Viksit Bharat 2047 : विकसित भारताच्या उभारणीत महाराष्ट्राचे योगदान महत्त्वपूर्ण ठरेल

. पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर

    01-May-2026   
Total Views |
Viksit Bharat 2047
 
अकोला : (Viksit Bharat 2047) 'विकसित भारत २०४७'च्या ध्येयाला जोडून घेत महाराष्ट्र राज्य अनेक लोककल्याणकारी योजना आणि ठोस निर्णयांच्या माध्यमातून व्यापक प्रगतीकडे दमदार पावले टाकत आहे. विकसित भारताच्या उभारणीत महाराष्ट्राचे योगदान महत्त्वपूर्ण ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी आज येथे केले.
 
महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त मुख्य शासकीय समारंभ लालबहादुर शास्त्री क्रीडांगण येथे झाला. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रध्वज वंदन झाले. राष्ट्रीय गीत वंदे मातरम, राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत, राष्ट्रध्वज वंदन, पथसंचलन, चित्ररथ प्रदर्शन आदी कार्यक्रम झाला. आमदार अमोल मिटकरी, माजी आमदार वसंतराव खोटरे, प्र. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, महापालिका आयुक्त सुनील लहाने व विविध क्षेत्रांतील मान्यवर आदी उपस्थित होते.(Viksit Bharat 2047)
 
पालकमंत्री ॲड. फुंडकर म्हणाले की, महाराष्ट्र ही संतांची, समाजसुधारकांची आणि कर्तृत्ववान नागरिकांची भूमी आहे. उद्योग, शेती, शिक्षण आणि संस्कृती या सर्व क्षेत्रांत महाराष्ट्र देशात अग्रस्थानी आहे. देशाला 2047 पर्यंत 'विकसित राष्ट्र' बनवण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात व्यापक विकासाचे पर्व सुरू झाले आहे. अकोला जिल्ह्यातही पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रांत विविध कामे वेगाने सुरू आहेत. शेतकरी, कामगार, महिला आणि युवक यांना केंद्रस्थानी ठेवून विविध योजना प्रभावीपणे राबवल्या जात आहेत, असे सांगून त्यांनी विविध विभागांच्या योजनांच्या अंमलबजावणीबाबत माहिती दिली.(Viksit Bharat 2047)
 
ते म्हणाले की, खरीपासाठी कर्ज वितरणाला गती देण्यात आली आहे. कृषी निविष्ठांचीही उणीव भासू नये, याची काळजी घेतली जाईल. अतिवृष्टी मदत, कृषी यांत्रिकीकरण, प्रति थेंब अधिक पीक सूक्ष्म सिंचन योजना, मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, मनरेगा, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना आदी कृषी योजनांच्या अंमलबजावणीची माहिती त्यांनी दिली.(Viksit Bharat 2047)
 
कृत्रिम बुद्धिमत्ता व अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी सातत्याने प्रयत्न होत आहेत, असे सांगून त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा डॅशबोर्ड, जिल्हा वॉररूम, व्हॉटस्ॲप चॅटबोट प्रणाली, मिशन एक्सिलेंस ॲप, जिल्हा पोलीस दलाच्या ‘प्रोजेक्ट त्रिनेत्र’, ‘प्रोजेक्ट रक्षा’ ई-साक्ष, 'मेसेज अलर्ट सिस्टम' आदी प्रणालींचा उल्लेख केला. ‘डायल 112’मध्ये जलद प्रतिसाद देण्यात अकोला पोलीस दल महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर आहे. गुन्हे सिध्दतेचे प्रमाण गत वर्षभरात 39.47 टक्क्यांहून 60.22 टक्क्यांपर्यत वाढले आहे, असेही त्यांनी सांगितले.(Viksit Bharat 2047)
 
ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीसाठी 2025-26 मध्ये मनरेगाच्या माध्यमातून 84 हजार 293 कुटुंबांना रोजगार मिळाला. शाळा संरक्षण भिंत, स्वच्छतागृहे, फळबाग, तुतीलागवड, सिंचन विहीरी अशी अनेक कामे निर्माण झाली. जिल्ह्यात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेद्वारे आतापर्यंत 69 हजार 615 रुग्णांवर उपचार व शस्त्रक्रियेसाठी 335 कोटी 54 लक्ष रुपयांची मंजुरी देण्यात आलेली आहे. गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षणासाठी मुलींसाठी एचपीव्ही लसीकरण मोहीम सुरू असून, जिल्ह्यातील पालकांनी आपल्या लेकीचे आरोग्य व भविष्य सुरक्षित करण्यासाठी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.(Viksit Bharat 2047)
 
महाराष्ट्र हे देशातील सर्वात मोठे औद्योगिक राज्य आहे. राज्य शासनाने औद्योगिक संरचनेत लवचिकता आणल्यामुळे उद्योग आणि कामगार दोघांनाही फायदा होणार आहे, असे सांगून त्यांनी महिला सक्षमीकरण योजना, कामगार कल्याण योजना, मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रम, पंतप्रधान रोजगारनिर्मिती कार्यक्रम आदी योजनांच्या अंमलबजावणीची माहिती दिली.(Viksit Bharat 2047)
 
जिल्ह्यातही आजपासून दि. १५ मेपर्यंत ‘स्व-गणना’ व त्यानंतर प्रगणकांमार्फत दि. १६ मे ते १४ जून दरम्यान घरोघरी जाऊन माहिती संकलन होणार आहे. जनगणना हे राष्ट्रीय कार्य आहे. पुढील १० वर्षांसाठीच्या विकासकामांचे नियोजन हे त्यावर अवलंबून आहे. त्यामुळे अकोला जिल्ह्यातील नागरिकांनी ‘आपली नोंद, आपला विकास’ हे ब्रीदवाक्य लक्षात ठेवून स्व-गणना करावी व प्रगणकांना अचूक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.(Viksit Bharat 2047)
 
यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते युवा पुरस्कार व विविध क्षेत्रांतील गुणवंतांचा गौरव झाला. विविध दलांच्या पथकांनी शानदार पथसंचलन केले. विविध कार्यालयांचे चित्ररथही सहभागी होते. कार्यक्रमाला स्वातंत्र्यसैनिक, त्यांचे कुटुंबिय, विविध क्षेत्रांतील मान्यवर, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.(Viksit Bharat 2047)
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....