Missing Link Mumbai Pune : 'मिसिंग लिंक नव्हे, कनेक्टिंग लिंक म्हणा’

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग मिसिंग लिंकचे लोकार्पण

Total Views |

Missing Link Mumbai Pune
 
मुंबई : (Missing Link Mumbai Pune) "मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील 'मिसिंग लिंक' हा केवळ एक रस्ता नसून भारतीय अभियांत्रिकी कौशल्याचा जागतिक स्तरावरील अजोड नमुना आहे. या प्रकल्पामुळे केवळ प्रवासाचा वेळच वाचणार नाही, तर तो राज्याच्या अर्थव्यवस्थेला 70 हजार कोटींची गती देणारा 'इकॉनॉमिक मल्टिप्लायर' ठरेल," असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
 
या प्रकल्पास मिसिंग लिंक पेक्षा 'कनेक्टिंग लिंक' संबोधणे जास्त संयुक्तिक असल्याचे सांगून या प्रकल्पाच्या लोकार्पणानंतर या प्रकल्पाचे नाव कनेक्टिन्ग लिंक करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी एमएसआरडीसीला दिले. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत 1 मे, रोजी स्व. यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग कुसगाव ते खोपोली या नव्या मार्गिकेचे लोकार्पण करण्यात आले. या लोकार्पणानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाच्या तांत्रिक आणि सुरक्षिततेच्या पैलूंवर विशेष प्रकाश टाकला. (Missing Link Mumbai Pune)
 
या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, रोजगार हमी मंत्री भरत गोगावले, राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, खासदार सुनील तटकरे, खासदार श्रीरंग बारणे यासह एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, अधिकारी तसेच या प्रकल्पांतर्गत बोगद्याच्या बांधकामातील सहभागी अफकोन्स आणि नवयुग कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.(Missing Link Mumbai Pune)
 
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील 'कुसगाव ते खोपोली' या नव्या 13 किलोमीटर मार्गिकेला मिसिंग लिंक म्हटले गेले होते. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) या मार्गाची निर्मिती केली. या मार्गामुळे मुंबई ते पुणे प्रवासाचा कालावधी २५ ते ३० मिनिटांनी कमी होणार आहे. एमएसआरडीसी आणि त्यांच्या अभियंत्यांनी उत्तम काम करत हा मार्ग उभारला, असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधिकाऱ्यांचे कौतुक केले. तसेच हा महामार्ग कसा उभारला गेला, यामागचा घटनाक्रमही सांगितला. (Missing Link Mumbai Pune)
 
आधीच्या सरकारवर घाणाघात
 
या मार्गिकेची माहिती देताना मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच्यासरकारवर टीकाही केली. या मार्गाची कल्पना पहिल्यांदा २०१० साली मांडली गेली. त्यानंतर अन्वेषण होऊन त्याचा अहवाल तयार झाला. मात्र हा मार्ग कसा होऊ शकत नाही, यासाठी आधीच्या सरकारने १३ कारणे दिली. यात एक कारण असेही होते की, लोणावळा तलावाच्या खालून हा मार्ग जात असल्यामुळे तो करता येणार नाही, असेही एक कारण यात दिले गेले. महायुतीचे सरकार आल्यानंतर मी एमएसआरडीसीचे अधिकारी मोपलवार, आनंद कुलकर्णी यांना याबाबतचे कारण विचारले. त्यांनी हा मार्ग होऊ शकतो, असा विश्वास व्यक्त केला. डिसेंबर २०१५ ला जुन्या सरकारचा निर्णय बदलून आम्ही मिसिंग लिंक करणार असल्याचा निर्णय घेतला आणि काम सुरू केले.(Missing Link Mumbai Pune)
 
अभियांत्रिकी आव्हान कसे पेलले?
 
१८२ मीटर उंचीच्या केबलस्टेड पुलाबद्दल माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले की, हे अभियांत्रिकी आव्हान होते. याठिकाणी जोरदार वारे वाहत असतात. रायगड जिल्ह्यापासून ते पुण्यापर्यंत वाहणाऱ्या वाऱ्याचा वेग वेगवेगळा आहे. हे सर्व लक्षात घेऊन पुलाची उभारणी करण्यात आली. मागच्या काळात कोकण किनारपट्टीवर धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा वेग ताशी १३० ते १५५ किमी होता. आपण तयार केलेला केबलस्टेड पूल ताशी २४० किमी वेग असतानाही तग धरू शकतो. चक्रीवादळापेक्षा दुप्पट गतीने वारा वाहिला तरी या पुलाला काही होणार नाही.(Missing Link Mumbai Pune)
 
 
भारतासहित सात देशांचे मोलाचे योगदान
 
भारतासहीत सात देश या पुलाच्या उभारणीसाठी वेगवेगळ्या पद्धतीने जोडले गेले होते. याचे मूळ डिझाइन कॅनडामध्ये तयार झाले. डेन्मार्कमध्ये त्याची विंड टेस्ट करण्यात आली. केबलची चाचणी ऑस्ट्रियाच्या व्हिएन्ना विद्यापीठात करण्यात आली. केबलचे उत्पादन मलेशियाच्या कंपनीने केले. रस्त्यालगतचे सुरक्षा कठडे ऑस्ट्रिया आणि गोदरेज यांनी संयुक्तपणे केले. पुलाचे आरेखन तैवानच्या कंपनीने केले. व्हेरिफिकेशन कन्सल्टंट ऑस्ट्रियाचे होते आणि केबल एक्सपर्ट सिंगापूरचे होते, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.(Missing Link Mumbai Pune)
 
छत्रपती शिवरायांच्या लढाईचाही दाखला
 
मार्गिकेचे वर्णन करत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा एक दाखला दिला. “१६६१ साली छत्रपती शिवरायांनी कारतलब खानाचा घेरा मोडण्याकरिता उंबरखिंडीची लढाई केली होती. ती लढाई या प्रकल्पाच्या ठिकाणीच झाली होती, अशी आठवण मुख्यमंत्र्यांनी करून दिली. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वतः या लढाईचे नेतृत्व केले होते. पाच हजार मावळ्यांनी मुघलांच्या लाखो सैनिकांना कापून काढले. या लढाईने स्वराज्याकरिता खूप मोठे परिवर्तन केले. त्यामुळे ही जागा अतिशय महत्त्वाची आणि पवित्र अशी आहे”, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.(Missing Link Mumbai Pune)
 
सुप्रिया सुळेंना लगावला टोला
 
“मला आज मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची माफी मागायची आहे. त्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. खासदार सुप्रिया सुळेही वाहतूक कोंडीत अडकल्या होत्या. त्यांचा संदेश आमच्यापर्यंत पोहोचला. मी सुप्रिया सुळेंना सांगू इच्छितो की, तुम्ही आज शेवटचे ट्रॅफिकमध्ये अडकलात. आता कनेक्टिंग लिंक झालेली आहे. त्यामुळे पुढच्या वेळी तुम्हाला ट्रॅफिकमध्ये अडकण्याची वेळ कधीही येणार नाही. हे काम तुमच्या सरकारने केले नाही. ते आमच्या महायुतीच्या सरकारने करून दाखवले आहे”, असा टोलाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.(Missing Link Mumbai Pune)
 
"एकेकाळी हा प्रकल्प रद्द करण्याचा किंवा न होण्याचा विचार सुरू होता, परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते आव्हान स्वीकारून अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले आणि कामाला सुरुवात केली. प्रकल्पाच्या भूमिपूजनावेळी मी स्वतः एमएसआरडीसी मंत्री होते आणि देवेंद्र जी मुख्यमंत्री होते आणि आज लोकार्पणही आम्हीच करत आहोत, हा एक दुर्मिळ योगायोग आहे.
 
महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात केवळ 7-8 तासांत पोहोचता यावे, यासाठी शासन ‘ॲक्सेस कंट्रोल ग्रीड’वर काम सुरु आहे. समृद्धी महामार्गामुळे नागपूर-मुंबई प्रवास जसा सुखकर झाला, तसाच आता पुणे प्रवासही सुसाट आणि सुरक्षित होईल. हे सर्वसामान्यांचे सरकार असून जनतेने महायुतीला नेहमीच आशीर्वाद दिला आहे, त्यामुळे लोकोपयोगी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.
- एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
 
"हा प्रकल्प म्हणजे केवळ दोन शहरांमधील अंतर कमी करणारा रस्ता नसून महाराष्ट्राच्या वेगवान प्रगतीची नांदी असल्याचे सांगत, त्यांनी दिवंगत यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या महामार्गाचा आज सुवर्ण अक्षरात लिहिण्यासारखा टप्पा गाठला आहे. या प्रकल्पाच्या नियोजनात उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांचेही मोठे योगदान असून त्यांनी अर्थसंकल्पात केलेली घोषणा आणि वेळोवेळी घेतलेला आढावा यामुळे हा प्रकल्प मार्गी लागला आहे. भारतातील सर्वात उंच केबल-स्टेड पूल आणि आधुनिक सुरक्षा प्रणालीमुळे हा मार्ग भविष्यात 'स्मार्ट एक्सप्रेस-वे' म्हणून ओळखला जाईल.
- सुनेत्राताई अजित पवार, उपमुख्यमंत्री (Missing Link Mumbai Pune)
 
 

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.