Viksit Maharashtra 2047 : प्रत्येक घटकाच्या सहभागाने विकसित महाराष्ट्र घडवू

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे महाराष्ट्रदिनी आवाहन

    01-May-2026   
Total Views |
Maharashtra Day 2026
 
मुंबई : (Viksit Maharashtra 2047) स्वातंत्र्याच्या अमृत काळानंतर आता देश विकसित भारत २०४७ कडे वाटचाल करत आहे. यात महाराष्ट्राचे योगदान अतुलनीय असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ५ ट्रिलियन डॉलर्सच्या संकल्पनेत महाराष्ट्राचा '१ ट्रिलियन डॉलर्स' अर्थव्यवस्थेचा वाटा असेल. राज्य शासनाने तयार केलेले 'विकसित महाराष्ट्र २०४७' Viksit Maharashtra 2047हे व्हिजन डॉक्युमेंट राज्याला प्रगतीच्या नव्या शिखरावर नेऊन ठेवेल. समाजातील प्रत्येक घटकाचा सक्रीय सहभाग सुनिश्चित करुन सर्वसमावेशक, प्रगत आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी प्रयत्न करु, असे आवाहन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.
 
छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर आयोजित समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे, मुंबईच्या महापौर रितू तावडे, स्थानिक लोकप्रतिनिधी, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, बृहन्मुंबई आयुक्त अश्विनी भिडे, पोलीस महासंचालक सदानंद दाते, पोलीस आयुक्त देवेन भारती, यांच्यसह विविध अधिकारी उपस्थित होते. (Viksit Maharashtra 2047)
 
राज्यपाल जिष्णु देव वर्मा म्हणाले की, "महाराष्ट्राने जागतिक गुंतवणुकदारांचा विश्वास संपादन केला आहे. दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये तब्बल ३१ लाख २५ हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले. राज्याच्या नवीन उद्योग आणि गुंतवणूक धोरणातून ७०.५ लाख कोटींची गुंतवणूक आकर्षित करण्याचे उद्दिष्ट असून, त्यातून ५० लाख प्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे आता देशाचे नवीन प्रवेशद्वार बनेल. मुंबईची वाहतूक कोंडी फोडणारी मेट्रो लाईन-३ पूर्णपणे कार्यान्वित झाली असून, मुंबई महानगर प्रदेशात ३४० किमी लांबीचे जलमार्गाचे जाळे विस्तारण्यात येत आहे. पालघरमधील 'वाढवण बंदर' प्रकल्प हा देशातील सर्वात मोठा प्रकल्प ठरणार असून, त्यातून १२ लाखाहून अधिक थेट रोजगार निर्मिती होणार आहे. तसेच खोपोली-खंडाळा 'मिसिंग लिंक'मुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरित्या कमी होणार आहे." (Viksit Maharashtra 2047)
 
हेही वाचा :  Buddha Purnima 2026 : “भगवान बुद्धांचा करुणा आणि समतेचा संदेश समाजासाठी प्रेरणादायी” — रविंद्र चव्हाण
 
बळीराजाला बळ
 
शेतकरी कल्याणासाठी शासन कटिबद्ध असून नैसर्गिक आपत्तीमुळे खरीपात नुकसान झालेल्या एक कोटींहून अधिक शेतकऱ्यांना १५ हजार ९५० कोटी रुपयांची मदत थेट वितरित करण्यात आली आहे. तसेच चालू रब्बी हंगामात नुकसानग्रस्त १ लाख ८० हजार शेतकऱ्यांना १२८ कोटी रुपयांची मदत दिली आहे. 'मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी' अंतर्गत उत्कृष्ट विद्यार्थ्यांना 'इस्रो' आणि अमेरिकेतील 'नासा' यांसारख्या नामांकित संस्थांना भेट देण्याची संधी मिळणार आहे.(Viksit Maharashtra 2047)
 
४० लाख महिला बनल्या लखपती दीदी 'उमेद' अभियानामुळे महाराष्ट्रात ४० लाख महिला 'लखपती दीदी' झाल्या असून, लवकरच ही संख्या ५० लाखांवर जाईल. राज्यातील अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी अधिनियमांतर्गत फेब्रुवारी अखेर २ लाखांहून अधिक वैयक्तिक दावे तसेच ८ हजाराहून अधिक सामूहिक वनहक्क दाव्यांना मंजुरी आहे. मराठी भाषेला 'अभिजात' दर्जा मिळाल्याने भाषेच्या संवर्धनासाठी 'सेंटर ऑफ एक्सलन्स' स्थापन करण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तृतीयपंथीय घटकांतील व्यक्तींना छोट्या व्यवसायाकरिता कर्जासाठी बीज भांडवल योजना राबविण्यात येत आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे १२ वर्षानंतर होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी जागतिक दर्जाचे नियोजन करण्यात येत असून, त्यासाठी विशेष प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे, असेही राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी सांगितले.(Viksit Maharashtra 2047)
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....