Mumbai Budget 2026-27 : १०० टक्के तरतूद वापरल्यासच अर्थसंकल्प फलद्रूप – महापौर रितू तावडे
01-May-2026
Total Views |
मुंबई : (Mumbai Budget 2026-27) सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पातील तरतुदींचा शंभर टक्के वापर झाला, तरच खऱ्या अर्थाने अर्थसंकल्प फलद्रूप ठरेल, असे प्रतिपादन रितू तावडे यांनी केले. केवळ तरतूद करणे पुरेसे नसून तिची वेळेत व पारदर्शक अंमलबजावणी होणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान त्या म्हणाल्या की, यंदा प्रथमच मोठ्या संख्येने सदस्यांना आपली मते मांडण्याची संधी मिळाली. एकूण १२ दिवस चाललेल्या चर्चेत शहरातील विविध भागांतील नगरसेवकांनी सक्रिय सहभाग घेतला. सुमारे ४८५ चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या मुंबईतून सदस्यांनी दररोज उपस्थित राहून अभ्यासपूर्ण मते आणि सूचना मांडल्या, याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले. (Mumbai Budget 2026-27)
यंदा अर्थसंकल्पीय चर्चेचे प्रथमच थेट प्रक्षेपण करण्यात आले. त्यामुळे कोट्यवधी नागरिकांना सभागृहातील कामकाजाचा अनुभव घेता आला. ही बाब पारदर्शकता व उत्तरदायित्व वाढवणारी ठरल्याचे त्यांनी नमूद केले. (Mumbai Budget 2026-27)
अर्थसंकल्प हा प्रशासनाचा कणा असून त्यातूनच शहराच्या विकासाला दिशा मिळते. प्रभावी नियोजन, संसाधनांचा कार्यक्षम वापर, योग्य वितरण आणि धोरणात्मक अंमलबजावणी यांमुळेच अर्थसंकल्पाचे महत्त्व वाढते, असे त्यांनी सांगितले. सभागृहाने आपली जबाबदारी पार पाडली असून आता अर्थसंकल्प प्रत्यक्षात यशस्वी करण्याची जबाबदारी प्रशासनावर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Mumbai Budget 2026-27)
सभागृह नेते गणेश खणकर, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे तसेच गटनेते अमेय घोले यांनीही अर्थसंकल्पावर मार्गदर्शनपर मते व्यक्त केली. चर्चेत सहभागी झालेल्या नगरसेवकांनी अनेक विधायक सूचना मांडल्या असून त्या अंमलबजावणीस उपयुक्त ठरतील, असा विश्वास महापौरांनी व्यक्त केला.
(Mumbai Budget 2026-27)
मुंबईतील नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा मिळाव्यात यासाठी पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण संरक्षण, वाहतूक व्यवस्था आणि डिजिटल प्रशासन या क्षेत्रांवर विशेष भर देण्यात आला आहे. (Mumbai Budget 2026-27)
अर्थसंकल्पीय कामकाज यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी महानगरपालिका सचिव आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केलेल्या सहकार्याबद्दलही महापौरांनी कृतज्ञता व्यक्त केली. (Mumbai Budget 2026-27)