शूरा मी वंदिले ....!

    10-May-2026
Total Views |

देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात 1857च्या स्वातंत्र्यसमराचे महत्त्व विलक्षण असेच. या समरामुळेच ‘ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी’च्या सत्तेला सुरुंग लागला. या स्वातंत्र्यसमरात ‘राष्ट्रवेदी’च्या ‘यज्ञस्थंडिला’वर अनेक वीरांच्या ज्या ‘जीवनसमिधा’ अर्पण झाल्या, त्यातूनच पुढे 1947च्या स्वातंत्र्याचा पाया घातला गेला. आजच्याच दिनी 1857 मध्ये या स्वातंत्र्यसमराची पहिली ठिणगी पडली होती. त्यानिमित्ताने या स्वातंत्र्यसमराचा घेतलेला मागोवा...

1857चा उठाव हा ब्रिटिश राजवटीविरुद्धचा मोठा उठाव. हा उठाव महत्त्वपूर्ण अशासाठी की, ब्रिटिश सत्तेला आव्हान देण्याचा हा पहिलाच मोठा प्रयत्न ठरला. याच उठावातून पुढे भविष्यातील स्वातंत्र्यचळवळीचा पाया घातला गेला. म्हणूनच, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी या उठावाचा ‘1857चे स्वातंत्र्यसमर’ असा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे.

या उठावाची कारणे अनेक होती. लॉर्ड डलहौसीचे ‘खालसा धोरण’ हे त्यापैकीच एक महत्त्वाचे कारण. त्याने दत्तक वारस नामंजूर करून झाशी, नागपूर, सातारा, जैतपूर ही संस्थाने खालसा केली. पुढे अवध संस्थानाचेही विलीनीकरण केले. संस्थाने खालसा केल्यामुळे त्यांच्यावर अवलंबून असलेले लोक व सैनिक बेरोजगार झाले. 1833 पासून 1857 पर्यंत ब्रिटिशांनी साम्राज्य विस्तारासाठी अनेक युद्धे केली. या युद्धांचा खर्चदेखील भारतीय जनतेवरच प्रचंड कर लादून वसूल करण्यात आला होता. पाश्चात्त्य वस्तूंवरील आयात कर माफ केल्याने इंग्रजी मालाला उठाव मिळाला आणि भारतीय उद्योगधंद्यांना कठीण दिवस आले. स्वदेशी हस्तकला व उद्योग बंद पडल्याने बेरोजगारीही वाढली. ‘सतीबंदी’, ‘विधवा पुनर्विवाह’ कायद्यामुळे समाज दुखावला गेला. ब्रिटिशांकडून ख्रिश्चन धर्मप्रसारक आणि मिशनरी यांच्या कार्यामुळे धार्मिक स्वातंत्र्यालाच धोका असल्याची भावना सनातनींच्या मनात निर्माण झाली होती. त्याकाळी भारतीय सैनिकांना युरोपियन सैनिकांच्या तुलनेत कमी वेतन आणि दुय्यम दर्जाची वागणूक मिळत असे. भारतीय सैनिकांना वरिष्ठ पदांवरही पदोन्नती मिळत नसे. सन 1806 ते 1850 दरम्यान हिंदी सैनिकांनी बराकपूर, जबलपूर, फिरोजपूर, बरेली इत्यादी ठिकाणी युद्धे केली. हिंदी सैन्याच्या बळावरच इंग्रजांनी त्यांची भारतातील सत्ता बळकट करून साम्राज्य विस्तार केला खरा. परंतु, पदव्या व बक्षिसे फक्त इंग्रजी अधिकार्‍यांनाच मिळत असत.

सन 1852 मध्ये डलहौसीने सरदार-ईनामदार यांचे हक्क तपासण्यासाठी नेमलेल्या ‘इनाम आयोगा’ने 32 हजार इनामांची चौकशी केली. त्यात मालकीचा पुरावा नसलेल्या 21 हजार वतनदारांची वतने जप्तदेखील केली. त्यावेळी वारस नाही म्हणून, आंग्रे यांचे संस्थानही खालसा करण्यात आले. या सर्व कारणांसोबतच एक तत्कालिक कारण घडले ते म्हणजे, नवीन ‘एनफील्ड रायफल’मध्ये वापरल्या जाणार्‍या काडतुसांना गाय व डुकराची चरबी लावली जाई. ही काडतुसे तोंडाने तोडावी लागत असल्याने हिंदू-मुस्लीम सैनिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या. त्यातूनच दि. 10 मे 1857 रोजी मीरत येथे उठावाची पहिली ठिणगी पडली. म्हणजेच, हा उठाव अनेक घटनांच्या एकत्रित परिणामांमुळेच घडून आला. मीरत येथील उठावाबरोबरच दिल्ली, लखनौ, लाहोर, अलाहाबाद, अलिगढ, पेशावर, मथुरा, आग्रा येथेही गडबडी सुरू झाल्या. मंगल पांडे, सेनापती बहाद्दूरशहा दुसरा, नानासाहेब पेशवा दुसरा, राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, कुंवरसिंह, मानसिंग, बेगम हजरत महल यांनी, तसेच इतर अनेक सैनिकांनीही उठावाचे नेतृत्व करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. हा उठाव भारतीय इतिहासाला कलाटणी देणारा ठरला.

या उठावादरम्यान, मे महिन्यात सैनिकांनी दिल्ली ताब्यात घेऊन बहाद्दूरशहाला हिंदुस्थानचा बादशहा म्हणून घोषित केले.परंतु, थोड्याच दिवसांत सेनापती लॉरेन्सने दिल्लीवर पुन्हा ‘युनियन जॅक’ फडकावला. इंग्रज अधिकारी ऊट्रम आणि हॅवलॉक यांनी लखनौमधील उठाव मोडीत काढले. ड्युरँड याने माळव्यातील उठाव मोडीत काढला. मार्च 1858 मध्ये इंग्रजांनी झाशीला वेढा दिला. अधिकारी ह्यू रोज व झाशीची राणी यांच्यात लढाई होऊन इग्रजांनी झाशी संस्थानही ताब्यात घेतले. पुढे राणी लक्ष्मीबाई व तात्या टोपे ग्वाल्हेर येथे इंग्रजांविरुद्ध लढले. मात्र, या लढाईत राणी लक्ष्मीबाई यांना हौतात्म्य आले. जानेवारी 1859 मध्ये राजपुतान्यातील सीकर येथे तात्या टोपे व इंग्रज यांच्यातील लढाईत तात्या टोपे यांचा पराभव झाला आणि ते पकडले गेले. पुढे एप्रिल 1859 मध्ये त्यांना फाशी देण्यात आली.

या उठावाचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले होते. इंग्रजी सत्ता उलथविण्यासाठी आणि सातारच्या गादीचे पुनरुत्थान करण्यासाठी सातारकरांचा वकील रंगो बापूजी याने पुणे, सातारा, कोल्हापूर येथे गुप्त कारस्थाने सुरू केली. ग्वाल्हेरचे ज्योतीराव घाटगे व निंबाळकर यांनी कोल्हापुरात शस्त्र उगारले. पण, इंग्रजांच्या लष्करी शक्तीपुढे फारकाळ निभाव लागला नाही.

1857चा हा उठाव प्रामुख्याने उत्तर भारतापुरताच मर्यादित राहिला. दक्षिण भारत, पंजाब व बंगालचा मोठा भाग यापासून अलिप्तच राहिला. या उठावामधील लोकांपुढे निश्चित ध्येय नव्हते, त्यांच्यात एकजूट नव्हती. सर्व नेत्यांची उद्दिष्टे वेगवेगळी होती. कोणाला आपली गेलेली सत्ता परत हवी होती, तर कोणाचा ब्रिटिशांच्या अन्यायकारक धोरणांवरच राग होता. म्हणजेच, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचे स्पष्ट ध्येय नव्हते. तसेच या उठावाला सर्वमान्य असे केंद्रीय नेतृत्वही नव्हते. विविध ठिकाणी स्थानिक नेत्यांनी आपापल्या परीने लढा दिला. परंतु, त्यांच्यात समन्वयाचाही अभाव होता. तसेच हे सर्व नेते डावपेचांच्या पातळीवरही कमी पडल्याचेही लक्षात येते. याबरोबरच, अनेक भारतीय राजे, संस्थानिक, जमीनदार वर्ग इंग्रजांच्या बाजूनेच या उठावादरम्यान उभा राहिला. याच सर्व कारणांमुळे इंग्रजांना अवघ्या एका वर्षामध्ये हा उठाव मोडून काढण्यात यश मिळाले.

मात्र, या उठावामुळे हिंदुस्थानचा राज्यकारभार ‘ईस्ट इंडिया कंपनी’कडून ब्रिटनच्या संसदेकडे गेला. कंपनीचे ‘बोर्ड ऑफ कंट्रोल’ रद्द करून ‘इंडिया काऊन्सिल’ नेमण्यात आले. सैन्याची पुनर्रचना होऊन गव्हर्नर जनरल कॅनिंग हिंदुस्थानचा पहिला व्हाईसरॉय झाला. 1857चा उठाव तत्कालीन परिस्थितीत जरी अयशस्वी झाला असला, तरी यामुळे भारतीयांमध्ये राष्ट्रवादाची चेतना जागृत होण्यास मोठीच मदत झाली. पुढील काळातील स्वातंत्र्यसंग्रामात या उठावाची पहिले स्वातंत्र्यसमर म्हणून स्मृती जागी ठेवण्यात आली. 1957 मध्ये संपूर्ण भारतात 1857च्या उठावाचा शतसांवत्सरिक उत्सवदेखील साजरा करण्यात आला.

या उठावाचे विश्लेषण शेषराव मोरे, ज. द. जोगळेकर (1857चा प्रस्फोट), सेतुमाधवराव पगडी (1857चे आणखी काही पैलू), अनिल गोडबोले (1857ची यशोगाथा), परशुराम देसाई (1857च्या बंडाचा वणवा), कॅप्टन राजा लिमये (रणसंग्राम 1857चा - भाग 1 व 2) अशा अनेक अभ्यासकांनी गौरवपूर्ण शब्दांत केले. परंतु, प्रखर देशभक्त स्वा. सावरकर यांच्या लेखणीतून साकारलेले ‘1857चे स्वातंत्र्यसमर’ हे पुस्तक आदर्शवतच. तरुणांमध्ये स्वातंत्र्याचे ‘स्फुल्लिंग’ चेतविण्याचे कार्य या पुस्तकाने त्याकाळी केलेे.

ज्वालामुखी, स्फोट, अग्नीकल्लोळ आणि तात्पुरती शांतता अशा चार भागांत विभागलेल्या या पुस्तकाची सुरुवात, स्वधर्म आणि स्वराज्य यापासून होते. दुसर्‍या भागात हुतात्मा मंगल पांडे आणि अयोध्या प्रांतामधील लढायांचा समावेश आहे. तिसर्‍या भागात सेनापती तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई यांच्या योगदानाची माहिती असून, पूर्णाहुती व समारोपाने याची सांगता होते. स्वा.सावरकरांनी लंडनमधील वास्तव्यातच हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथाची ओळख ‘क्रांतिकारकांची गीता’ अशीच होती. या पुस्तकावर ब्रिटिशांनी प्रकाशनापूर्वी बंदीही घातली.

मूळ ग्रंथ 600 पानांचा असून, त्याच्या संक्षिप्त आवृत्तीला प्र. के. अत्रे यांनी 12 पानांची प्रस्तावना लिहिली आहे. “ज्ञानेश्वरीनंतर इतके तोलामोलाचे पुस्तक, मराठी वाङ्मयामध्ये नाही,” असे अत्रे यांनी या पुस्तकाबद्दल लिहिले आहे. ते पुढे म्हणतात की, “सत्तावन्नी क्रांतियुद्ध हे ‘महाभारता’तील एखाद्या ‘पर्वा’सारखे किंवा ‘रामायणा’तील एखाद्या ‘कांडा’सारखे वाटते.त्याचा इतिहास लिहिणार्‍याच्या अंगी महर्षी व्यास किंवा वाल्मीकींसारखीच काव्यप्रतिभा असावयास पाहिजे. वीर सावरकरांना ती दिव्य देणगी उपजतच असल्याने क्रांतिरसाने ओथंबलेले हे महाकाव्य, ते एवढ्या प्रखर व प्रभावी शैलीने लिहू शकले. क्रांतीवर आणि स्वातंत्र्यावर आजपर्यंत जगामध्ये अनेकांनी काव्ये लिहिली असतील; पण त्यावर लिहिलेले जिवंत आणि ज्वलंत महाकाव्य हे एकच. हे वाचत असताना, आपण एखाद्या जळत्या ज्वालामुखीच्या अंतर्भागातून वावरतो आहोत, असे वाटते.”

या 1857च्या स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्म्यांना हे पुस्तक समर्पित करताना स्वातंत्र्यवीर लिहितात, “स्वधर्म आणि स्वराज्य यांकरिता झुंजता झुंजता धारातीर्थी पतन पावलेल्या सहस्रावधी अज्ञात हुतात्म्यांनो! ही इतिहास कृती तुमच्या वीरवृत्तीला समर्पित असो! सहस्रावधी हुतात्म्यांचे-देशवीरांचे रक्त! हा इतिहासही त्या रक्तालाच अर्पण! स्वदेशाकरिता लढण्यासाठी सिद्ध झालेल्या हे वीरांनो! तुम्ही कुठले कोण? तुमची नावे तरी काय? तत्त्वाची अग्निज्वाला तुमच्या हृदयात केव्हा पेटून उठली?... विजय जरी हातचा गेला, तरी तुम्ही आपल्या कीर्तीला कलंक लागू दिला नाहीत. तुमच्या पराक्रमाने भूतकाळाचा कलंक धुऊन निघून, तो अधिकच उज्ज्वल होवो आणि तुमचा तोच पराक्रम भविष्याचे स्फूर्तिस्थान आणि चैतन्यनिधान होऊन राहो!”

स्वा. सावरकरांनी या उठावाची कारणमीमांसा करताना समर्थ रामदास स्वामींनी 350 वर्षांपूर्वी लिहिलेल्या-

धर्माकरीता मरावे। मरोनी अवघ्यासी मारावे।
मारिता मारिता घ्यावे। राज्य आपुले॥

या राष्ट्रमंत्राचा उल्लेख करून 1857च्या क्रांतीमागे हेच तत्त्व आणि मानसशास्त्र असल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे. जस्टीस मॅकार्थी या इंग्रज इतिहासकाराने याबद्दल लिहिले आहे की, “1857चा उठाव हे केवळ एक बंड होते असे नाही, तर त्यामध्ये सैन्यातील असंतोष, द्वेष आणि इंग्रजी राजवटीविरुद्धचा धर्मनिष्ठ सूड यांचा मिलाफ होता. म्हणूनच, या बंडाला खर्‍याखुर्‍या अर्थाने धार्मिक व राष्ट्रीय युद्धाचे स्वरूप प्राप्त झाले.”

या क्रांतियुद्धाच्या सुरुवातीला फासावर चढणारा पहिला हुतात्मा मंगल पांडे, बंदुकीच्या गोळीने जायबंदी झालेला संपूर्ण हात तलवारीने छाटून गंगामातेला अर्पण करणारा 80 वर्षांचा तरणाबांड म्हातारा कुंवरसिंह, स्वधर्मियांच्या फितुरीला बळी पडलेला फैझाबादचा शूर नेता मौलवी अहमदशहा, या स्वातंत्र्ययुद्धाच्या ज्वालामुखीत उघड्या डोळ्यांनी स्वत:ची आहुती देणारी झाशीची राणी लक्ष्मीबाई, ‘हिंदुस्थानामध्ये परकीय लुटारू हे राजे आणि हिंदुस्थानचे खरे वारस मात्र चोर’ असे उद्वेगाने म्हणत, नेपाळच्या जंगलात नाहीसे झालेले क्रांतिसिंह नानासाहेब पेशवे, इंग्रजांच्या मोठमोठ्या सेनापतींना आपल्या युद्धकौशल्याने खडे चारणारे; परंतु, शेवटी विश्वासघाताने शत्रूच्या हाती सापडून फाशी गेलेले क्रांतीचे सेनापती तात्या टोपे, या सर्वांच्या बलिदानाची स्मृती आपण यानिमित्ताने जागी ठेवूया आणि स्वदेश, स्वधर्म आणि सुराज्यासाठी कृतिशील राहून, या सर्व ज्ञात-अज्ञात वीरांना खरी आदरांजली वाहूया.

- प्रकाश बापट