शक्ती समाज आणि मुक्ती!

    01-May-2026
Total Views |
Uppalavanna and Kisa Gotami
 
भगवान बुद्धांनी स्त्रीजन्म आनंददायी म्हटला आहे. ‘ज्या घरचा कौटुंबिक व्यवहार स्त्रीच्या हाती असतो, ते घर कधीच तुटत नाही’ असा उपदेश केला. स्त्रीला सन्मानजनक वागणूक देणार्‍या धम्माचा प्रसार करण्यासाठी अनेक महिलांचे योगदान आहे. त्यांचा मागोवा घेताना जाणवते की, त्यांच्या आयुष्यात काही घटना घडल्या. त्या घटनांनी त्यांच्यामध्ये ज्ञानस्वरूपी परिवर्तन झाले. सत्य त्यांनी जाणले. त्या सत्यमार्गावर चालताना त्यांनी बुद्धांचे तत्त्वज्ञान अंगीकारले. त्यांपैकी आज या लेखात उप्पलवना आणि किसा गौतमी यांच्या जीवनकथेचे सार मांडले आहे.
 
'सात खजिन्यांपैकी एक खजिना’ असे बुद्धांनी स्त्रीचे वर्णन केले आहे. बुद्ध धर्माच्या उत्कर्ष काळात अविवाहित स्त्रियांचे समाजातील स्थान त्यापूर्वीच्या कालखंडातील आणि आजच्यापेक्षा जास्त सन्मानजनक होते. बाळ जन्मास आल्यानंतर त्यास ‘पुत्र’ संबोधले जाई. ‘पुत्र’ शब्द मुलगा-मुलगी या दोन्ही अर्थाने संबोधला जात असे. तसेच बौद्ध कथांमध्ये ‘बालक’ या अर्थाने लहान मुलांना उद्देशून कथा आहेत. मात्र, मुलगा-मुलगी असा शब्दप्रयोगामध्ये भेद न करता, ‘बालक’ हा शब्द दोघांना उद्देशून वापरलेला होता.
 
‘वडिलांना स्वर्गप्राप्तीसाठी पुत्राची गरज’ या सिद्धांतावर बौद्ध धर्माचा विश्वास नव्हता. मुलींना दत्तक घेण्याची उदाहरणे इथे आढळतात. ‘प्लेग’च्या साथीमध्ये सामवती नावाची मुलगी अनाथ झाली. मित्रा नावाच्या उपासकाने तिला दत्तक घेतले. ‘धम्मपदा’मध्ये ‘गाथा ६२’वरील टीकेत एक राजा कृष्णा नावाच्या मुलीला दत्तक घेऊन ज्येष्ठ कन्या म्हणून तिचा स्वीकार करतो. अशी उदाहरण पाहता, स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपल्याला समजतो. मात्र, स्त्रियांनी मुले किंवा मुली दत्तक घेतल्याची उदाहरणे नाहीत. बुद्धकाळात कोणतेही बंधन नव्हते. बुद्धकाळात भ्रूणहत्येचे उदाहरण आढळत नाही. याकाळात सर्वत्र आर्थिक सुबत्ता असल्यामुळे भ्रूणहत्येचे पाप करण्यास कोणीही धजावत नसेल. भगवान बुद्धांना एका ब्राह्मणाने म्हटले, "उच्च काळात जन्मलेली स्त्री ही सर्वश्रेष्ठ गृहिणी होय.” यावर बुद्ध म्हणाले, "जी सर्वोत्कृष्ट संसार करते, ती सर्वोत्तम गृहिणी.” यामध्ये कर्तव्याचे महत्त्व भगवान बुद्ध अधोरेखित करताना दिसतात. ‘पाली’ धर्मग्रंथावरून एकपत्नीत्वाची चाल बौद्धकाळात सर्वसाधारण होती, हे लक्षात येते. बुद्धांच्या उपदेशानुसार, स्त्रीला केवळ यजमानाची पत्नी म्हणूनच नाही; तर गृहिणी म्हणूनही सन्मान प्राप्त व्हायला पाहिजे, हा विचार दिसतो. बौद्ध धर्मात स्त्रीला अडगळ मानलेली नाही. गृहिणीचे स्थान प्रतिष्ठेचे होते आणि बौद्ध साहित्यात विधवा स्त्रीबद्दल फार कमी उल्लेख आहे. अन्य स्त्रियांच्या तुलनेतही विधवा स्त्रियांची माहिती कमी आढळते.
 
अशा भगवान बुद्धांच्या काळात अनेक महिला भिक्षुणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यातीलच एक नाव उप्पलवण्णा (उत्पलवर्णा) आहे. या नावाचा अर्थ, ‘नीलकमळासारखी सुंदर वर्णना स्त्री’ असा होतो. भारतातील अनेक राजकुमारांनी तरुण वयामध्ये उत्पलवर्णाला लग्नासाठी मागणी घातली. अनेकांनी बळ वापरून तिला मिळवण्याचा प्रयत्न केला. अशा वेळेस तिच्या वडिलांनी आपल्या मुलीला विचारले की, "तू भगवान बुद्धांच्या ‘भिक्षुणी’ संघामध्ये जाऊ शकतेस का?” वडिलांच्या एका प्रश्नावर अगदी सहजपणे तिने होकार दिला आणि वडिलांनी अतिशय सन्मानपूर्वक भिक्षू संघामध्ये तिला प्रवर्जित केले. एका श्रीमंत घरातल्या मुलींना सर्व संसारसुख त्यागून भिक्षुणी होणे, ही गोष्ट मोठी आहे. साधना करून तिला अर्हत्व प्राप्त झाले. असे म्हणतात, एके रात्री दीपशिखा व ध्यान करताना तिचे चित्त शांत झाले आणि तिला समाधी लागली.
 
मानसिकदृष्ट्या अत्यंत कुशाग्र असलेल्या भिक्षुणींमध्ये आदराने यांचे नाव घेतले जाते. भगवान बुद्धांच्या प्रथम महिला शिष्यांपैकी त्या एक होत्या. ‘थेरी गाथे’मध्ये त्यांच्या काव्यरचना आढळतात. बुद्धांनी त्यांना सिद्धी सर्वश्रेष्ठ भिक्षुणी म्हणून गौरवले. ध्यान, साधना आणि अलौकिक प्रसिद्ध होत्या. ‘थेरी गाथा’ हा बौद्ध भिक्षुण्यांच्या अनुभवांचा संग्रह आहे. किसा गौतमी या बौद्धधम्मातील अत्यंत प्रसिद्ध करुणामय अशा भिक्षुणी होत्या. किसा म्हणजे बारीक/कृश. गरीब कुटुंबातील, विवाहानंतर त्यांचा मुलगा मृत्युमुखी पडतो. मुलाच्या मृत्यूने त्या अत्यंत दु:खात बुडाल्या. या कालखंडात मुलाला जन्म देणे किंवा मुलगा जन्माला येणे हे फार महत्त्वाचे म्हणले जायचे, हे आपल्याला लक्षात येते. आई आणि मुलाचे प्रेम हे जितके आपण समजून घेतो, त्याचबरोबर समाजव्यवस्थेमध्ये मुलालाच असणारे त्याकाळातले प्राधान्य, हेसुद्धा अभ्यास करताना आपल्याला डावलता येण्यासारखे नाही. अशा त्या मुलाला जिवंत करण्यासाठी उपाय शोधत, त्या सर्वत्र भटकत होत्या.
 
जेव्हा त्या भगवान बुद्धांकडे येतात, तेव्हा भगवान बुद्धांनी ज्या घरात एकाचाही मृत्यू झाला नाही, अशा घरातून मोहरीचे दाणे आणण्यास सांगितले. त्या अनेक घरे फिरल्या. पण, प्रत्येक घरात मृत्यू झाला असल्याने कोणीही मोहरीचे दाणे त्यांना देऊ नाही शकले. हे जेव्हा सर्व ठिकाणी फिरताना त्यांच्या लक्षात आले, त्यावेळेस मृत्यू हा सार्वत्रिक आहे, हे सत्य त्यांना समजले. त्यांनी नंतर भिक्षुणी म्हणून दीक्षा घेतली आणि ज्ञानप्राप्ती केली. त्यांच्या या कथेतून आदित्य दुःखाची जाणीव हा बौद्ध धर्माचा मूलभूत संदेश आपल्या सगळ्यांना मिळतो. जीवनातील दुःखातून सत्य आणि ज्ञान मिळवण्याचे प्रतीक म्हणून यांच्याकडे पाहिले जाते. आपण यांच्याकडून एकाग्रतेने साधना केल्यास मोठे यश मिळू शकते, हे आजच्या काळामध्ये आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये स्वीकारू शकतो. जीवनात दुःख असते. मात्र, हे दुःख स्वीकारल्यास त्याची वेदना कमी होते आणि मनशांती मिळते. जगात सर्वकाही नश्वर आहे हे समजले की, त्याची आसक्ती कमी होते, हे यातून आजच्या आपल्या रोजच्या दुःखाकडे बघताना आपण शिकू शकतो. त्यांच्या आयुष्याच्या या कथेतून आपण मानसिक परिवर्तन कसे घडून येते, हेसुद्धा समजून घेऊ शकतो.
 
या दोन्ही भिक्षुणींची पार्श्वभूमी जरी वेगवेगळी असली, तरी या दोघींच्या आयुष्याचा उद्देश मात्र सत्य आणि मुक्तीप्राप्ती करणे हाच आपल्याला दिसतो. बौद्ध धर्माचे मूलभूत तत्त्व यांच्या दोघींच्या जीवनातून स्पष्ट होते. इतर भिक्षुणींसाठी या दोघी आदर्श आणि मार्गदर्शक होत्या. त्यांच्या जीवनामुळे स्त्रियांना भिक्षुणी संघामध्ये प्रवेश करून आध्यात्मिक मार्ग खुला झाला, हे आपणास दिसते. उत्पल वर्णन आध्यात्मिक मार्गात ध्यान व शक्तीच्या साहाय्याने मार्ग शोधला, तर किसा गौतमीने अनुभवातून ज्ञानप्राप्ती केली. उत्पलवर्णाचा मुख्य संघर्ष मनावर नियंत्रणाचा होता, तर किसा गौतमीचा दुःखाचा स्वीकार करण्याचा होता. उत्पलवर्णाचे प्रतीक सामर्थ्य आहे; तर किसा गौतमीचे करुणा व वास्तव आहे. बौद्धतत्त्व म्हणून ‘उत्पलवर्ण साधना’ आपल्याला सांगते, तर किसा गौतमी अनित्य व दुःख आपल्याला सांगते. उत्पलवर्ण आपल्याला मन पूर्णपणे नियंत्रण केले, तर माणूस असामान्य उंची गाठू शकतो याचा आदर्श निर्माण करून देतात; तर किसा गौतमी दुःख टाळता येत नाही; पण त्यातूनच खरे ज्ञान मिळते, हे आपल्याला सांगतात. आंतरिक शक्तीचा शोध आपण घेऊ शकतो, तर किसा गौतमीमुळे आपण आंतरिक सामाज व त्याचे विविध पैलू समजून घेऊ शकतो. दोघी मिळून बौद्ध धर्माचे पूर्ण चित्र आपल्याला दाखवतात की, ज्यातून शक्ती आणि समाज या दोघांची सांगड घातल्यास आपल्याला मुक्ती मिळते, हे आपल्याला दिसून येते.

-स्नेहा गायकवाड
(लेखिका आंबेडकरी चळवळीच्या अभ्यासक प्रसिद्ध व्याख्याता आहेत.)