
निळे मोकळे आकाश-पृथ्वी व आकाश या सर्व पोकळीला व्यापून टाकणारा अंधार हळूहळू नष्ट होऊन प्रकाशाची आभा अभिभूत होऊ लागली. आपल्या प्रिय पित्याच्या आज्ञेनुसार तो युवक नेहमीप्रमाणे पहाटे सरोवराच्या काठावर जाऊन पोहोचला होता. पक्षांचा किलबिलाट, पुष्प-लतांचा सुगंध, फुलपाखरांचे बागडणे, प्रातःकाळचा उल्हसित करणारा मंद वारा हे सर्व वातावरण मन मोहून टाकणारे होते. तरुण उल्हसित मनाने सरोवराच्या थंड पाण्यात उतरला व अंघोळ करू लागला. त्याचे वस्त्र भिजले होते. काळ्याभोर केसांतून पाण्याचे थेंब ठिपकत होते. पूर्व दिशेला आपल्या लालीची आभा पसरवत उषा मंद स्मित करीत होती.
एकदा तथागत विहाराच्या प्रांगणात आवड असलेल्या लोकांना उपदेश करून त्यांची ज्ञान जिज्ञासा शांत करीत होते. सर्व श्रोते तल्लीन होऊन उपदेश ऐकत होते. त्यातच त्या युवकाची माताही एकाग्रतेने ऐकत होती. तिचे चित्त तथागताच्या ज्योतिर्मय स्वरूपात एकाग्र झाले होते. महाकारुणिकाने ओळखले की, तिचे चित्त एकाग्रतेच्या परमोच्च शिखरावर गेले आहे. त्यांनी तिला अर्हतपद प्राप्त करण्याचे साधन सांगितले व तिने अर्हतपद प्राप्त केले. एकदा तथागत भगवान बुद्ध भिक्खुणी संघाला पद देत असताना त्यांनी सिगाल मातेलासुद्धा तिच्या योग्यतेनुसार पद दिले.या सिगाल मातेचा जन्म राजगृह नगराच्या एका कुलीन परिवारात जाला होता. बालपणापासून त्यांची भगवान बुद्धावर श्रद्धा होती. त्या शील, क्षमा, शांती या गुणांनी युक्त होत्या. त्यामुळे त्यांचे त्यांचे वैवाहिक जीवन सुख-शांतीपूर्ण होते. त्यांच्या सद्वर्तनाने सर्व कुटुंबीय प्रसन्न होते. अशा सुखी-संपन्न परिवारात त्यांनी एका सुंदर बाळाला जन्म दिला. त्या बालकाचे नाव ‘सिगाल’ होय. सिगाल आपल्या माता-पित्याचा आज्ञाधारक पुत्र होता. तरुण झाल्यानंतर तो आपल्या वडिलांनी सांगितल्याप्रमाणे दशदिशांचे पूजा-अर्चना करण्याच्या आदेशाचे पालन करीत होता व त्यांनी त्यातील रहस्य समजावून सांगितले होते. श्रद्धाळू उपासक म्हणून त्याने प्रसिद्धी प्राप्त केली होती व त्याच्या या गुणामुळे त्याची माताही ‘सिगाल माता’ म्हणून प्रसिद्ध झाली होती.
सिगाल मातेने आपल्या साधनेने व तथागतांवरील श्रद्धेने अर्हतपद प्राप्त केले आपले जीवन सफल करुन दोन्ही कुळांची प्रतिष्ठा वाढविली. हे आजही प्रेरणादायी आहे.
9820850999