मुंबई : (Women Entrepreneurs India) महिला उद्योजिकांसाठी येत्या २ ते १४ मे दरम्यान बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथे ‘महालक्ष्मी सरस’ प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन महिला उद्योजिकांसाठी मोठी बाजारपेठ उपलब्ध करून देणारी आणि सर्वसामान्य नागरिकांना वेगळा अनुभव देणारे ठरेल, असा विश्वास ‘उमेद-एमएसआरएलएम‘चे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. निलेश सागर म्हणाले की, "उमेद अभियानांतर्गत महालक्ष्मी सरसच्या माध्यमातून महिलांना रोजगारासोबत आत्मनिर्भरता, नेतृत्व आणि सामाजिक ओळख मिळत आहे. महिला उद्योजिका आता पूर्वीप्रमाणे केवळ वाळवणीचे पदार्थ नव्हे तर ग्रामीण भागात शेतमाल आधारित प्रक्रिया उद्योगही उमेदीने करत आहेत. महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शनसारख्या उपक्रमाद्वारे महिला उद्योजिकांचे उत्पन्न वाढण्यास मदत होत आहे. आतापर्यंत महिलांना ५० हजार कोटी रुपयांहून अधिक कर्ज वितरित करण्यात आले आहे. राज्यात ५० लाखांपेक्षा जास्त लखपती दीदी निर्माण झाल्या असून, त्यांच्या उत्पन्नात सातत्य राहावे, यासाठीही शासन स्तरावर प्रयत्न सुरु आहेत."(Women Entrepreneurs India)
ते पुढे म्हणाले की, "या प्रदर्शनात एकूण ५०० स्टॉल्स उभारण्यात येणार असून यात महाराष्ट्रातील २३०, इतर राज्यातील ६६, नाविन्यपूर्ण उपक्रम करणाऱ्या महिला गटांचे ६८ तसेच महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांचे (एफपीओ) ३४ स्टॉल्स समाविष्ट आहेत. याशिवाय नाबार्ड, माविम, खादी व ग्रामोद्योग मंडळ, मुंबई महानगरपालिका तसेच आदिवासी व कृषी विभागासह विविध शासकीय संस्थांचे २२ स्टॉल्सही यात आहेत. प्रदर्शनातील प्रमुख आकर्षण म्हणजे ८० स्टॉल्सचा वातानुकूलित फूड कोर्ट, जिथे राज्यातील विविध भागातील महिलांनी तयार केलेले पारंपरिक व स्वादिष्ट पदार्थ उपलब्ध असतील. तसेच हातमागाची वस्त्रे, वारली व बंजारा कला, लाकडी खेळणी, आकर्षक दागिने आणि इतर ग्रामीण उत्पादने खरेदी करण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. खरेदी केलेल्या सामानाच्या पिशव्या ठेवण्यासाठी लॉकर्सची व्यवस्था करण्यात आली आहे. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत."(Women Entrepreneurs India)
विविध राज्यांचे ६० हून अधिक स्टॉल्स
निलेश सागर यांनी सांगितले की, "यावर्षी महालक्ष्मी सरसमध्ये एआर फोटोग्राफी, अॅनामॉर्फिक वॉल्स आणि इन्फोग्राफिक वॉल्ससारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. तसेच ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती आणि गर्भवती महिलांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी २५ किलोमीटर परिसरात मोफत होम डिलिव्हरीची सुविधादेखील उपलब्ध आहे. येथे महाराष्ट्राव्यतिरिक्त केरळ, गुजरात, बिहार, तामिळनाडू, कर्नाटक, जम्मू आणि काश्मीर, उत्तर प्रदेश यासह अनेक राज्यांचे ६० पेक्षा जास्त स्टॉल्स राहतील."(Women Entrepreneurs India)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....