचिव सुधीर थोरात मोडी लिपीतून खऱ्या इतिहासाचा मागोवा या विषयावर श्रोत्यांना मार्गदर्शन केले. युवा नजरेतून मोडी लिपी या विषयावर डॉ. तेजस लोखंडे यांनी युवा अभ्यासक अनिकेत खाडीलकर, दर्शना वेताळ, अंजली तांबे यांच्याशी संवाद साधला.
 
मोडी लिपी संवर्धन या परिसंवादाअंतर्गत मान्यवरांनी या प्रसंगी मोडी लिपीचा प्रसार, अभ्यास, त्या संबंधित आव्हानं, आदी विषयांवर प्रकाश टाकला. शिवशंभू विचार मंच कोकणप्रांताचे संयोजक तथा शिवव्याख्याते अभय जगताप यांच्या उत्सफूर्त भाषनाने संमेलनाचा समारोप झाला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. तेजस लोखंडे यांनी केले. त्याचबरोबर या संमेलनात शिवकालीन मोडी कागदपत्रे, मोडी लिपी लेखन साहित्य, हेमाद्री मोडी लिपी अंक आदी साहित्य प्रेक्षकांना बघायाला मिळाले.
इतिहास पोहोचवण्यासाठी समूहाने एकत्र यावे लागेल. : सुधीर थोरात
“ मोडी लिपीतील मोठ्या प्रमाणात पत्रव्यवहार आपल्याकडे उपलब्ध आहे. वेगवेगळ्या कागदपत्रांच्या माध्यमातून शिवकाल, पेशवाईच्या काळातील धार्मिक, आर्थीक, राजकीय धोरणांच्या संदर्भातील पत्रव्यवहार उपलब्ध होतो आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून रियासतकार सरदेसाई यांनी समूहाच्या माध्यमातून मोठं काम करुन ठेवलं आहे. येणाऱ्या काळात आपल्याला सुद्धा आपला खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल तर समूह म्हणून वैयक्तिक हेवे दावे सोडून एकत्र यावे लागेल.”