भारताच्या इतिहासाबद्दल ज्या-ज्या वेळी लिहिले जाईल, त्या-त्या वेळी मराठी माती आणि महाराष्ट्रधर्म यांच्याशिवाय समग्र इतिहासाचे आकलन अशक्यच! भौतिकदृष्ट्या नवनिर्मितीची आस असलेल्या या राज्याची अभिव्यक्तीसुद्धा तितकीच अस्सल आणि सकस होती. मराठी संस्कृतीचा वैभवशाली वारसा आणि इतिहासाच्या पाऊलखुणा ज्या लिपीने शतकानुशतके जपल्या, ती लिपी म्हणजे ‘मोडी लिपी.’ सह्याद्रीच्या दर्याखोर्यांतून उमटलेले स्वराज्याचे हुकूम असोत वा पेशवे दफ्तरातील गजबजलेले व्यवहार, ‘मोडी’ ही केवळ एक लिपी नव्हती, तर ती मराठी प्रशासनाची जीवनवाहिनी होती. अशा या मोडीचा जागर करण्यासाठी आज, रविवार दि. 10 मे रोजी सकाळी 10 वाजता मुंबईच्या दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर येथे ‘मोडी लिपी संमेलन’ संपन्न होणार आहे. या संमेलनात मोडी लिपीच्या संवर्धन, तसेच पुनरुत्थानाच्या विषयांवर विचार करून आगामी ‘मोडी लिपी परिषदे’ची बीजे रोवली जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर मोडी लिपी अभ्यासकांशी संवाद साधून मोडीचे वैशिष्ट्यपूर्ण पैलू उलगडण्याचा केलेला हा प्रयत्न...
अक्षरांचे लेणे म्हणजे मोडी लिपी!
महाराष्ट्रात सुमारे 12व्या शतकापासून ‘मोडी लिपी’ची सुरुवात झाली, असे इतिहासकारांचे मत. मोडी लिपीचे जनक म्हणून यादव साम्राज्यातील ‘श्रीकरणाधिप’ अशी पदवी प्राप्त करणारे याच राज्याचे पंतसचिव ‘हेमाद्रीपंत’ यांना संबोधले जाते. न मोडता, न थांबता, अत्यंत जलदगतीने पटापट लिहिल्या जाणार्या या लिपीस ‘मोडी लिपी’ असे म्हणतात. यादवकाळापासून या लिपीला राजकीय व्यवस्थेमध्ये स्थान मिळाले. यादवकाळात सुरू झालेली ही लिपी शिवकाळात अधिक बहरली. शिवकालीन पत्रे, बखर, शकावल्या या सर्व मोडी लिपीचा वापर करून लिहिण्यात आल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात, हिंदवी स्वराज्यात या लिपीला ‘राज्यलिपी’चा बहुमान मिळाला. शिवरायांच्या राज्याभिषेकानंतर आपल्या मराठी भाषेचा स्वाभिमान जपत, या यावनी-फारसी शब्दाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी राजव्यवहार कोशाची निर्मिती केली. तसेच पत्राचे मायने सिद्ध करण्यासाठी ‘लेखनप्रशस्ती’ हा ग्रंथ रचण्यात आला. हिंदवी साम्राज्याचा विस्तार जिथे-जिथे झाला, तिथे-तिथे ही मोडी लिपी पोहोचली. मराठी भाषेवर सुमारे 700 वर्षे अधिराज्य गाजवणारी लिपी स्वतंत्र भारतात लुप्त झाली, ज्यामुळे मराठ्यांचा हा वैभवशाली इतिहास बंदिस्त राहिला. हाच इतिहास पुनरुज्जीवित करण्यासाठी मोडी वाचक, अभ्यासक, संशोधकांची गरज आहे; ज्यामुळे इतिहासातील ही सुवर्ण पाने पुन्हा उजेडात येतील.
- पंकज भोसले, इतिहास संशोधक
‘डिजिटल युगा’तील मोडी लिपी!
‘मोडी लिप्यांतरकार’ म्हणून काम करत असताना, बर्याचदा आम्हाला घर, जमीन यासंदर्भातील जुन्या कागदपत्रांचा अभ्यास करावा लागतो, त्यातली माहिती लोकांपुढे मांडायची असते. काही वेळेला साक्षीदाराच्या भूमिकेतसुद्धा आम्ही असतो. दुसर्या बाजूला मनोरंजन विश्वामध्ये आजच्या घडीला इतिहासावर अनेक चित्रपट तयार केले जात आहेत. या चित्रपटांमध्ये दाखवली जाणारी हस्तलिखिते, दस्तऐवज इथे मोडी लिपीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. सुलेखनाच्या माध्यमातून मोडी लिपीत मजकूर तयार केला जातो. आपल्याला तरुण पिढीला जर मोडी लिपीकडे वळवायचे असेल, तर ‘कॅलिग्राफी’ हे एक उत्तम माध्यम आहे, असे मला वाटते. प्रथमदर्शनी लिपी बघताना, वाचताना काही जणांना अवघड वाटते. मात्र, एकदा त्याची गोडी निर्माण झाली की, मुले-मुली आपोआप शिकतात. आजचा काळ ‘एआय’चा आहे. ‘एआय’ला मोठ्या प्रमाणात ‘डेटा’ लागतो. मोडी लिपीच्या लिप्यांतराबाबतीतसुद्धा तीच गोष्ट सत्य आहे. आजच्या तारखेला मोडी लिपीतील पुरेसा डेटा ‘एआय’कडे उपलब्ध नाही. लिप्यांतरासाठी यासंदर्भातील प्रयोगांची चर्चा केली जाते. मात्र, आताच्या घडीला हा प्रयोग बाल्यावस्थेत आहे, असे मी म्हणेन. ‘एआय’ तंत्रज्ञानात काळाच्या ओघात मशीनने प्रगत होणे अपेक्षित आहे, त्यामुळे पुरेशा प्रमाणात मोडी लिपीतील दस्तऐवज हवा आहेच. मात्र, त्याच प्रमाणात ‘एआय’ इंजिनिअर्सनीसुद्धा मोडी लिपी शिकणे आवश्यक आहे.
- कांचन फिरदोस कराई, मोडी लिपी तज्ज्ञ
मोडीच्या पुनरुत्थानासाठी सज्ज
केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मोडी लिपीच्या संवर्धनासाठी काम करणारे अभ्यासक विखुरले आहेत. अशा या सर्व अभ्यासकांना एका व्यासपीठावर घेऊन यावे, यासाठी या संमेलनाचे आयोजन आम्ही केले आहे. अनेक वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून मोडी लिपीच्या संवर्धनासाठी मागची काही वर्षे काम सुरू आहे. आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. आपण खरेतर भाग्यवान आहोत, आपल्या भाषेला दोन लिप्या आहेत. महाराष्ट्राच्या आणि मराठ्यांच्या इतिहासावर प्रेम करणारी आपण माणसे आहोत. आपल्या राजाचा, आपल्या संस्कृतीचा जो वैभवसंपन्न इतिहास आहे, तो खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचायला हवा. अद्याप कोट्यवधी कागदांचे वाचन, लिप्यांतर बाकी आहेत. अशा या मोडी लिपीचे मोठ्या प्रमाणात आपल्याकडे वाचक तयार व्हावेत, अशी अपेक्षा आहे. हे वाचक तयार करण्यासाठी आम्ही आमच्या संमेलनाच्या, शिबिरांच्या माध्यमातून अथक परिश्रम घेत आहोत. त्याचबरोबर, सरकार दरबारी आम्हाला अशी मागणी करायची आहे की, आपल्याकडे शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये जो इतिहास शिकवला जातो, त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोडी लिपीची तोंडओळख होणे गरजेचे आहे. आपली ऐतिहासिक कागदपत्रे, दस्तऐवज ज्या भाषेमध्ये आहेत, त्याची माहिती पुढच्या पिढीला होणे गरजेचे आहे. त्यांना ही ओळख झाली, तरच मोठ्या संख्येने ते मोडी लिपीच्या संशोधनाकडे वळतील.
- अमित घाटये, मोडी लिपी संवर्धक
मोडी लिपीतील भविष्याच्या उज्ज्वल वाटा!
माझ्या सुलेखनाच्या प्रवासामध्ये मोडी लिपीशी परिचय झाल्यानंतर ही गोष्ट काहीतरी वेगळी आहे, हे मला मनोमन जाणवले. सुरुवातीला मोडी लिपी शिकणे, माझ्यासाठी आव्हानात्मक होते. मात्र, सरावाच्या माध्यमातून मला अनेक गोष्टी हळूहळू उलगडत गेल्या. त्यानंतर माझे केस पेपर मी मोडीमध्येच लिहायला लागलो. मोडी लिपीचे शिक्षण घेतल्यानंतर, त्यासंदर्भातील परीक्षांमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर एक आत्मविश्वास निर्माण झाला. आपल्याकडच्या युवा अभ्यासकांना मोडी लिपीमध्ये अनेक संधी आहेत, असे लक्षात आले. आतापर्यंत शिवछत्रपतींचा इतिहास जो कागदपत्रांच्या माध्यमातून उलगडला आहे, तो वाचताना अंगावर शहारा येतो. आपल्यापैकी प्रत्येकालाच महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा गर्व आहे. उद्या ज्यावेळी अशी असंख्य कागदपत्रे आपण वाचू, मोडी लिपीतील ही कागदपत्रे, ज्यावेळी उलगडली जातील, त्यावेळी अर्थातच ही आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट असेल. मोडी लिपी आणि सुलेखन यांच्या संगमातून अर्थातच, उत्तम कलाकृतींची निर्मिती होऊ शकते. त्याचबरोबर आपला इतिहास आपण लोकांपर्यंत आणखी चांगल्या पद्धतीने पोहोचवू शकू. दक्षिण कोरियामध्ये पार पडलेल्या जागतिक सुलेखन प्रदर्शनामध्ये मी स्वत: मोडी लिपीतील सुलेखनातून शिवकालीन पत्राची प्रतिकृती साकारली. आपल्याकडे मोठ्या प्रमाणात वेगवेगळे सणवार साजरे केले जातात, अशा वेळी मोडी लिपी आणि सुलेखनाच्या माध्यमातून जर आपण काही कलाकृती साकारल्या; तर आपल्या संस्कृती व्यवहाराचा प्रसार होईलच. मात्र, त्याचबरोबर तो सोहळासुद्धा आणखी सुशोभित होईल.
- डॉ. तेजस लोखंडे, मोडी लिपी अभ्यासक