'थेरीगाथे'तील स्त्री शक्ती

    01-May-2026   
Total Views |
 
Therigatha Women Empowerment Buddhism
 
तथागत गौतम बुद्ध आणि त्यांना शरण गेलेल्या भिक्खुणी, या आदरणीय भिक्खुणींनी धम्माचा प्रचार जगभरात आणि जनसामान्यांत केला. दि. १ मे तथागत गौतम बुद्धांच्या जयंतीनिमित्त दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या ‘धम्मकीर्तीतील स्त्री’ या विशेषांकामध्ये यातील काही भिक्खुणींच्या विचारकार्याचा मागोवा घेतला आहे. तथागत गौतम बुद्धांना आणि त्यांना शरण गेलेल्या धम्मकीर्तीतील स्त्रीशक्तीला दै. ‘मुंबई तरुण भारत’चीकोटी कोटी वंदना!
 
अडीच हजार वर्षांपूर्वीच्या स्त्रीजीवनाचे दर्शन ‘थेरीगाथा’ घडवते. या ग्रंथात परमोच्चपद प्राप्त झालेल्या ७३ भिक्खुणींचे उद्गार आहेत, ‘पद्यगाथा’ आहेत. या सगळ्या जणींचे जगणे आजही प्रेरणादायी आहे. आज समाजातील महिलांसमोर अनेक प्रश्न आहेत. त्या प्रश्नांना कसे सामोरे जायचे, याचे उत्तर ‘थेरीगाथे’तील भिक्खुणींचे जगणे आहे. त्यांनी त्यांच्या जीवनातील समस्यांवर कशाप्रकारे मात केली, ते पाहणे महत्त्वाचे आहे. या भिक्खुणींमध्ये पूर्वाश्रमीच्या राजकन्या आहेत, गृहिणी आहेत, विचारवंत आहेत, नगरवधू आहे अगदी देहविक्री करणार्‍या स्त्रीयाही आहेत. या सगळ्या जणींनी त्यांच्या भूतकाळावर मात करत वर्तमान आणि भविष्य घडवले. धम्मकार्यातली त्यांची जिद्द, नैतिकता आणि लक्ष्य प्रेरणादायी आहे. धम्मपदातील या महिलाशक्तीने माणूस म्हणून स्वतःचे अस्तित्व निर्माण केले, ज्ञानसंपन्नता प्राप्त केली. स्वतःवर विजय मिळवत त्या भिक्खुणी बनल्या आणि त्यांनी धम्माचे कार्य केले. ‘थेरीगाथे’त भिक्खुणींच्या जीवनासंदर्भातले पद्य आजच्या महिलाशक्तीला कसे प्रेरणादायी आहे, तर याची काही उदाहरण देते : 
 
‘थेरीगाथे’तील भद्दा कुंडलकेशा. ती चांगल्या घरची मुलगी. एकेदिवशी सत्युक नावाचा चोर चोरी करतो. नगररक्षक त्याला पकडतात. नगरातून धिंड काढत त्याला नेतात. सगळे त्याची निंदा करतात. कुंडलकेशाही त्याची धिंड पाहते. मात्र, कुंडलकेशा सत्युकवर मोहित होते. ती तिच्या पित्याकडे हट्ट करते की, त्याच्याशीच विवाह करायचा आहे. पिता तिला समजावतात; पण ती म्हणते, त्याच्याशी विवाह झाला नाही; तर मी प्राण त्यागेन. शेवटी कन्यामोहापायी पिता सत्युकची त्या गुन्ह्यातून सुटका करतात. कुंडलकेशाचा विवाह होतो. पण, सत्युक लोभी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचाच असतो. त्याला कुंडलकेशाबद्दल प्रेम नसते. त्याला तिची संपत्ती हवी असते. तो एकेदिवशी कुंडलकेशाला सांगतो की, "आपल्याला पूजेला जायचे आहे. तू सगळे दागिने परिधान कर, आपल्याला दूर जायचे आहे.” कुंडलकेशा त्याच्या प्रेमात आंधळी असते. तिला खरे वाटते. त्याने सांगितल्याप्रमाणे ती सगळे दागिने परिधान करते. सत्युक पूजेच्या नावाने तिला दूर आडमार्गाला नेतो. तिचे सर्व किमती दागिने घेऊन तिला मारून टाकायचा त्याचा दुष्ट कावा असतो. कुंडलकेशा त्याच्याबरोबर उंच डोंगर चढून पुढेपुढे जात असते. डोंगरावर गेल्यावर सत्युक तिला म्हणतो, "तुझे सर्व दागिने मला दे.” कुंडलकेशा म्हणते, "माझे म्हणजे तुमचेच दागिने आहेत.” यावर सत्युक म्हणतो, "हे मूर्खे, तुला काय वाटते, मी तुला इथे पूजा करण्यासाठी आणले आहे काय? तुझे दागिने घेण्यासाठी इथे आणले.” त्याच्यावर जीवापाड प्रेम करणारी कुंडलकेशा, तिला हे एकून कसे वाटले असेल?
 
समाजात अशा अनेक मुली-महिलांची भेट होते, ज्यांना प्रेमाच्या खोट्या जाळ्यात फसवले गेले आहे. ‘लव्ह जिहाद’ प्रकरणात दुसरे काय घडते? असेच साध्याभोळ्या निष्पाप मुलींना मोहित केले जाते आणि त्यांची संपत्ती, त्यांची इज्जत, त्यांचा जीवही घेतला जातो. पण, थांबा. कुंडलकेशाची जीवनकथा इथेच संपत नाही. ज्याच्यावर प्रेम केले, अतूट विश्वास टाकला; तो सत्युक खोटारडा निघाला, त्याने फसवणूक केली आणि प्रेमाचे नाटक केले, हे कळल्यावर कुंडलकेशा काय करते? तर, ती क्षणात स्वतःला सावरते. मुळुमुळु रडत नाही की, आता माझे काय होणार? मला सोडून जाऊ नकोस, तुला माझे काय पाहिजे ते घे; पण मला तुझ्या सोबत ठेव, अशी लाचारीची भाषा तिने केली का? तर अजिबात नाही. कुंडलकेशाने काय केले? तर ती म्हणाली, "मला तुमची आज्ञा मान्य आहे. तुमचेच तर सगळे आहे. पण, या अलंकारांनी सजलेल्या देहाने मला एकदा तुमचे आलिंगन घेऊ द्या.” आयतेच सगळे दागिने मिळतात, हे पाहून सत्युक खूश होतो. कुंडलकेशा त्याला आलिंगन देण्याच्या आविर्भावात पुढे येते आणि त्याला जोरदार धक्का मारते, त्याबरोबर सत्युक डोंगरकड्यावरून खाली पडतो. शरीराचे तुकडे होऊन त्याचा मृत्यू होतो. त्याबरोबर त्याठिकाणी राहत असलेल्या देवता प्रसन्न होतात आणि म्हणतात, "सर्व ठिकाणी पुरुष चतुर नसतात. काही ठिकाणी स्त्रियासुद्धा पुरुषांपेक्षा चतुर असतात.” पुढे कुंडलकेशा धम्माला शरण जाते. विद्वान म्हणून चिची कीर्ती सर्वदूर पसरते.
 
‘थेरीगाथे’त भद्दा कुंडलकेशाचे ही जीवनगाथा आजही समाजात प्रेरणादायी आहे. कारण, आपली फसवणूक झाली, आपले शोषण झाले, हे कळल्यावर मुली-महिला हतबल होतात, लाचार होतात. आता आपली सुटका नाही म्हणून सर्व अन्याय मुकाट सहन करतात. या सगळ्यांना भद्दा कुंडलकेशाचे जीवन प्रेरणा देणारे आहे. प्रेम आहे ठीक आहे; पण समोरची व्यक्ती जर प्रेमाच्या लायकीचीच नसेल तर? त्या व्यक्तीने वस्तू समजून वापर केला असेल तर? तर, त्या व्यक्तीला दूर करणे गरजेचे आहे. झाले ते झाले, त्या दुःखाला आयुष्यभर कवटाळण्यापेक्षा आपल्या जीवनाचा अर्थ शोधणे आणि त्यातून बुद्धीचा, नीतीचा विकास करणे गरजेचे आहे. हा संदेश हजारो वर्षांपूर्वीच्या ‘थेरीगाथे’तील कुंडलकेशा शोषित, पीडित महिलांना देत आहे.
  
‘थेरीगाथे’चे अप्रूप वाटते. कारण, यात व्यक्त होणार्‍या भिक्खुणी, ज्यांच्याबद्दल लिहिले आहे, त्या सर्व स्त्रिया, त्यांचे जीवन आणि विचार याबाबत जे आहे, तेच लिहिले आहे. निसर्ग जितका पारदर्शक आणि सत्य आहे, तितक्याच ताकदीने ‘थेरीगाथे’तील महिलांचे जगणे अभिव्यक्त झाले आहेत. ‘थेरीगाथे’त वर्णन केलेल्या भिक्खुणीचे तत्कालीन जगणे हे आजच्या काळाशी साधर्म्य सांगते. वंचना, शोषण, कष्ट या सगळ्यांचा सामना त्यांच्याही जीवनात आढळतो. मात्र, त्यांनी त्या सगळ्यांवर मात केली. ‘थेरीगाथे’त या सगळ्या जणी त्यांच्या आयुष्याचे प्रश्न मांडतात. पण, त्यांनी त्यावरचे उत्तरही शोधले आहे. तथागत गौतम बुद्धांनी समता आणि करुणेचा मार्ग सांगितला. ‘धम्मकीर्तीतील स्त्री’ त्या मार्गातील दीपस्तंभ आहे.
 
९५९४९६९६३८

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.